
दी लेडी बॉस : अर्चना सोंडे
नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव. देवी अन्नपूर्णा हे त्या शक्तीचं एक रूप. अन्न देणं, पोषण करणं आणि चव टिकवणं - हे सगळं एका स्त्रीच्या हातून घडतं, तेव्हा ती केवळ गृहिणी राहत नाही, ती उद्योजिका होते. अन्नपूर्णा रूपातील स्त्री उद्योजिका ‘दी टेस्ट ऑफ कोकण’ या हॉटेलच्या सह-संस्थापक शीतल कुबल आणि डॉ. माधुरी केळशीकर याला अपवाद नाहीत.
शीतल कुबल यांचा प्रवास खाद्य उद्योगाशी निगडित अनुभवातून सुरू झाला. वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये सकाळी ६ वाजल्यापासून मसाले, कैऱ्या, मिरच्या यांची खरेदी करताना त्यांचा खाद्य व्यवसायाशी गाढा संबंध वाढत गेला. दुसरीकडे, डॉ. माधुरी केळशीकर यांनी ३३ वर्षांची यशस्वी आयुर्वेदिक प्रॅक्टिस केल्यानंतर रिटायर होऊन काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला. त्यांची संकल्पना होती - आरोग्यदायी आणि पारंपरिक चवीचं सुंदर मिश्रण.
या दोघींची ओळख झाली एका साध्या जेवणातून. माधुरी मॅडमना शीतलताईंच्या हातचं जेवण इतकं आवडलं की त्यांनी एकत्र व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. टेस्ट ऑफ कोकण ही कल्पना अशा दोन वेगळ्या पार्श्वभूमीच्या स्त्रियांच्या भेटीतून जन्माला आली. एकीकडे पारंपरिक मालवणी-कोल्हापुरी रेसिपीजची जाण, तर दुसरीकडे आयुर्वेदिक तत्त्वज्ञानावर आधारित हेल्दी फूडची दृष्टी.
आज टेस्ट ऑफ कोकणमध्ये मिळतात – पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, फिश करी, स्टफ पापलेट, बोंबील फ्राय – हे सगळं शीतलताईंच्या हातचं खास. तर माधुरी मॅडम यांची भूमिका आहे हेल्दी कुकिंग पद्धती, संतुलित मसाले आणि ग्राहकांसाठी पोषणमूल्य जपणं. प्रत्येक मसाला बोरिवलीच्या युनिटमध्ये तयार होतो – नारळ फोडून, भाजून, कांडप करून. प्रत्येक बॅचवर दोघींचा स्वतःचा क्वालिटी कंट्रोल असतो.
या प्रवासाची सुरुवात माधुरी यांच्या किचनमधून झाली. ५० ऑर्डर्सपर्यंत पोहोचल्यावर त्यांनी जागा शोधली. R&D करून वाशी आणि बेलापूरमध्ये हॉटेल सुरू करण्याचा विचार झाला, पण शेवटी बोरिवली वेस्टला बाभई नाका येथे टेस्ट ऑफ कोकण सुरू झालं. आज ७५ सीट्सच्या ग्राउंड फ्लोरनंतर, फर्स्ट फ्लोरवर १३० सीट्सपर्यंत विस्तार झाला आहे. अवघ्या दोन वर्षांत टेस्ट ऑफ कोकणची ही भरारी दखल घेण्याजोगी आहे. या दोघींचा प्रवास म्हणजे चिकाटी, मेहनत आणि सातत्य यांचा स्वाद. त्या सांगतात – “हार्डवर्क आणि कन्सिस्टन्सी दाखवली तर बऱ्याच गोष्टी साध्य होतात. स्त्रियांमध्ये ती क्वालिटी असते.” त्यांच्या कुटुंबीयांची साथही या प्रवासात मोलाची ठरली आहे. शीतल यांच्या मुलांनी – वैष्णवी आणि इंद्रजीतने, तसेच माधुरी मॅडमच्या कुटुंबीयांनी या स्वप्नाला बळ दिलं.
नवरात्रात देवी अन्नपूर्णेचं स्मरण करताना, या दोघींचं कार्य हे त्या शक्तीचं आधुनिक रूप आहे. त्यांनी चव टिकवली, परंपरा जपली आणि एक यशस्वी ब्रँड उभा केला – जो केवळ जेवण देत नाही, तर कोकणाची संस्कृती आणि स्त्रीशक्तीचा अभिमानही वाढवतो.