Sunday, October 12, 2025

‘मुझे दोस्त बनके दगा न दे...’

‘मुझे दोस्त बनके दगा न दे...’

नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे

परवा झालेल्या कोजागिरीला सिनेरसिकांना एक गझल नक्की आठवली असणार. सुमारे १०९ वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशच्या बदायू शहरात जन्मलेल्या शकील बदायुनी यांची ती गझल भारतीय उपखंडात लोकप्रिय केली महम्मद रफी यांच्या रेशमी आवाजाने आणि संगीतकर रवी यांनी पहाडी रागात दिलेल्या अजरामर संगीताने. ‘चौदहवीका चाँद’ या सिनेमासाठी कविराजांनी अत्यंत रोमँटिक मूडमध्ये रचलेल्या त्या गझलेचे शब्द एका शतकानंतरही अनेकांच्या ओठावर आहेत. या गाण्यात कवी त्याच्या प्रेयसीला म्हणतोय, ‘तू तर पौर्णिमेचा चंद्र आहेस, किंवा सूर्याचा तेजस्वी गोळा, पण जशी आहेस तशी अद्वितीयच आहेस.’

‘चौदहवींका चाँद हो, या आफ़ताब हो, जो भी हो तुम, ख़ुदाकी क़सम, लाजवाब हो.’

अनेक उत्तम गझलांचे शायर पाहिले तर सहसा पाकिस्तानी निघतात. पण ही गझल तर आपल्याच शकीलसाहेबांची! त्यांचे वडील मोहम्मद जमाल अहमद सोख्ता कादिरी यांनी त्यांना अरबी, उर्दू,पारसी आणि हिंदी शिकवायला घरीच शिक्षक ठेवले होते. पुढे अलीगडच्या मुस्लीम विद्यापीठात त्यांनी १९३६ साली प्रवेश घेतला. तिथल्या अनेक मुशायऱ्यात आणि काव्यस्पर्धात ते सहभागी होत असत आणि सहसा पारितोषिके जिंकूनच आणत.

बीएची पदवी घेतल्यावर त्यांना दिल्लीत सरकारी नोकरी मिळाली. दिल्लीत त्यांचे मुशायरे, काव्यसंमेलने गाजवणे सुरूच होते. तो काळ ‘तरक्कीपसंद’ म्हणजे पुरोगामी विचारांच्या साहित्याचा होता. वंचित, पिडीत लोकांचे दु:ख, समस्या साहित्यातून मांडल्या जात. शकीलसाहेबांचा पिंड वेगळा. ते रोमँटिक शायरीत रमत. ते म्हणत-

“मैं शकील दिलका हूं तर्जुमान कह मोहब्बतोंका हूं राज़दान मुझे फख्र है मेरी शायरी मेरी ज़िंदगीसे जुदा नहीं”

माझे नावच ‘शकील’ म्हणजे देखणा आहे. मी सौंदर्याचा प्रतिनिधी आहे, प्रवक्ता आहे, प्रेमिकांचा साथीदार आहे. मला माझ्या कवितेचा अभिमान आहे कारण ती माझ्या जगण्यापेक्षा वेगळी नाही.

पुढे १९४४ साली त्यांची चित्रपटनिर्माते ए. आर. कारदार आणि संगीतकर नौशाद अली यांच्याशी भेट झाली. नौशादसाहेबांनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी त्यांना आपली कविता केवळ एका ओळीत ऐकवायला सांगितले. शकीलसाहेबांनी ज्या ओळीने नौशादजींचे मन जिंकले ती होती –

“हम दर्दका अफसाना दुनियाको सुना देंगे, हर दिलमें मोहब्बतकी एक आग लगा देंगे” झाले! त्या एका ओळीने हिंदी चित्रपट सृष्टीला एक अनमोल रत्न मिळवून दिले. शकीलसाहेबांची एकेक गाणी तर पाहा-‘प्यार किया तो डरना क्या?’, ‘एक शहनशाहने बनवाके हंसी ताजमहाल’, ‘सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे?’, ‘कोई सागर दिलको बहलाता नही’, ‘ओ दुनियाके रखवाले, सून दर्दभरे मेरे नाले.’, ‘मधुबनमे राधिका नाचे रे.’, ‘लो आ गई उनकी याद, वो नही आये’, ‘तुम्हे पा के हमने जहाँ पा लिया हैं, जमीं तो जमीं आसमाँ पा लिया हैं’, ‘आज पुरानी राहोसे कोई मुझे आवाज न दे’, ‘बेकरार करके हमे युं ना जाईये, आपको हमारी कसम लौट आईये.’, अशी एकापेक्षा एक रत्ने शकीलजींनी दिली.

