
मुंबई : सलमान खानसोबत पहिल्यांदाच सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम करत बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी मराठी अभिनेत्री रेणुका शहाणे यांचा आज ५९ वा वाढदिवस आहे. त्यामुळे रेणुका शहाणे यांच्यावर आज मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्रींसोबत त्यांनी काम केले असल्याने अनेकजणांनी त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
रेणुका शहाणे यांनी सिनेसृष्टीतील त्यांच्या कामाची सुरुवात ‘हाच सूनबाईचा भाऊ’ या मराठी चित्रपटाने केली. यानंतर सुरभी या दूरदर्शनवरील मालिकेत त्यांनी निवेदिकेचे काम केले. ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. यानंतर बॉलिवूडमध्ये सलमान खानची वहिनी आणि माधुरी दिक्षितची सख्खी बहीण अशी दुहेरी भूमिका असलेला हम आपके है कौन? हा चित्रपट त्यांनी केला. ज्याने त्यांची ओळख महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. तसेच 'अपने देवर की बारात लेके लो चली मै' या त्यांच्या गाण्याने आजही महाराष्ट्रातला प्रेक्षक लग्नांमध्ये थिरकत आहे.
रेणुका शहाणे यांची आई लेखिका आणि नाट्यसमीक्षक असल्यामुळे अभिनय क्षेत्राबाबत त्यांना ओळख होती. त्यांच्या आईने लिहलेली रीटा वेलणकर या कादंबरीवर त्यांनी 'रीटा' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यामुळे त्यांची ओळख केवळ अभिनेत्री म्हणून राहीली नसून दिग्दर्शिका म्हणूनही झाली आहे. आजपर्यंत त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आणि दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले आहे. ज्यातील काही कामे विशेष प्रसिद्ध आहेत.