Sunday, October 12, 2025

वेध लागता दिवाळीचे...

वेध लागता दिवाळीचे...

वर्षभर तणावग्रस्तता अनुभवल्यानंतर, धकाधकीचे दिवस सहन केल्यानंतर दिवाळीनिमित्त येणारी आणि सर्वदूर पसरणारी प्रसन्नता हवीहवीशी वाटते. दिवाळीचे पदरव सर्वप्रथम बाजारात जाणवतात. ग्राहकांची वाढती लगबग, हवे ते शोधण्याची धांदल आणि मिळाल्यानंतरचे समाधान पैशात मोजता येत नाही. हेच दृश्य सध्या बाजारात दिसते आहे. खरेदीचा उत्साह ओसंडून वाहतो आहे. भिजलेल्या, चिंतायुक्त मनाला बाजार रिझवतो आहे.

विशेष: स्वाती पेशवे

दसरा संपला की दिवाळीचे वेध लागतात. वर्षातील या सर्वात मोठ्या सणासाठी जमेल तशी काही रक्कम बाजूला टाकली जातेच. त्यामुळे यानिमित्ताने घरोघरी मोठी खरेदी होते, मात्र सर्वसामान्यांच्या आयुष्यात दिवाळी खरेदीचा खरा बहर येतो तो बोनसची रक्कम हाती पडल्यानंतर. हे अतिरिक्त धन, ही माया हाती पडली की खरेदीला खरे धुमारे फुटतात. अर्थात यंदा दिवाळीची दिवेलागण होण्यापूर्वीच आपण ओल्या दुष्काळाची काजळी पुसण्याचे काम करत आहोत. महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढल्यामुळे अनेक भागांमधले उभे पीक झोपले आहे. खरे पाहता दिवाळी हा पिके हाती येण्याचा काळ. मशागत केल्यानंतर शेतामध्ये डौलाने पिके डोलताना बघण्याचा हा काळ, मात्र अवकाळी तसेच अतिवृष्टीने यावेळी शेतकऱ्यांच्या डोळ्याला लागलेल्या धारांमध्ये खारेपणा वाढवण्याचेच काम केले. अर्थात सरकार आणि समाजाकडून मिळालेल्या आधाराच्या बळावर शेतकरी पुन्हा उभा राहील आणि प्रत्येकाच्या घरापुढे पणत्या त्याच तेजाने लागतील, अशी आशा आहे. अंधाराप्रमाणेच पणत्यांचा प्रकाश दु:खाचे सावटही दूर करेल आणि नव्या दमाने समाज कामाला लागेल यात शंका नाही. यापूर्वी सलग तीन वर्षे आपण कोरोनाशी निकराची झुंज घेतली. वर्षभर या ना त्या स्वरूपाच्या आक्रमणाचा, अमेरिकेच्या मनमानी करवाढीचा, युद्धजन्य परिस्थितीचा सामना करतच आहोत. त्याचा परिणाम म्हणून बाजारातील हेलकावे सहन करत आहोत. मात्र संकटातून संधी शोधणारा भारतीय समाज आणि मराठी माणूस या स्थितीतही खंबीरपणे उभा आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपण त्याचा हाच निर्धार पाहू शकतो.

शेवटी दिवाळी हे काही एका सणाचे नाव नाही, तर तो आनंदाच्या वाटेने प्रकाशाकडे नेणारा एक प्रदीर्घ प्रवास आहे. ही आपली हसरी, साजिरी परंपरा आहे. म्हणूनच दिवाळीत आनंद अर्थव्यवस्थेलाही एका वेगळ्या आणि महत्त्वाच्या टप्पावर घेऊन जातो. यंदाही बाजारपेठेत दिसणारा उत्साह, खरेदीचा ओघ आणि ग्राहकांच्या बदललेल्या सवयी यामुळे दिवाळीची तयारी, लगबग हेच दाखवून देणारी दिसते आहे. ती पारंपरिक स्वरूपातून काहीशा आधुनिक ग्राहकांच्या आवडीनुसार रंगलेली बघायला मिळते आहे. इथे लक्षात घ्यायला हवे की, शहरे आणि ग्रामीण भागातील खरेदीचा वेग, उत्पादनांची मागणी आणि नव्या ट्रेंड्समध्ये स्पष्ट फरक जाणवतो. पहिली बाब म्हणजे सोन्या-चांदीच्या बाजारात यंदाही विशेष उत्साह दिसतो आहे. खरे पाहता सोन्याची किंमत गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

