Saturday, October 11, 2025

अकरावीच्या प्रवेशासाठी ६ हजार विद्यार्थी प्रतीक्षेत

अकरावीच्या प्रवेशासाठी ६ हजार विद्यार्थी प्रतीक्षेत

अजूनही राज्यात ८ लाख ३५ हजार जागा रिक्तच

मुंबई (प्रतिनिधी) :  शाळांचे वर्ग सुरू होऊन तीन महिने उलटले. शिक्षकांनी निम्मा अभ्यासक्रम संपवून परीक्षेच्या तयारीला सुरुवात झाली. दिवाळीच्या सुट्टीची वेळ आली. तरीही अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरूच आहे. दहा फेऱ्या पूर्ण झाल्या. राज्यात लाखो विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. तरी अचानक अकरावीची फेरी सुरू झाली आहे. यात आता सहा हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला आहे. प्रश्न हा आहे की, इतके दिवस विद्यार्थी मिळत नव्हते, मग आता हे विद्यार्थी होते तरी कुठे? हा सवाल पालक, शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.

राज्यातील अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या दहा फेऱ्यानंतरही प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक फेरी जाहीर करण्यात आली. या फेरीत ६ हजार २६२ विद्यार्थ्यांनी अर्ज केला असून त्यापैकी ५ हजार ६४१ जणांना १० ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे. म्हणजेच वर्ग सुरू होऊन तब्बल तीन महिने उलटले असतानाही प्रवेशाची प्रक्रिया थांबत नाही असेच दिसून येत आहे. या ना त्या कारणाने शालेय शिक्षण विभागाकडून हे प्रवेशाच्या फेरी सुरूच आहेत.

१५ सप्टेंबरपर्यंत दहा फेरी संपल्या होत्या. तब्बल १५ दिवसांनंतर आणखी एका फेरीचे नियोजन करत प्रवेश सुरू केले आहेत. राज्यातील ९ हजार ५५० कनिष्ठ महाविद्यालयांतील २१ लाख ७१ हजार जागांसाठी राबवलेल्या या प्रक्रियेत आतापर्यंत १३ लाख ३३ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा