
उल्हासनगर शासकीय वसतिगृहातील घटना
उल्हासनगर (वार्ताहर) : उल्हासनगरच्या शासकीय महिला सुधारगृहातून तब्बल १२ महिलांनी पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उल्हासनगर पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी यातील ७ महिलांना शोधून काढले आहे. पाच महिलांचा अजूनही शोध लागलेला नाही. याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील महिन्यात याच परिसरातील मुलींच्या वसतिगृहातून ८ मुलींनी पळ काढला होता.
उल्हासनगर येथे ठाणे जिल्हा महिला बालविकास विभागाच्या माध्यमातून चालविण्यात येणारे महिलांचे आणि मुलींचे वसतिगृह आहे. काही महिन्यांत येथून मुलींचे पळून जाण्याचे प्रकार उघड झाले आहेत. तसेच येथील व्यवस्थेवर अनेकदा वसतिगृहातील महिलांनी आणि मुलींनी आरोपदेखील केले आहे. सप्टेंबरमध्ये सुधारगृहात राहत असलेल्या सहा मुलींनी पळ काढला. याबाबतची माहिती मिळताच जिल्हा महिला बाल विकास विभागाने पोलिसांच्या मदतीने या मुलींची शोध मोहीम राबविली. यातील मुलींना शोधण्यात उल्हासनगर पोलिसांना यश आले.
जानेवरीमध्येही सुधारगृहाची सुरक्षा भिंत ओलांडून आणि येथील लोखंडी गज वाकवून तब्बल आठ मुलींनी पळ काढला होता. पोलिसांना मुली सापडल्यानंतर सुधारगृहाच्या व्यवस्थापनावर त्यांनी बोट ठेवत येथील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणेअंतर्गत पीटा कायद्यानुसार कारवाई केल्यानंतर या महिलांना उल्हासनगरच्या या शासकीय महिला सुधारगृहात आणून ठेवण्यात आले होते.