Sunday, October 12, 2025

समुपदेशन किशोरवयीन मुलांचे

समुपदेशन किशोरवयीन मुलांचे

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे

मानवाचे सामाजिक जीवन व मनामध्ये त्याच्या विचारांची देवाणघेवाण, आदान-प्रदान, संपर्क, विशिष्ट संबंध अत्यंत मोलाचे असतात. मग ते संबंध कौटुंबिक, व्यवहारी किंवा सामाजिक असोत! यामध्ये सर्वात महत्त्वाचे असते ते ‘मानसिक आरोग्य.’ माणूस हा सामाजिक प्राणी आहे. समाजामध्ये तो मिसळतो आणि त्याचप्रमाणे तो वागतो. नवनवीन कौशल्य, विकास कृतीत आणतो. वैचारिक प्रगल्भता, परिपक्वता आणतो. पण त्याचप्रमाणे तो माणूस मनाने खंबीर नसेल तर...तर मात्र त्याचं मन कमकुवत होत जातं आणि या कमकुवत मनाचा आरोग्य जपण्यासाठी समुपदेशन ही काळाची गरज झालेली आहे. आई-वडिलांची भांडणं, विरह, दारिद्र्य, व्यसनांधता, टोकाचे निर्णय मुलांच्या मनावर बिंबली जातात. द्वेष अंधश्रद्धा गैरसमज भांडणांचे खोलवर झालेले परिणाम त्यामुळे या मुलांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि वर्तन उद्धट आक्रमक आक्रस्थळेपणा आतताईपणा प्रक्षोभक असतात.

आज अनेक शारीरिक व्याधींचे मूळ या बळावलेल्या व्याधी व मानसिक आजारांवर आहे. उदा. माणूस प्रत्येक गोष्टीचं मनावर दडपण घेतो आणि काही आजारांकडे देखील दुर्लक्ष करतो. त्यातून डिमेन्सिया, अल्झायमर डिप्रेशन, सायको, ट्यूमर असे अनेक आजार बळावतात. वेळीच त्यांना आळा घातला नाही. त्यावर संशोधन करून वैद्यकीय तपासणी करून त्या भावभावनांना बांध घातला नाही तर त्या वाहवत जातात. त्या भावनांचा निचरा करावा लागतो. त्यासाठी आपण पाहणार आहोत किशोरवयीन बालकांचे समुपदेशन!

एका अत्यंत महत्त्वाच्या नामांकित संस्थेमध्ये समुपदेशनाचे हे कार्य मी करत असताना अनेक व्यक्तिमत्त्व समोर आली. लहानपणापासून प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणारे. समस्याप्रधान मुले, ती समस्या मनावर उमटत गेल्यामुळे मानसिक आरोग्य धोक्यात येणारे. पण तरुणाईच्या उंबरठ्यावर पायरीवर असलेले ही मुलं स्वच्छंदी बागडण्याच्या वयात काळजीने पोखरलेलं! मन वाळवी सारखं आयुष्याला लागलेलं, हे मनाचे दारिद्र्य पुसून टाकण्यासाठी स्वच्छता ही मनापासून केली पाहिजे. मन आणि शरीर यांचे सुंदर नातं आहे. या नाण्याच्या दोन बाजू एकमेकांवर अवलंबून आहेत, म्हणून शरीराच्या स्वच्छतेबरोबर मनाची प्रसन्नता देखील तितकीच महत्त्वाची आहे. सर्वप्रथम हे मी त्यांना पटवून दिले. जर तुमचं शरीर स्वच्छ असेल तर तुमचं मन सुद्धा प्रसन्न राहील. तुम्ही प्रार्थना केली तर मनाची अांघोळ होईल. त्याबरोबर दररोज स्वच्छता ठेवली तर शरीराची अांघोळ होईल. हे देखील त्यांना पटवून दिले. रोजच्या रोज अांघोळ, स्वच्छतेचे महत्त्व, दात घासणे, वाढलेली नखे कापणे, वाढलेले केस कापणे, वेळच्या वेळी स्वच्छ वस्त्र परिधान करणं.