आकडेवारीच्या भाषेत बोलायचे तर ही तब्बल ३०-४० टक्क्यांची वाढ आहे. सोन्याची कमत प्रति दहा ग्रॅम १.१७ लाख आणि चांदीची कमत प्रति किलो १.४० लाखांच्या घरात आहे. तरीही, ग्राहकांनी या मौल्यवान धातूंच्या दागिन्यांच्या खरेदीकडे पाठ फिरवलेली नाही. दिवाळी आणि त्यामागोमाग सुरू होणारी लग्नसराई बघता हलक्या वजनाचे आणि १८ कॅरेट सोन्याचे दागिने आता अधिक पसंत केले जात आहेत. राज्यातील दागिन्यांच्या सर्व दुकानांमध्ये खरेदीला उधाण आले आहे. यातही पारंपरिक दागिन्यांपेक्षा हलक्या वजनाच्या मॉडर्न डिझाईन्सच्या दागिन्यांना ग्राहकांची पसंती मिळते आहे. मंगळसूत्र, बांगड्या, कर्णफुले यांच्या पारंपरिक आणि नवीन स्टाईलच्या सेट्सनी ग्राहकांना आकर्षित केले आहे. चांदीच्या वस्तूंमध्ये नाणी, पूजेचे छोटे संच तसेच आकर्षक भेटवस्तूंची मागणीही वाढते आहे. जीएसटी कपातीमुळे सोने-चांदीच्या बाजारातील कमती थोड्या प्रमाणात स्थिर राहिल्या, तर मागणीत आणखी वाढ होऊ शकते.

केवळ सोने-चांदीच्या बाजारातच नव्हे, तर ऐन दिवाळीच्या तोंडावर जीएसटी दरातील कपातीमुळे यंदाची दिवाळी ग्राहकांसाठी दिलासा देणारी ठरली आहे. किमती काही अंशी कमी झाल्यामुळे कपड्यांच्या विक्रीत दहा टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली जात असून, वस्त्र उद्योगाचा व्यापार दिवाळीपुर्वी वृद्धिंगत झाला आहे. २,५०० पर्यंतच्या कपड्यांवर जीएसटी दर आता १२ टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आल्याचा लाभ घेत, कपातीमुळे होणारा लाभ लक्षात घेत कपडेबाजारात सध्या उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. त्याचबरोबर ‌‘लोकल फॉर व्होकल‌’चा प्रभावही स्पष्ट दिसत असून यंदाच्या दिवाळीत चिनी वस्तूंच्या मागणीत घट बघायला मिळते आहे. ग्राहक स्थानिक आणि भारतीय उत्पादने अधिक पसंत करत आहेत. थोडक्यात, ‌‘लोकल फॉर व्होकल‌’ उपक्रमामुळे ग्राहकांना भारतीय ब्रँड्सकडे वळवले गेले आहे, असेही आपण म्हणू शकतो. यामुळे, स्थानिक उत्पादकांना फायदा झाला असून या बाजारामध्ये ४.७५ लाख कोटींच्या विक्रीचा उद्देश ठेवण्यात आला आहे.

यंदाच्या दिवाळीमध्ये फॅशनच्या क्षेत्रात काही नवीन ट्रेंड्स दिसून येत आहेत. जसे की, इंडो-वेस्टर्न फ्युजननुसार धोती पँट्स, केप ब्लाउजेस आणि प्री-ड्रेप्ड साड्या यांचा वापर वाढला आहे. खेरीज ग्राहक सस्टेनेबल फॅशन ट्रेंडअंतर्गत पारंपरिक कापडांचा वापर करत असून एका वर्गाकडून पर्यावरणपूरक उत्पादनांची मागणी वाढली आहे. या वर्षी पेस्टल आणि मेटॅलिक रंगांच्या कपड्यांचा ट्रेंड बघायला मिळत आहे. पारंपरिक वस्त्रांबरोबरच आधुनिक रंगसंगती, आरामदायक फॅब्रिक आणि नवीन डिझाइन्स ग्राहकांना आकर्षित करत आहेत. यंदा ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही विक्री प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. डायरेक्ट-टू-कंज्युमर प्रकारच्या विक्रीत २५ टक्के वाढ दिसत आहे. ही आकडेवारी ग्राहकांचे ऑनलाइन खरेदीचे प्राधान्य दर्शवते. घरगुती खरेदीमध्ये कपडे, सजावटीच्या वस्तू, दिव्यांचे सेट्स, गिफ्ट पॅक्स आणि फराळ यांचा समावेश मोठ्या प्रमाणावर दिसतो आहे. कॉर्पोरेट गिफ्ट्समध्ये पारंपरिक मिठाईऐवजी आरोग्यदायी, लो-कॅलरी मिठाई, ड्रायफ्रूट्स, कस्टमाइज्ड गिफ्टस, ग्रीन पॅकेजग अशा नव्या प्रकारच्या भेटवस्तूंचा समावेश केला जात आहे. घरगुती पातळीवरही लोक मित्र, नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तीसाठी भेटवस्तू निवडताना पारंपरिक आणि आधुनिक वस्तूंचा संगम करताना दिसत आहेत. गिफ्ट हॅम्पर्समध्ये फराळ, सजावटीच्या वस्तू आणि घरगुती उपकरणांचा समावेश करून अधिक आकर्षक स्वरूप देण्याचा प्रयत्न प्रकर्षाने जाणवणारा आहे.

