Saturday, October 11, 2025

नाटकाच्या प्रयोगासाठी ‘उदकशांत’ करताना...

नाटकाच्या प्रयोगासाठी ‘उदकशांत’ करताना...

राजरंग : राज चिंचणकर

नाटक हे नाटक असते आणि नाटकांच्या बाबतीत व्यावसायिक व प्रायोगिक असा भेदभाव केला जाऊ नये, अशी तमाम नाटकमंडळींची अपेक्षा असली तरी रंगमंचावर प्रयोग सादर करण्याची वेळ आल्यावर त्यातला फरक ठळकपणे स्पष्ट होत जातो. कितीही झाले तरी व्यावसायिक नाटकाच्या मागे सक्षम निर्माता उभा असतो; मात्र प्रायोगिक नाटकाची मंडळी पदरमोड करून रंगमंचावर नाटक उभे करत असतात. या दोन्ही प्रकारांत रसिकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादातही तफावत दिसून येते. प्रयोग सादर करण्याच्या बाबतीत आणि प्रेक्षकसंख्येच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास, व्यावसायिक व प्रायोगिक नाटकांची गणिते अगदी दोन टोकाची ठरतात.

व्यावसायिक नाटकांचा अवकाश मोठा असतो आणि त्यात आघाडीचे काही कलावंत असतात. त्यामुळे रसिकजन या नाटकांकडे सहजतेने आकर्षित होतात. पण प्रायोगिक नाटकांच्या बाबतीत तसे काही घडत नसल्याने, या नाटकांची प्रेक्षकसंख्या मर्यादितच राहते. वास्तविक, प्रायोगिक रंगभूमीवर सादर झालेली अनेक नाटके व्यावसायिक रंगभूमीवर आली आहेत. साहजिकच ती अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचली आहेत. पण अशी उदाहरणे कमी आहेत. एकूणच, व्यावसायिक व प्रायोगिक नाटकांना आर्थिक मापात तोलताना, केवळ निधीअभावी प्रायोगिक नाटकांवर गंडांतर येते; हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो.

आता उदाहरणच घ्यायचे तर प्रायोगिक रंगभूमीवर सध्या सुरू असलेल्या ‘उदकशांत’ या दीर्घांकाचे घ्यावे लागेल. डॉ. समीर मोने लिखित व मिलिंद अधिकारी दिग्दर्शित या दीर्घांकाचे आतापर्यंत नऊ प्रयोग झाले आहेत. ज्या रसिकांनी हे नाटक पहिले आहे; त्यांच्याकडून या नाटकाबद्दल चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. मात्र एकंदर गणिते जुळवताना, केवळ निधीअभावी हे नाटक पुढे सादर होण्याची शक्यता धूसर होत चालल्याचे सूतोवाच या नाटकाच्या मंडळींकडून करण्यात येत आहे. साधारणतः सकारात्मक ऊर्जेसाठी; तसेच मनःशांती, समृद्धी आदी गोष्टींसाठी ‘उदकशांत’ करण्याची प्रथा आहे. त्यानुसार, आता या नाटकाच्या प्रयोगासाठीच ‘उदकशांत’ करण्याची वेळ या मंडळींवर येऊन ठेपली आहे.

या ‘उदकशांत’ दीर्घांकात मांडलेला मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. बौद्धिक अक्षमता असणारे मूल जन्माला येणे ही तशी दुर्दैवी घटना. त्या मुलाचा पुढे सांभाळ करताना त्या पालकांना अनंत अडचणी येत असल्या तरी आपल्या अपत्याच्या प्रेमापोटी ते सर्वकाही निभावून नेतात. दुसरी शक्यता अशी की जर ते मूल दगावले; तर पुढे सगळ्या गोष्टी नीट होतील का किंवा पुढे त्या दांपत्याचा संसार पुन्हा नव्याने उभा राहू शकेल का; असे अनेक प्रश्न निर्माण होत जातात. सिद्धहस्त लेखक जयवंत दळवी यांच्या ‘ऋणानुबंध’ या कादंबरीतूनही हा विषय मांडला गेला आहे. याच कादंबरीवरून व्यावसायिक रंगभूमीवर ‘नातीगोती’ हे नाटक आले होते आणि खूप गाजले होते. याचीच पुढची पायरी म्हणजे ‘उदकशांत’ हा दीर्घांक...!

