
मुंबई - सणांचा राजा अशी ओळख असलेला दिवाळी सण अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे दिवाळीच्या दरम्यान येणारे चार-पाच दिवस हे फारच शुभ मानले जातात. ज्यात धनत्रयोदशी, लक्ष्मी पूजन, भाऊबीज, दिवाळी पाडवा असे विविध कार्यक्रम असतात. हे सर्व दिवसांना शुभ मानल्यामुळे अनेकजण नवीन खरेदीसाठी दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतात. ज्यात कपडे, घरात उपयोगी वस्तू, सोने आणि चांदीचे दागिने, वाहन, घर सजावटीचे सामान अशी अनेक प्रकारची खरेदी केली जाते. त्यामुळे मुंबईतील बाजारपेठांमध्ये आता ग्राहकांची वर्दळ दिसत आहे. तसेच दुकानदारसुद्धा विविध वस्तूंवर दिवाळीनिमित्त खास सवलत देत असल्याने ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह वाढलेला दिसत आहे. मुंबईतील अशाच काही गर्दीच्या बाजारपेठा आहेत ज्या दिवाळी दरम्यान ग्राहकांनी अधिकच बहरतात. पाहुया मुंबईतील अशा काही बाजारपेठा -
भुलेश्वर बाजारपेठ - मुंबईच्या घाऊक बाजारपेठांपैकी भुलेश्वर हे एक आहे. भुलेश्वर बाजारपेठ प्रामुख्याने कमी किमतीत उत्तम दर्जाची वस्तू यासाठी प्रसिद्ध आहे. या बाजारात साड्यांची, भांड्यांची, गृहोपयोगी वस्तूंची अनेक दुकाने आहेत. दिवाळीसाठी लागणाऱ्या पणत्या, रांगोळी, सजावटीचे सामान येथे २ रुपयांपासून सुरु होते. भुलेश्वरच्या पांजरपोळ भागात साड्यांचे नवनवीन प्रकार २०० रुपयांपासून पाहायला मिळतात. तर त्या भागातील गल्ल्यांमध्ये भांड्यांची अनेक दुकाने दिसतात. ज्यात सर्व प्रकारची तांब्याची, पितळेची, स्टिलची, नॉन-स्टीक भांडी आपल्या मागणीनुसार मिळतात. त्यामुळे खरेदीसाठी कमी वेळ असेल आणि उत्तम प्रतीच्या वस्तू घ्यायच्या असतील तर भुलेश्वर हा उत्तम पर्याय आहे.
माहिम कंदीलगल्ली - मुंबईतील माहिम परिसरात दरवर्षी दिवाळी दरम्यान कंदिलाचा मोठा बाजार भरतो. या बाजारात आकाराने छोटे-मोठे, रंगीबेरंगी, कागदाचे, कापडाचे असे विविध स्वरुपाचे कंदील पाहायला मिळतात. सध्या बाजारात नवीन ट्रेण्ड कोणता आहे? त्यावर आधारीत कंदिलही इथे दिसतात. सर्वसाधारणपणे इथे विक्रीस असलेल्या कंदिलांची किंमत ५० पासून २००० रुपयांपर्यंत असते. विशेष म्हणजे व्यापारी हे कंदील स्वत:च्या हातांनी बनवतात. त्यामुळे व्यापारांच्या कलेतील कौशल्याची नाविन्यता अनुभवण्यासाठी माहिमच्या कंदीलगल्लीला भेट द्यावी.
धारावी कुंभारवाडा - देशातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीमध्ये म्हणजे धारावीमध्ये अनेक छोटे-छोटे व्यवसाय चालतात. त्यापैकी कुंभारवाडा या भागात मातीपासून विविध वस्तू बनवल्या जातात. दिवाळीमध्ये कुंभारवाड्यातील रस्त्यांवर पणत्यांची भव्य बाजारपेठ दिसते. ज्यात मातीच्या वेगवेगळ्या आकारातील पणत्या विक्रीस असतात. यात हत्तीच्या आकाराच्या, पक्ष्यांच्या आकाराच्या, २१ किंवा ११ दिव्यांची एकच मोठी पणती असे अनेक प्रकार असतात. तसेच आकर्षक दिसण्यासाठी केलेले रंगकाम आणि खड्यांनी सजवलेल्या पणत्या ५ रुपयांपासून तर साध्या मातीच्या पणत्या १ रुपयांपासून विक्रीस असतात. मुंबईतील अनेक व्यापारी येथून होलसेलमध्ये पणत्या विकत घेतात आणि आपल्या दुकानात रिटेलमध्ये विकतात.तसेच मुंबईबाहेरही अनेक बाजारपेठांमध्ये इथून पणत्या पुरवल्या जातात.