
पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील नवले उड्डाणपुलाच्या परिसरात झालेल्या अपघात प्रकरणामध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिला क्लीनचिट मिळाली आहे. पोलीस तपासात अपघाताच्यावेळी गौतमी पाटील ही गाडीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघातावेळी गौतमी वाहनात नव्हती, अशी माहिती पुणे पोलिसांच्या तपासातून समोर आल्याने पुणे पोलिसांकडून गौतमीला क्लीनचिट देण्यात आली आहे.
अपघाताच्यावेळी गौतमी गाडीत होती की नाही, हे तपासण्यासाठी पुणे पोलिसांनी १०० सीसीटीव्हींचे फुटेज पडताळले. त्यामध्ये अपघातावेळी गौतमीचा चालक हाच कारमध्ये उपस्थित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गौतमीच्या मालकीच्या कारने ३० सप्टेंबरला पहाटे एका रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये रिक्षाचालक सामाजी मरगळे गंभीर जखमी झाला होता. या रिक्षाचालकाच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या देत गौतमी हिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. गौतमी पाटील ही सेलिब्रिटी असल्याने तिच्याविरुद्ध कारवाई करताना चालढकल केली जात आहे, असा आरोपही झाला होता.