‘उदकशांत’ या दीर्घांकात, त्या दांपत्याच्या गतिमंद मुलाचे निधन झाल्याच्या घटनेला आता एक वर्ष झाले आहे. परंतु ते दोघेही त्याच्या आठवणी विसरू शकत नाहीत. ते मूल गेल्याची जाणीव यातल्या आईला आहे; मात्र वडील ते सत्य स्वीकारायलाच तयार नाहीत. या दोघांच्या जीवनावर त्या मुलाची गडद छाया पडलेली आहे आणि ती त्यांना सुखाने जगू देत नाही. या पार्श्वभूमीवर, एका पावसाळी रात्री घडणाऱ्या त्या दोघांच्या भावनिक संघर्षाची कहाणी म्हणजे ‘उदकशांत’ हा दीर्घांक आहे. आता रंजन करण्याच्या दृष्टीने नाटकाचा हा प्लॉट जबरदस्तच म्हणायला हवा. या नाटकाचे सादरीकरणही तितकेच जोरकस होत आहे. मात्र आता नऊ प्रयोग झाले असताना, या नाटकावर पडदा पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ‘उदकशांत’ या दीर्घांकाची निर्मिती ‘तिहाई कलासाधक संस्था, डोंबिवली’ यांनी केली आहे. डॉ. समीर मोने यांनी हा दीर्घांक लिहिला असून, दिग्दर्शन व नेपथ्याची जबाबदारी मिलिंद अधिकारी यांनी सांभाळली आहे. यात प्रतीक खिसमतराव, श्रद्धा भालेकर, धनंजय धुमाळ, मीनाक्षी जोशी व देवेश काळे हे कलाकार भूमिका साकारत आहेत. नटश्रेष्ठ शरद तळवलकर स्मृती करंडक स्पर्धेत या दीर्घांकाला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले असून, नाट्यसृष्टीत हे नाटक चर्चेत आहे.

एकूणच या नाटकाच्या सद्यस्थितीबद्दल बोलताना, या नाटकाच्या निर्मितीची धुरा वाहणारा रंगकर्मी व दिग्दर्शक मिलिंद अधिकारी म्हणतो, “नाटक हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. गेली अनेक वर्षे सातत्याने मी नाटक करत आहे. नाटक करणे म्हणजे नाटकाची संहिता लिहून घेणे किंवा मिळालेल्या संहितेतली एक संहिता निवडून ती सादर करण्यासाठी लोक गोळा करणे आणि मग दिग्दर्शन करून, नाटक उभे करून स्पर्धेत त्याचा प्रयोग करणे. स्पर्धेत ते नाटक नंबरात आले की त्याचे अजून प्रयोग करण्यासाठी प्रयत्न करणे. त्यानंतर मात्र कसेबसे पाच-सहा प्रयोग करून खिशातले पैसे संपले म्हणून नाटकाचे प्रयोग थांबवणे.

या प्रयोग करण्याच्या पुढच्या प्रक्रियेचाच कंटाळा येतो; कारण एक प्रयोग करण्यासाठी नाट्यगृहाचे भाडे, प्रकाशयोजना, नेपथ्य या सगळ्याचा खर्च करायचा आणि प्रेक्षक यावेत यासाठी तिकीट विक्री करत फिरायचे. अर्थातच ओळखीतल्या लोकांना तिकिटे द्यायची; त्यांची वेगवेगळी कारणे, नकार ऐकायचे वगैरे वगैरे. प्रयोग मिळाले तर सोपे आहे; पण प्रयोग मिळवण्याच्या बाबतीतही आनंदीआनंदच आहे. एकूणच, नाटक करणे सोपे वाटत असले तरी ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरवण्यासाठी उपसावे लागणारे कष्ट अपरंपार आहेत. ‘उदकशांत’ या दीर्घांकाच्या निमित्ताने हे सर्व पुन्हा एकदा अनुभवले. या दीर्घांकाचे आतापर्यंत आम्ही नऊ प्रयोग केले आहेत; पण निधीअभावी यापुढे आम्ही प्रयोग करू शकू असे वाटत नाही”.

Comments
Add Comment