यंदा फटाक्यांच्या बाजारात उत्साह असला तरी पर्यावरणपूरकतेचा ठसा स्पष्ट दिसतो आहे. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे यांसारख्या शहरांमध्ये धूर आणि आवाज करणाऱ्या फटाक्यांवर निर्बंध आहेत. त्याचबरोबर यंदा ‌‘ग्रीन क्रॅकर्स‌’ची मागणी वाढली आहे. त्यामध्ये धूर आणि आवाज कमी असतो. मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रीन क्रॅकर्सना विशेष प्रोत्साहन दिले गेले आहे. पारंपरिक फटाक्यांबरोबरच मल्टी-शॉट रॉकेट्स, आकाशदीप आणि झगमगाट करणाऱ्या फटाक्यांना यंदा मोठी मागणी आहे. काही ठिकाणी पावसामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला असला तरी ग्राहकांचा उत्साह कमी झाला नाही.

फराळाच्या बाजारातही यंदा मोठा बदल बघायला मिळतो आहे. करंजी, चकली, लाडू, शंकरपाळे आदी पारंपरिक पदार्थ अजूनही लोकप्रिय आहेतच, पण फ्युजन पदार्थांची मागणीही झपाट्याने वाढली आहे. जसे की आता बाजारात चॉकलेट करंजी, चीज लाडू, ड्रायफ्रूट्ससह सजवलेले लाडू, पिस्ता रोल्स यांसारखे पदार्थ ग्राहकांना आकर्षक वाटत आहेत. आरोग्याचा विचार करणाऱ्या लोकांसाठी कमी तेलातील, बेक केलेले किंवा साखरमुक्त पदार्थ उपलब्ध आहेत. सोशल मीडियावरून होम शेफ्स, लघुउद्योग आणि छोटे व्यावसायिक फराळविक्रीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ऑनलाइन ऑर्डरमुळे ग्राहकांना घरबसल्या फराळ मिळत असून त्याचा व्यापारी लाभ नोंद घेण्याजोगा म्हणावा लागेल.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वाहनांच्या खरेदीतही यंदा कमालीचा उत्साह दिसतो आहे. दसऱ्यापासूनच या बाजारातील चहलपहल वाढली असून शहरी भागात इलेक्ट्रिक स्कूटर्स, कॉम्पॅक्ट ई-कार्स आणि नवीन मॉडेल्ससाठी ग्राहक मोठ्या संख्येने खरेदी करत आहेत. ग्रामीण भागात दुचाकी वाहनांचा ओघ जास्त असून नवीन डिझाईन्स आणि सुविधा पाहता त्यामध्ये खरेदीचा स्तर वाढलेला दिसतो आहे. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सबसिडीज, इंधनदरातील बदल आणि पर्यावरणपूरक वाहनांसाठी प्रोत्साहन यामुळे ग्राहक अधिक सजग आणि पर्यावरणपूरक पर्याय निवडताना दिसत आहेत.

एकंदरच, नवीन ट्रेंड्समध्ये पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम दिसत असून हे बदलत्या समाजाचे आश्वासक चित्र असल्याचेही आपण म्हणू शकतो. भेटवस्तू, फराळ, फटाके, सजावटीच्या वस्तू, वाहन खरेदी अशा सर्वच क्षेत्रात नवकल्पना, पर्यावरणपूरकता, आरोग्यदायी उत्पादनांचा समावेश समाजाची वाढती समज दाखवून देत आहे. ग्राहकांच्या बदललेल्या सवयींना प्रतिसाद देण्यासाठी विक्रेते सतत नवे प्रयोग करत आहेत. वाढती ऑनलाइन खरेदी, सोशल मीडियाचा प्रचंड प्रभाव आणि कस्टमाइज्ड उत्पादनांची मुबलक उपलब्धता हे यंदाच्या दिवाळीच्या बाजारातील महत्त्वाचे घटक सांगता येतील. (अद्वैत फीचर्स)

Comments
Add Comment