Sunday, October 12, 2025

करूर चेंगराचेंगरी प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचा १३ ऑक्टोबरला निर्णय

करूर चेंगराचेंगरी प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचा १३ ऑक्टोबरला निर्णय

चेन्नई : करूर येथील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर १३ ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्ट आपला निर्णय जाहीर करणार आहे. या दुर्घटनेत ४१ जणांचा मृत्यू झाला होता. न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने या याचिकांवर सुनावणी केली असून, निर्णय राखून ठेवला होता.

सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाने या घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी गठीत केल्यावर प्रश्न उपस्थित केला आणि आश्चर्य व्यक्त करत विचारले की, हायकोर्टाने या प्रकरणात पुढे कार्यवाही कशी केली? कोर्टाने म्हटलं,“आम्हाला समजत नाही की हे आदेश कसे पारित झाले. जेव्हा मदुराई खंडपीठ या प्रकरणावर विचार करत होतं, तेव्हा चेन्नईमधील एकल पीठाने या प्रकरणात हस्तक्षेप कसा केला?”

तामिळ अभिनेते विजय यांच्या “तमिळगा वेत्री कळगम” (टीव्हीके) या राजकीय पक्षातर्फे ज्येष्ठ वकील गोपाल सुब्रमण्यम यांनी युक्तिवाद सादर केला. त्यांनी सांगितले की, उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका ही केवळ राजकीय सभांसाठी मानक कार्यपद्धती तयार करण्यासाठी होती. पण त्यांनी यावर आक्षेप घेत सांगितले की, हायकोर्टाने पहिल्याच दिवशी एसआयटीची स्थापना केली, आणि न्यायालयाने पक्षाचा (टीव्हीके आणि विजय यांचा) बाजू ऐकून न घेता त्यांच्या विरोधात प्रतिकूल टिप्पण्या केल्या.

Comments
Add Comment