
पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले. स्वारगेट, औंध, शिवाजी नगर या भागांमध्ये पावसाने हजेरी लावली असून दिवसा ऊन असल्याने छत्री- रेनकॉटविना बाहेर पडलेल्या नागरिकांची पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. तर पावसामुळे काही मार्गांवर वाहतूक कोंडीही झाली होती.
पुण्यातील पेठ परिसर, बाणेर, बावधन, शिवाजीनगर, औंध, स्वारगेट, धनकवडी या भागांमध्ये दुपारी तीन वाजल्यापासून पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी साडेपाचनंतर पुणे शहर- उपनगरात पावसाचा जोर ओसरला. बुधवारी पुण्यात येलो अलर्ट देण्यात आला होता. पुण्याच्या जिल्हा प्रशासनाने पावसासंदर्भात सोशल मीडियावर माहिती दिली आहे. ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने दिले आहे.