Friday, October 10, 2025

ऑक्टोबरमध्ये फिरायला जायचंय तर राजस्थान आहे एकदम बेस्ट

ऑक्टोबरमध्ये फिरायला जायचंय तर राजस्थान आहे एकदम बेस्ट

मुंबई : वाळवंटाची सुवर्ण वाळू, राजवाड्यांचे भव्य ऐश्वर्य, लोककलेचा रंग, आणि संस्कृतीचा सुगंध म्हणजे आपलं राजस्थान. हे नितांत सुंदर राजस्थान जर तुम्हाला पाहायचं असेल तर ऑक्टोबर महिना हा उत्तम. या महिन्यात वातावरण जास्त गरमही नसतं आणि जास्त थंड ही नसतं. त्यामुळे तिथले किल्ले, नैसर्गिक सौंदर्य आणि आल्हाददायक वातावरण तुम्हाला नक्की आवडेल.

राजस्थान हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य. सोबत तेथील राजे आणि राजवाड्यांचा इतिहास, संस्कृती आणि स्वादिष्ट पाककृती, लोकसंगीताचे स्वर आणि कठपुतळ्यांचा खेळ, जोधपूरचा निळा रंग, जयपूरची गुलाबी थंडी, उदयपूरचे तलाव आणि जैसलमेरचे वाळवंटी वैभव... प्रत्येक ठिकाणांना एक स्वतःचं अस्तित्वं . राजस्थानच्या प्रत्येक ठिकाणात सौंदर्य दडलंय. राजस्थान सारखं ठिकाण हे कुटुंब आणि मित्रमंडळीने सोबत फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सहलीचा खर्चही खिशाला परवडेल इतका...

राजस्थानमध्ये पहाण्यासारखी ठिकाणं...

पिचोला तलाव 

तलावांचे शहर म्हणजे उदयपूर पिचोला तलाव राजस्थानमधील उदयपूर येथे आहे. हा तलाव उदयपूरमधील सर्वात जुन्या आणि मोठ्या तलावांपैकी एक आहे. १३६२ मध्ये महाराणा लाखांच्या कारकिर्दीत बांधला गेला. तलावाच्या सुंदरतेमुळे महाराणा उदय सिंह यांना उदयपूर शहर वसवण्याची प्रेरणा मिळाली, असे म्हटले जाते.

थारचे वाळवंट

राजस्थानची सुवर्ण नगरी म्हणजे जैसलमेर.. कारण तिथली सोन्यासारखी चमकणारी वाळू... थारचे वाळवंट, ज्याला 'ग्रेट इंडियन डेझर्ट' असेही म्हणतात. हे भारतीय उपखंडातील एक मोठे वाळवंट असून ते भारत आणि पाकिस्तानमध्ये पसरलेले आहे. या वाळवंटाचा बराचसा भाग राजस्थान, गुजरात, पंजाब आणि पाकिस्तानातील काही प्रदेशांपर्यंत पसरला आहे. हे वाळवंट आपल्या सोनेरी वाळू, भव्य किल्ले आणि समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध आहेत.

पुष्कर मंदिर

पुष्करमधील ब्रह्मा मंदिर हे येथील प्रमुख मंदिर आहे, जे जगातल्या मोजक्या ब्रह्मा मंदिरांपैकी एक आहे आणि ते पवित्र पुष्कर सरोवराजवळ आहे. याव्यतिरिक्त, येथे सावित्री मंदिर, वराह मंदिर आणि आपटेश्‍वर मंदिर यांसारखी इतर महत्त्वाची मंदिरेही आहेत.

राजस्थानची खाद्य संस्कृती

डाल बाटी चुरमा, तुपापासून बनवला जाणारा घेवर, बघार, रायता, मोहनथाल, कलाकंद , बालुशाही यांसारख्या पदार्थांचा आस्वाद तुम्ही राजस्थानच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात घेऊ शकता.

राजस्थानची राजेशाही

राजस्थानला अनेक राजवाडे बघण्यासारखे आहेत. राजस्थानमधील डोंगरी किल्ल्यांचा समूह युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे, ज्यात चित्तोडगड, कुंभलगड, रणथंबोर, गागरोन, आमेर आणि जैसलमेर यांसारख्या किल्ल्यांचा समावेश आहे. हे किल्ले राजपूत राज्यांच्या भव्य वास्तुकलेचे आणि लष्करी सामर्थ्याचे प्रतीक आहेत, ज्यांची निर्मिती ८व्या ते १८व्या शतकात झाली.

ट्रिपमध्ये ॲड करा हे खास ठिकाण

रणथंभोर राष्ट्रीय उद्यान राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यात आहे, जे वाघांसाठी प्रसिद्ध आहे. ते भारतातील सर्वोत्तम व्याघ्रप्रकल्पांपैकी एक आहे. हे उद्यान सुमारे ३९२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले आहे आणि ते एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.

नैसर्गिक ठिकाणे

माउंट अबू हे राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील एक निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण आहे. ते आपल्या अप्रतिम शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेल्या दिलवाडा मंदिरांसाठी ओळखले जाते. हे ठिकाण थंड हवामान, सुंदर दृश्ये आणि जैनांचे पवित्र स्थळ असल्याने पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे आकर्षण आहे. येथे वशिष्ठ ऋषींचा आश्रम आणि गौमुख सारखी ठिकाणे आहेत.

जयपूर भेट

गुलाबी शहर म्हणजेच जयपूरला भेट दिल्यास तुम्ही सिटी पॅलेस, हवा महाल, आमेर किल्ला, जंतर मंतर, नाहरगड किल्ला, जयगड किल्ला आणि अंबर किल्ला यांसारख्या ऐतिहासिक स्थळांना भेट देऊ शकता. जयपूर हे राजस्थानची राजधानी असून, ते ऐतिहासिक इमारती, सुंदर राजवाडे आणि सांस्कृतिक वारसा यासाठी प्रसिद्ध आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा