
पाचवा वेद : भालचंद्र कुबल
यालेखाचं शीर्षक मुद्दामहून हेच ठेवण्यामागचं कारण असं की परीक्षक म्हणून एकदा का तुम्ही त्या पदाचा झगा (खरंतर डगला) चढवलात की इलाज आणि नाईलाज तुमच्या झग्यातून अनाहूतपणे शिरलेल्या झुरळासारखा सुळसुळू लागतो. या प्रसंगाची कल्पनाही करवत नाही, इतके तुम्ही बैचेन असता आणि ती बैचेनी चेहऱ्यावर दाखवायची मुभा तुम्हाला नसते. उसासा टाकत “छान झालं…!” म्हणण्यावाचून गत्यंतरही नसते.
टी. के. टोपे नाईट कॉलेजची शुभोजित, डीएव्ही भांडुपची रवांडा, सिद्धार्थ आनंद भवनची सुपर वुमन नंदा, बिर्ला कॉलेजची अय बेंजो, कीर्तीची आवाज कुणाचा, प्रगती कॉलेजज डोंबिवलीची घाबरलेला हिटलर, शंकर नारायण कॉलेजची हवामहल, एनकेटीची वॉट इज सदमा, भवन्स अंधेरीची प्रतीक्षायान ह्या एकांकिका म्हणजे सुळसुळणारी झुरळं होती. झटकून मोकळं व्हावं इतपत स्थिती यापैकी काही एकांकिकानी आणली होती. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, या अाविर्भावात आम्ही तिघे परीक्षक एकमेकांकडे पहात असू. अभिनय हा खोटा आणि तात्पुरता असतो हे विधान स्तानोस्लावस्कीने कुठेतरी परीक्षक म्हणून गेल्यानंतर नोंदवले असणार हे नक्की...! बाकी दोघांचं माहीत नाही; परंतु माझ्या व्हिज्युअल क्रायटेरीयात न बसणाऱ्या सादरीकरणांवर मी चुकूनही व्यक्त होत नव्हतो. मात्र व्यक्त होण्याचे मार्ग दोन होते. पहिला आमच्या तिघांच्या संवादांशी निगडित आणि दुसरा स्पर्धकांशी…! काही ठरावीक एकांकिका सोडल्या तर मी स्पर्धकांशी मी संवाद टाळत होतो. डॉ. श्वेता पेंडसे आणि राजन ताम्हाणे मात्र स्पर्धकांशी चर्चा करीत असतं. मी स्पर्धकांशी संवाद टाळण्याची काही कारणे आहेत आणि ती पक्की आहेत, हे मी पडताळूनही पाहिलेले आहे.

काय असतं ना की, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धाही बहुतांशी नवजात (नवोदित नव्हे) हौशी रंगकर्मींना उत्तेजना देण्याच्या हेतूने आयोजलेली असते. एकांकिका हे माध्यम भाग घेणाऱ्या ज्याला त्याला आपला पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी आणि सिरीयल्स मधल्या प्रवेशासाठीची शिडी समजली जाते. या शिडीवर चढण्याच्या प्रोसेसमधे जे त्यांच्या हाताला लागते तेच नाटक हा अॅटिट्यूड तयार झालेला या स्पर्धकांमधे आढळतो. उदाहरणार्थ गुरुवार या एकांकिकेत चार प्रोटोगॉनिस्ट (नायक) आहेत. कथाबीज, र ला र आणि ट ला ट जोडून तयार केलेल्या कवितेसारखं कृत्रिम फॅब्रिकेटेड वाटावं असं. एकांकिकेच्या अवलोकनाचे अॅनालिसिस करण्याच्या हेतूने सहज एका विद्यार्थ्याला विचारलं, “यात प्रोटोगॉनिस्ट नेमक्या चार व्यक्तिरेखांपैकी कोण आहे?” उत्तर आले, “सर, गुरुवार हाच माझा नायक आहे.” हे उत्तर अत्यंत इंटिलिजंट होतं, पण मग त्याची प्रोसेस सादरीकरणातून दिसायला नको? त्यामुळे स्वतःच्या प्रक्रियांच्या भूमिकेत अडकलेल्या या पिढीला बेसिक सायन्स ऑफ द थिएटरशी देणे-घेणेच नाही. बेसिकमधेच राडा असलेली ही हौशी रंगभूमी, चटपटीत सादरीकरण, वेगवान प्रसंग रचना, मॉब ओरीयंटेड कथानक (कथाबीज नव्हे...!) आणि ठरावीक कल्पनाशक्तीद्वारा लिमिटेशन्सच्या बाहेरचा विचार करण्यापासून वंचित ठेवणारे संपूर्ण स्ट्रक्शर…! यात एकांकिका माध्यम हरवत चाललंय म्हणून मग आपण स्पर्धकांशी संवाद टाळलेलाच बरा, या निर्णयाप्रत मी येऊन ठेपलोय. हे जरा फारच सैद्धांतिक झालंय. पण असो…!