अशा प्रकारे त्यांना आपण स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. पौष्टिक आहार म्हणजे काय? काय नेमकं खाल्लं पाहिजे! कसं वागलं पाहिजे? काय बोललं पाहिजे? आपल्यासमोर गुरुजनांचा, मोठ्यांचा आदर, बोलण्याची पद्धत, विचारांची योग्य दिशा पटवून दिली. आपल्या जीवनात आत्मविश्वासाचे, सकारात्मकतेचे पडसाद असे आपल्या अंगलहरीवर, बालमनावर कोरले जातात, उमटतात आणि त्यातून आपल्या पेशी चांगलं ते उत्तेजित करतात, चांगल्याची सवय जोपासण्याची सवय लावणे महत्त्वाचे आहे! त्यांचे इतर मित्राशी, शिक्षकांशी, कुटुंबाशी वर्तन कसे आहे ते तपासून पाहून त्यावर उपाययोजना, त्यांचे विचार, भाषा, प्रगती, दृष्टिकोन यावर अभ्यास. जिव्हाळ्याचे नाते, कौटुंबिक नाते दृढ कसे करता येईल? किंवा बिघडलेल्या नात्यांना चांगलं वळण कसे देता येईल? हे त्यातून फोकस केले. त्यांच्या मनात असलेली शिक्षणाविषयीची भीती नष्ट करावी लागली. शिक्षणाविषयी प्रेम, आनंद जपणूक करणे कटाक्षाने मी माझ्या अभ्यासक्रमात आणले तुमचे मन. मनाची जडणघडण सुखदुःखावर केलेली मात. अपेक्षांचं ओझं, दडपण किंवा एकदम बेदरकार, बिनधास्त वृत्ती कुठे तरी, तर कोणी अत्यंत भाबडे हळवे हळवे पण असे काहीसे दिसून आले. पण या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या होत्या, की ज्यावर मला अभ्यास करून त्यांच्या मनाची मशागत करायची.

मी ठरवले रोज सुंदर दोन बोधकथा, सुविचार, काव्य, म्हणी, सुभाषित, स्फूर्तिदायी, प्रेरणादायी गीते यातून त्यांना बोलतं करायचं! एकदा का छान बोलायला लागली, की त्यांना आपणहून आपसूकच आपल्या स्वतःविषयी बोलावसं वाटेल, काही करावसं वाटेल आणि ते चांगलंच असेल ही त्यांची वृत्ती आणि मनोबल या दृष्टीने मी प्रयत्न करू लागले. कित्येकांना तर आई नाही, आईचं प्रेम माहीत नाही, तर कित्येकांना वडील नाहीत, व्यसनांधतेमध्ये केवळ जन्म देऊन असेच वाऱ्यावर सोडलेले. मग या मुलांच्या मनात कुटुंब, समाज, नाती संबंध, जीवन, आयुष्य या सगळ्याविषयी आपल्या प्रशिक्षणातून सकारात्मकता कशी येईल? या दृष्टीने मी प्रयत्न सुरू केले. प्रत्येक मुलाचा केस स्टडी! प्रत्येक मुलाची वेगळी कथा!! वेगळी उपाययोजना आखणे त्या नियोजनबद्ध अमलात आणणे, हे प्रायोगिक संशोधन महत्त्वाचे होते. त्या पद्धतीने ते केले, वेळप्रसंगी वैयक्तिक समजावून मानसिक बळ वाढवून त्यांच्यात आत्मविश्वासाची पेरणी केली. नैराश्याचे तन उपटून त्यांचा मनातला राग, मानसिक आंदोलने, समस्येचा निचरा केला. हसत्या खेळत्या व यामध्ये जबाबदारी घेणं किंवा नाहीच घेणार.

एक तर या टोकाला किंवा त्या टोकाला अशी द्विधा मनस्थितीत असणारी ही किशोरवयीन बाल्यावस्था. त्यात शरीरात, मनात होणारे विविध बदल. मानसिक, शारीरिक, आर्थिक अस्थिरता, शिक्षणातील परिवर्तन, स्पर्धा, आव्हाने आणि जीवनाकडे बघण्याचा कल या दृष्टीने सखोल प्रयत्न करणे. त्याचप्रमाणे त्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी प्रेरणा देणे. एकल पालकत्व असलेल्या १५ ते १८ वयोगटातील मुलांचे समुपदेशन एक अत्यंत जिकिरीचं, जबाबदारीचं पण अत्यंत महत्त्वाचं सत्कार्य आहे.

Comments
Add Comment