
गुरुदत्त हिंदी चित्रपटसृष्टीत जिवंतपणीच आख्यायिका बनलेले व्यक्तिमत्त्व. आजही गुरुदत्त यांचे नाव घेतले की आठवतात ते त्यांचे कलात्मक चित्रपट. मग ते चौदहवी का चांद असोत की कागज के फूल, सी आय डी असोत की मिस्टर अँड मिसेस ५५, आरपार, असोत की प्यासा. त्यांच्या प्रत्येक चित्रपटात आणि चित्रपटातील प्रत्येक दृश्यात कलात्मकता दिसून येते. चित्रपट कलात्मक असूनही त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पहिली पसंती मिळत असे, म्हणूनच त्यांना कलात्मकता आणि व्यावसायिकता यांच्यात सुवर्णमध्य साधणारा संवेदनशील निर्माता दिग्दर्शक म्हटले जाते. वर उल्लेख केलेले सर्व चित्रपट हिंदी चित्रपट सृष्टीतील माईल स्टोन चित्रपट आहेत. आजही फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे चित्रपट आवर्जून दाखवले जातात. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाला समीक्षकांची तर पसंती मिळालीच पण प्रेक्षकांनीही चित्रपट डोक्यावर घेतले. ‘साहिब बिबी और गुलाम’ या चित्रपटाला तर राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले.
या चित्रपटातील गाणीही लोकप्रिय झाली. आजही ती तितकीच लोकप्रिय आहेत. मग ती बाजी चित्रपटातील आज की रात पिया दिल ना तोडो... जालमधील ये रात ये चांदणी फिर कहा... आरपारमधील बाबूजी धीरे चलना... सीआयडीमधील तर सर्वच गाणी लोकप्रिय झालीत मग ती आँखो ही आँखो मे इशारा हो गया... लेके पहला पहला प्यार... ये दिल है मुश्कील जिना यहा... मी अँड मिसेस ५५ मधील थंडी हवाये काली घटाये... प्यासा मधील जाने वो कैसे लोग थे... कागज के फूलमधील वक्तने किया क्या हसी सितम... चौदहवी का चांदमधील चौदहवी का चांद हो या आफताब हो… साहिब बिबी और गुलाम मधील ना जाओ सय्या छुडाके बैया... त्यांच्या चित्रपटातील सर्व गाणी सुमधुर होती म्हणूनच ती गाणी लोकप्रिय ठरली. केवळ गाणीच नाही तर त्यांच्या चित्रपटातील संवादही लोकप्रिय झाले. गुरुदत्त यांच्यावर बंगाली साहित्य आणि विचारांचा मोठा प्रभाव होता. हाच प्रभाव त्यांच्या चित्रपटातूनही दिसून येतो.
९ जुलै १९२५ रोजी बंगलोर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव वसंत शिवकुमार पदुकोण असे होते. जन्म जरी बंगलोर येथे झाला तरी त्यांचे बालपण पश्चिम बंगालमधील भवानीपूर येथे गेले. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांनी मॅट्रिकपर्यंतच शिक्षण घेतले. नंतर ते पुण्यात आले. तिथे प्रसिद्ध फिल्म कंपनी प्रभातमध्ये त्यांना असिस्टंट दिग्दर्शक व नृत्य दिग्दर्शक म्हणून नोकरी मिळाली. तिथेच त्यांची ओळख देव आनंद यांच्यासोबत झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि पुढे ही मैत्री इतकी घट्ट झाली की दोघांनीही एकमेकांना आपल्या चित्रपटात संधी दिली. देव आनंद यांच्या बाजी आणि जाल या चित्रपटाचे दिग्दर्शन गुरुदत्त यांनी केले तर गुरुदत्त यांनी निर्माण केलेल्या सीआयडी या चित्रपटात देव आनंद हे नायक होते.
गुरुदत्त हे एक महान चित्रपट कर्मी होते त्यासोबतच ते एक माणूस ही होते. इतर माणसांप्रमाणे त्यांच्यातही गुणदोष होते. बाजी या चित्रपटाच्या सेटवर गुरुदत्त यांची गीता रॉय या बंगाली अभिनेत्रीशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी विवाह केला. त्यांना तीन मुलेही झाली, पण दोघांचे एकमेकांशी पटले नाही. दोघात किरकोळ कारणांमुळे वाद होऊ लागला. दररोज होणारा वाद टाळण्यासाठी गीता रॉय मुलांना घेऊन घराबाहेर पडल्या, वेगळ्या राहू लागल्या. याच दरम्यान गुरुदत्त हे वहिदा रहेमान यांच्या जवळ गेल्याचे बोलले गेले. मात्र वहिदाजींना आपले करिअर करायचे असल्याने त्या या नात्यात अडकल्या नाहीत. या सर्व कारणांनी गुरुदत्त कमालीच्या डिप्रेशनमध्ये गेले आणि तो काळा दिवस उजाडला. ९ ऑक्टोबर १९६४ रोजी पत्नी गीता रॉय मुलांसह त्यांना भेटायला येणार होत्या मात्र त्या आल्या नाहीत. त्यामुळे चिडलेल्या गुरुदत्त यांनी रागाच्या भरात झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले. पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे १० ऑक्टोबर १९६४ रोजी त्यांची प्राणज्योत माळवली.
अवघ्या ३९ वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. त्यांच्या निधनानंतर प्रख्यात शायर कैफी आझमी यांनी लिहिलंय -…
‘रहनेको सदा दहरमे आता नही कोई तुम जैसे गये वैसे जाता नहीं कोई एक बार तो मौत भी घबरा गई होगी यू मौत को सिने से लगाता नहीं कोई’
- श्याम ठाणेदार (गुरुदत्त यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा विशेष लेख.)