काही एकांकिका थोडक्यात धारातीर्थी पडल्या. सीकेटी कॉलेजची किचकवध पुन्हा, सेंट जॉन कॉलेजची हॅशटॅग इनोसंट, भवन्स चौपाटीची लिंबू मिरची, मिठीबाई कॉलेजची रुक्मिणी आणि मुलुंड कॉमर्स कॉलेजची स्वातंत्र्य सौभाग्य या त्या होत. शेवटच्या ओव्हरमध्ये तीन बॉल्सवर एक रन काढायचं टार्गेट असताना सिक्सर मारण्याच्या नादात मॅच गमावलेल्या अनुभवातून नेणाऱ्या या एकांकिका होत्या. आधीच्या लेखात मी द गर्दभ गोंधळ, गुरुवार आणि वेल्लीयार संबंधी लिहिले होतेच, पण एक मान्य करावे लागेल की या तीनही एकांकिका स्पर्धेच्या सादरीकरणासाठी प्रिपेअर्ड होत्या. जस्ट मिस्ड कॅटेगरीत त्यातील दोन मोडणाऱ्या होत्या; परंतु आम्ही तिघेही नाईलाजाच्या प्रदेशात उभे होतो.
लेखनाच्या बाबतीतही तीच स्थिती होती. त्याची कारणे मी वर दिलेली आहेतच. त्यातल्या त्यात अमिग्डाला या एकांकिकेचा लेखनासाठी आणि नंदिनी निर्मल या अभिनेत्रीचा व मोहितचा अभिनयाच्या पारितोषिकासाठी विचार करावासा वाटला. अमिग्डालची लेखिका सारिका ढेरांगे आणि अभिनयाचे पारितोषिक मिळालेल्या दोघांचाही भविष्यकाळ उज्ज्वल आहे, हे मी सांगू शकतो. अमिग्डालाच्या जातकुळीच्या अनेक एकांकिका या आधी होऊन गेल्या आहेत. प्रदीप राणेंच्या किंवा रामविजय परब यांच्या एकांकितील सारे एलिमेंट्स यात होते. भूमिकांची खांदेपालट करत प्रेक्षकांना हूक करण्याच्या प्रकाराला (समीक्षकांच्या दृष्टीने लेखकांच्या गिमिकला) आम्ही परीक्षक सरावलेलो असतो. पण तरीही त्यातल्या नावीन्य शोधण्याच्या प्रयत्नात असतोच. भावना नियंत्रित करणारा बदामाच्या आकाराचा मेंदूच्या मध्यभागी असणारा अमिग्डाला भावनांचे तोल सांभाळण्यास असमर्थ ठरल्यावर निशाची होणारी ससेहोलपट या एकांकिकेच्या केंद्रस्थानी आहे.
अत्यंत संयतपणे विषयाची हाताळणी, कथासूत्राचा चढता आलेख आणि पात्रांची सुसूत्र मांडणी ही महत्त्वाची अंगे प्रसंगांत क्लिष्टता असूनही वरचढ ठरली... आणि त्यामुळे महत्त्वाची गोष्ट अशी होती की सर्वोत्कृष्ट लेखनाचा विचार या लेखिकेशिवाय दुसरा होऊच शकत नव्हता...! आता पुढे पुढे कळंत जाईल की आम्ही नाईलाजांच्या प्रदेशात कसे वावरत होतो ते…! असो. तिसरा आणि शेवटचा अंक अद्याप बाकी आहे.