Thursday, October 9, 2025

अहंकाराचा वारा न लागो

अहंकाराचा वारा न लागो

मनाचा गाभारा : अर्चना सरोदे

अहंकाराचा वारा न लागो राजसा

माझ्या विष्णुदासा भाविकांसी ।।

नामा म्हणे तया असावे कल्याण।

ज्या मुखी निधान पांडुरंग ।।

संत नामदेव महाराज पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करताना म्हणतात, ‘‘हे देवा, जे विष्णू भक्त आहेत त्यांना अहंकाराचा वारा कधीही लागू देऊ नकोस... ज्यांच्या मुखात सदैव पांडुरंगाचे नाव असते, जे पांडुरंगालाच सर्वस्व मानतात त्यांचे नेहमी कल्याण कर.नुकतीच विजयादशमी झाली. रावणाचे दहन ही झाले. व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टा सगळीकडे षड्रिपूचे दहन करा, अहंकाराचे दहन करा अशा पोस्टचा जणू पूर आला होता; परंतु केले जाते का हो खरंच दहन आपल्या अहंकाराचे? किंबहुना आपण त्यासाठी प्रयत्न तरी करतो का? हेही तितकेच महत्त्वाचे... आपण फक्त सल्ले देतो दुसऱ्यांना पण आपण ते अमलात आणतोय का हे बघतच नाही.

आपण दुसऱ्याला जेव्हा एखादा सल्ला देतो तेव्हा त्या गोष्टींबाबत आपण स्वतः किती सचोटीने वागत आहे हे पाहणे गरजेचे नाही का? कसं आहे ना प्रत्येकाला हे दाखवायचं असतं की मी किती खरा आहे, मी कधीच चुकू शकत नाही, माझे वागणे किती बरोबर आहे आणि ते सिद्ध करण्याच्या नादात आपण दुसऱ्याच्या भावना दुखावतोय याची जाणीव सुद्धा आपल्याला होत नाही. हा जो मी आहे ना यालाच म्हणतात अहंकाराचावारा लागणे.

“नम्रता विद्येचे भूषण आहे, ‘निगर्वता’ श्रीमंतीचे भूषण आहे आणि ‘क्षमा’ बलवंतांचे भूषण आहे.” परंतु अहंपणामुळे आपण नेमकं हेच विसरतो किंवा असं म्हणूयात की, आपण सरळ सरळ याकडे दुर्लक्ष करतो आणि दुसऱ्याचा द्वेष, दुसऱ्याची निंदा करण्यात स्वतःला धन्य समजतो. काय योग्य काय अयोग्य याचा कधीच विचार करत नाही. अहंकारामुळे आपल्या मनात दुसऱ्याबद्दल द्वेष निर्माण होतो. द्वेषातून क्रोधाचा जन्म होतो आणि मग माणूस अनितीने वागायला लागतो.

मानवाने नीतिनेच वागले पाहिजे नाही तर एक दिवस विद्या, यश, बल यांचा नाश होतो. म्हणून श्रीसमर्थ रामदास स्वामी म्हणतात, “प्राप्त झालेले ज्ञान ‘अहंकारामुळे’ नष्ट होते. सत्संगती धरून सद्गुणांची वृद्धी होऊन भगवद्कृपा प्राप्त होते.”

सतत दुसऱ्यांची निंदा करणे, द्वेष करणे, समोरच्याला तुच्छ लेखणे हे मनुष्याला अधोगतीच्या मार्गावर घेऊन जाते. पण काय आहे ना अहंकारी माणसाला आपण अहंकारी आहोत हे तर आधी कळले पाहिजे ना आणि जर त्याला नसेल कळत आणि कोणी समजवायला गेलं तर ते त्याला पटल तर पाहिजे ना. म्हणूनच आपल्याला अहंकाराचा वारा लागलाय का याचे आत्मपरिक्षण ज्याचं त्याने वेळोवेळी केले पाहिजे. अहंकार हा संसार, समाज, आयुष्याच्या नाशाचे कारण आहे. संत कबिरांनी आपल्या दोह्यात म्हटले आहे,

मैं मैं बडी बलाई है,

सके निकल तो निकले भाग |

कहे कबीर कब लग रहै,

रुई लपेटी आग ||’

हे मानवा अहंकार हा एक मोठा रोग आहे. त्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न कर. कारण “मी-मी” ही अशी ठिणगी आहे जी तुझं सगळं आयुष्य भस्म करून टाकेल. एक ना एक दिवस सर्वांनाच हा जीवनाचा प्रवास सोडून परलोकाचा प्रवास सुरू करायचा आहे मग कशासाठी आपण हा मी पणाचा, मोठेपणाचा अट्टाहास करतो. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता चांगले कर्म करत असताना जे नाव तुम्ही कमावता तेच चिरकाल टिकून राहतं. तुम्ही केलेली चांगली कर्मे आणि भगवंताचे नामस्मरण हेच या जगात चिरंतन राहणार आहे. मी श्रेष्ठ असल्याचा अट्टाहास करत राहणे हा देखील अहंकाराचाच एक भाग आहे. आपणच सर्वश्रेष्ठ आहोत असे समजत असताना आपल्या मनात असुरक्षिततेची भावना येत असेल, तर मग का आपण वृथा अभिमान बाळगावा आपल्या श्रेष्ठत्वाचा. अशावेळी आपण समजावे की आपल्याला अहंपणाची बाधा झाली आहे. यावर एकच उपाय तो म्हणजे स्वतःचे आत्मपरिक्षण करणे.

एखादा जर चांगल्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण लगेच कुत्सितपणे म्हणतो की त्याला ब्रम्हज्ञान प्राप्त झाले आहे. पण ब्रम्हज्ञान म्हणजे नक्की काय हो? माझं वैयक्तिक मत विचाराल तर ब्रह्मज्ञान म्हणजे षड्रिपूंचे दहन करून इंद्रियांवर विजय मिळवणे. आपल्या चुकांची कबूली, दुसऱ्यांच्या चुकांना क्षमा आणि कोणालाही तुच्छलेखणे हेच ब्रह्मज्ञान आहे. या गोष्टी समजून घेतल्या तर आपल्याला अहंकाराचा वारा कधीही लागू शकत नाही. दुसऱ्यांशी स्पर्धा न करता आपण आपली स्वतःशीच स्पर्धा केली पाहिजे. जेव्हा आपण आदराने व अदबीने वागू, मीच श्रेष्ठ आणि समोरचा तुच्छ हा अहंभाव सोडायला शिकू, दुसऱ्याची स्पर्धा न करता आत्मपरिक्षणनिस्वार्थ कर्म करायला लागू तेव्हा समजायचं आपण हळूहळू अहंकाराचे दहन करण्यात यशस्वी होत आहोत. मन:शांतीसाठी देवाचं नामस्मरण करत राहिल्याने गर्व, घमेंडअहंकार यांना आपण प्रयत्नपूर्वक दूर ठेवू शकतो. तेव्हाच आपले मन खऱ्या अर्थाने सदैव प्रसन्न राहील.

Comments
Add Comment