Friday, October 10, 2025

ट्रम्प यांना मोठा झटका! 'ही' महिला ठरली शांततेच्या नोबेल पुरस्काराची मानकरी!

ट्रम्प यांना मोठा झटका! 'ही' महिला ठरली शांततेच्या नोबेल पुरस्काराची मानकरी!

ओस्लो : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार (Nobel Peace Prize) मिळेल अशी खूप मोठी चर्चा होती. "मी भारत-पाकिस्तान युद्धासह सात युद्धे थांबवली आहेत, त्यामुळे हा पुरस्कार मलाच मिळाला पाहिजे," असे जाहीर विधान ट्रम्प यांनी केले होते. त्यामुळे या वर्षी हा पुरस्कार कोणाला मिळणार, ट्रम्प यांना त्यांच्या मागणीनुसार तो मिळणार का, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात होते. पण, आता हा पुरस्कार जाहीर झाला आहे आणि त्यामुळे ट्रम्प यांना एक प्रकारे धक्काच बसला आहे.

नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे शांततेच्या नोबेल पुरस्काराची (Nobel Peace Prize) घोषणा करण्यात आली. यंदा या पुरस्कारासाठी तब्बल ३३८ उमेदवार शर्यतीत होते. या सगळ्यांना मागे टाकत, व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो या महिलेला यंदाच्या वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात येत आहे.

नोबेल समितीने शांततेच्या या मोठ्या पुरस्कारासाठी व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांची निवड केली. नोबेल समितीने याबद्दल माहिती देताना सांगितले की, मारिया यांना हा पुरस्कार लोकशाही हक्कांसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी आणि हुकूमशाहीतून शांततापूर्ण लोकशाहीकडे जाण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षासाठी देण्यात येत आहे. विशेष म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळावा यासाठी पाकिस्तान आणि इस्रायलसह अमेरिका, आर्मेनिया, अझरबैजान, माल्टा आणि कंबोडिया अशा आठ देशांनी पाठिंबा दिला होता.

कोण आहेत मारिया कोरिना मचाडो?

मारिया कोरिना मचाडो यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९६७ रोजी व्हेनेझुएलाची राजधानी कराकस येथे झाला. त्यांनी आंद्रेस बेलो कॅथोलिक विद्यापीठातून अभियांत्रिकीचे (इंजिनिअरिंगचे) शिक्षण घेतले आहे. तसेच, त्यांनी इन्स्टिट्यूटो डी एस्टुडिओस सुपीरियर्स डी अॅडमिनिस्ट्रेसिओनमधून वित्त विषयात (फायनान्स) पदवी मिळवली आहे. त्या व्हेंटे व्हेनेझुएला नावाच्या पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक आहेत. २०१८ मध्ये बीबीसीने त्यांना १०० सर्वात प्रभावशाली महिलांमध्ये आणि २०२५ मध्ये टाइम मासिकाने १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान दिले होते. निकोलस मादुरो यांच्या सरकारने त्यांना देश सोडून जाण्यास बंदी घातली होती. मात्र, मारिया यांनी या दडपशाही करणाऱ्या शासनाला थेट आव्हान दिले आणि त्यांना धमक्या, अटक आणि राजकीय छळ यांचा सामना करावा लागला. त्यांनी केलेल्या याच अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना लोकशाही हक्कांसाठीच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी आता नोबेल पुरस्काराने सन्मानित केले जात आहे.

Comments
Add Comment