Friday, January 16, 2026

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार स्फोटाच्या आवाजानंतर एक घर जमीनदोस्त झाले. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अनेक जण जखमी झाले असून, त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. गावातील रहिवासी रामकुमार ऊर्फ पारसनाथ हे गावाबाहेर एक घर बांधून राहत होते. गुरुवारी संध्याकाळी सुमारे 7.30 वाजता अचानक जोरदार आवाजासह घर कोसळले. स्फोटाचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनेची माहिती मिळताच एसएसपी डॉ. गौरव ग्रोवर, एसपी सिटी चक्रपाणी त्रिपाठी आणि सीओ अयोध्या यांनी घटनास्थळी भेट दिली.

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी 5 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. अनेक जखमींवर उपचार सुरू असून, त्यात तीन लहान मुलांचाही समावेश आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, स्फोट फटाक्यांमुळे झाला असण्याची शक्यता आहे. मात्र, घटनास्थळी इंधनाच्या गॅसचा वास देखील येत असल्याने तपास सुरू आहे.काही लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बचावकार्य सुरू असून, पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे.--
Comments
Add Comment