मुंबई : पावसाळ्यातली हिरवळ अनुभवल्यानंतर आता गुलाबी थंडीची चाहुल सर्वांना लागली आहे. त्यामुळे छान थंड हवेच्या ठिकाणी जाऊन मनाला ताजेतवाने करण्यासाठी फिरायला जायचे नियोजन करत असाल तर दिवाळीच्या सुट्टीसारखा दुसरा योग्य पर्याय नाही. यावर्षी दिवाळीत लागोपाठ आलेल्या चार दिवस सुट्ट्या आणि जोडून आलेला वीकएंड यामुळे पर्यटनाची आवड असणाऱ्यांना चांगलीच संधी मिळाली आहे. त्यामुळे सुट्टीमध्ये फिरायला जाण्यासाठी वेगवेगळ्या जागांच्या शोधात असाल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या!
कास पठार - महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून मान्यताप्राप्त असे कास पठार हे ठिकाण आहे. जे आश्चर्यकारक जैवविविधतेचे आकर्षण केंद्र आहे. जिथे ८५०हून अधिक प्रजातींच्या वन्यफुलांचा समावेश आहे. पावसाळ्यानंतर येथे फुलांना बहर येण्यास सुरुवात होते. ऑक्टोबर पर्यंत येथे हा बहर दिसतो. त्यामुळे दिवाळी सुट्टीत कास पठार फिरणे हा एक उत्तम पर्याय आहे.
मालवण - महाराष्ट्रातील मालवण हे समुद्र किनाऱ्याने वेढलेले बेट आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथील पर्यटन स्थळे प्रामुख्याने बंद असतात. तर उन्हाळ्यात समुद्रकिनाऱ्यालगतच्या वाळूमुळे अति गरम होते. त्यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दरम्यान येथे फिरायला जाणे हा योग्य पर्याय आहे. मालवण येथे समुद्रातील जलक्रीडा करण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. ज्यात स्कुबा डायविंग, बोट राईड, समुद्रात पॅरा डायविंग, रोप राईड अशा जलक्रीडांचा अनुभव घेता येतो. त्यामुळे ज्यांना समुद्राविषयी प्रेम आहे त्यांनी मालवणला भेट द्यावी.
पाचगणी - महाराष्ट्रात बरीच थंड हवेची ठिकाण आहेत. त्यापैकी पाचगणी हे एक. ज्यांना अति थंड वातावरण सहन होत नाही त्यांनी दिवाळी दरम्यान पाचगणीला भेट द्यावी. कारण, यावेळी पावसाळा नुकताच संपला असला तरी वातावरणात हिरवळ आणि हवा सौम्य असते. महत्त्वाचे म्हणजे ऑक्टोबर सरते शेवटी स्ट्रॉबेरी फळ येण्यास सुरुवात होते. त्यामुळे ताजी स्ट्रॉबेरी खायला मिळते. म्हणून पाचगणी हेदेखील फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.
औरंगाबाद - जर तुम्ही तीन किंवा चार दिवसांसाठी नियोजन करत असाल तर औरंगाबाद हा उत्तम पर्याय आहे. औरंगाबाद म्हटल्यावर डोळ्यासमोर येते ती अजिंठा-वेरुळ लेणी! या जागेला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाची मान्यता मिळाली आहे. इथे गेल्यावर अजिंठा-वेरुळसह बिबी-का-मकबरा, सोनेरी महाल, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे घृष्णेश्वर मंदिर, जायकवाडी धरण अशी विविध ठिकाणे एकाच प्रवासात पाहता येतात. ऑक्टोबरमध्ये इथेही हवामान सौम्य थंड असते. त्यामुळे या ठिकाणाला भेट द्यावी.