Tuesday, October 7, 2025

दिल्लीत गोळीबाराचा थरार, नेपाळच्या चोराचा दिल्लीत एन्काउंटर

दिल्लीत गोळीबाराचा थरार, नेपाळच्या चोराचा दिल्लीत एन्काउंटर
नवी दिल्ली : नेपाळचा कुख्यात चोर भीम बहादुर जोरा दिल्लीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर दक्षिण दिल्लीच्या आस्था कुंज पार्कमध्ये दिल्ली आणि गुरुग्राम पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. भीम जोराने पोलिसांना पाहताच गोळ्या झाडल्या. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांची गोळी लागल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या भीम बहादुर जोराला दिल्लीच्या एम्समध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करुन त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी गुरुग्राममधील सेक्टर ४८ येथील भाजपच्या जिल्हाध्यक्षा ममता भारद्वाज यांच्या घरी २२ लाख रुपयांची मोठी चोरी झाली होती. पोलिस तपासात असे दिसून आले की, हा गुन्हा नेपाळी गुन्हेगार भीम बहादूर जोरा याने केला होता. या गुन्ह्यासाठी त्याने भारद्वाज यांचा घरगुती नोकर युवराज थापा याची मदत घेतली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने नोकर युवराज थापाला आधीच अटक केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या चोराचे चोरी करण्याचे प्रमाण वाढले होते. भीम बहादुर जोरावर केवळ चोरीचे आरोप नाहीत. तर त्याने दिल्लीच्या एका डॉक्टरांचीही हत्या केली होती. त्यामुळे त्याची दहशत संपूर्ण शहरात पसरल्याने पोलीस त्याच्या शोधात होते. त्याला पकडून देणाऱ्याला ५० हजार एवढा इनाम सुद्धा घोषित झाला होता. मात्र आज सकाळी पोलीस चकमकीत तो ठार झाला.
Comments
Add Comment