त्यांचे एक गाणे तर त्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीत रूजलेल्या गंगाजमनी तहजीबचा जिवंत पुरावा ठरते. गीतकार शकीलसाहेब, संगीतकार नौशाद अली, गायक महमंद रफी असे तिन्ही मुस्लीम कलाकार आणि गाण्याचे शब्द काय होते? - “मन तडपत हरी दर्शनको आज.” हे पूर्ण गाणे ऐकल्यावर सहजच लक्षात येते की शकीलजी आणि त्याकाळचे अनेक गीतकार भारतीय समाजाच्या भावनिक, सांस्कृतिक भावविश्वाशी किती समरस झालेले होते.

‘साहिब बीबी और गुलाम’, ‘बैजू बावरा’, ‘मुगले आझम’ अशा एकापेक्षा एक सिनेमासाठी गीतरचना करणाऱ्या शकीलजींच्या गझलाही रसिकांनी नावाजल्या. त्यात एका गझलेचा उल्लेख अटळ ठरतो, कारण ती नेहमीच्या मैत्री, प्रेम, असल्या जिवलग नात्यातही कधीकधी येणाऱ्या एका अनपेक्षित अनुभवाला चित्रित करते -

‘मेरे हम-नफ़स, मेरे हम-नवा, मुझे दोस्त बनके दग़ा न दे. मैं हूं दर्द-ए-इश्क़से जां-ब-लब मुझे ज़िंदगीकी दुआ न दे.’

प्रेमात मैत्रीत कधी असा दुर्देवी अनुभव येतो की अगदी जिवलग व्यक्तीकडूनच विश्वासघात होतो. तेंव्हा वाटू लागते, ‘मित्रा, माझा समर्थक आहेस असे भासवून, मला धोका देऊ नकोस रे. मी विफल प्रेमाच्या दु:खाने इतका हरलो आहे, जणू माझे प्राण जाण्याचा बेतात आहेत, अशा वेळी मला दीर्घायुष्याची सदिच्छासुद्धा देऊ नकोस.

‘मेरे दाग़-ए-दिलसे है रौशनी, इसी रौशनीसे है ज़िंदगी. मुझे डर है ऐ मेरे चारा-गर ये चिराग़ तूही बुझा न दे.’

माझ्या दु:खाच्या प्रकाशातच माझ्या जीवनाची ज्योत कशीबशी जळते आहे. मला तर अशी भीती वाटते आहे की माझा वैद्यच ती फडफडती ज्योत विझवून न टाको. पुढे कवी त्या वैद्यालच विनंती करतो, बाबा रे, आता माझ्यावरचे उपचार थांबव, मला माझ्या नशिबावर सोडून दे. आता असे वाटतेय की तुझ्या त्या घटत चाललेल्या उपचारांनीच माझ्या वेदना अजून वाढतील.

‘मुझे छोड़ दे मेरे हालपर, तेरा क्या भरोसा है चारा-गर. ये तेरी नवाज़िश-ए-मुख़्तसर, मेरा दर्द और बढ़ा न दे.’

मग कवी मित्राला खात्री देतो की मी इतरांच्या धोक्याला घाबरत नाही. माझा आत्मविश्वास अविचल आहे. पण त्या बागेतील सुंदर फुलांच्या कोशात जे तेज आहे तेच कुठे आग लावून माझ्या स्वप्नांची बाग जाळून खाक न करो.

मेरा अज़्म इतना बुलंद है की, पराए शोलोंका डर नहीं मुझे ख़ौफ़ आतिश-ए-गुलसे है ये कहीं चमनको जला न दे

शेवटी कवी एका उर्दू शायरला शोभेशा कलंदर वृत्तीने स्वत:लाच विचारतो, ‘अरे बाबा शकील, तू आहेस तरी कुठे? बघ ती आलीये. तिने मदिरेची सुरई आणि सुंदर चषक आणला आहे. तू इथे नसशील तर खास तुझ्यासाठी भरलेला पेला घेण्यासाठी दुसऱ्याचा कुणाचा हाथ पुढे येईल!

‘वो उठे हैं लेके ख़ुम-ओ-सुबू अरे ओ ‘शकील’ कहां है तू तेरा जाम लेनेको बज़्ममें कोई और हाथ बढ़ा न दे.’

अनेकदा असे होतेही, जेव्हा एखाद्याच्या हक्काचे काही त्याला मिळणार असते, नियती उदार झालेली असते नेमकी तेव्हाच ती व्यक्ती उपस्थित नसते. सिनेसृष्टीला एकापेक्षा एक रत्ने देणाऱ्या या कवीला केवळ तीनदा सर्वोत्तम गीतकाराचे फिल्मफेयर मिळाले. त्यांना विनम्र अभिवादन.

Comments
Add Comment