
नवी दिल्ली : आर्यन खान विरोधात झालेल्या चर्चित ड्रग्ज प्रकरणात तपास करणारे नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागाचे माजी प्रमुख समीर वानखेडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शित असलेल्या "Bads ऑफ बॉलीवुड" या वेब सिरीजविरोधात त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
"Bads ऑफ बॉलीवुड" ही सीरिज शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन हाऊसने तयार केली आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. या मालिकेत आपली प्रतिमा जाणूनबुजून मलिन करण्यात आली, तसेच काही दृश्यांमधून पोलिस अधिकाऱ्यांचा अपमान करण्यात आला असल्याचा आरोप समीर वानखेडे यांनी केला आहे. समीर वानखेडेंनी मानहानीचा खटला दाखल करत न्यायालयात दाद मागितली आहे. तसेच समीर वानखेडे यांनी त्यांच्या वकिलांमार्फत नेटफ्लिक्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटला नोटीस पाठवली असून, कुटुंबाच्या सुरक्षेसाठी सरकारकडे संरक्षणाची मागणी केली आहे.
वानखेडे यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “या प्रकरणामुळे माझ्या कुटुंबाला पाकिस्तान, यूएई आणि काही इतर देशांमधून धमकीचे ईमेल्स येत आहेत. मात्र आम्ही घाबरणार नाही. आम्ही याचिका मागे घेणार नाही, कारण ही लढाई सत्यासाठी आहे.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की आर्यन खान प्रकरण” हे केवळ एकच प्रकरण नव्हतं — त्या तपासात अनेक आरोपी सहभागी होते... “मी माझं काम केलं, आणि आजही मी लढण्यासाठी तयार आहे. मी कधीच आव्हानांना घाबरलो नाही, आणि सत्य नक्कीच बाहेर येईल,” असे ठाम शब्दांत त्यांनी सांगितले. सीरिजमध्ये ‘सत्यमेव जयते’ सारख्या घोषवाक्याची खिल्ली उडवण्यात आली असून, त्यामुळे संपूर्ण पोलिस दलाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न झाला आहे, असा आरोप वानखेडे यांनी केला आहे. त्यामुळे वानखेडेंनी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
न्यायालयीन चौकशी
दिल्ली उच्च न्यायालयाने वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि इतरांना समन्स बजावले आहे. उच्च न्यायालयाने रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि इतरांना सात दिवसांत त्यांचे उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. याचिकेत तीन दिवसांत उत्तर मागितले असून . या प्रकरणाची सुनावणी ३० ऑक्टोबर रोजी होईल.