Monday, October 6, 2025

गैरवर्तणूक प्रकरणी दोन न्यायाधीश बडतर्फ

गैरवर्तणूक प्रकरणी दोन न्यायाधीश बडतर्फ

मुंबई (प्रतिनिधी) : सातारा जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम आणि पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश इरफान शेख या दोघांना सेवेतून गैरवर्तणूकप्रकरणी बडतर्फ करण्यात आले आहे. या दोघांनाही १ ऑक्टोबरपासून पदमुक्त होण्यास सांगितले होते.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जामीन देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप सातारा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश निकम यांच्यावर होता. त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी आधी सत्र न्यायालयात व नंतर उच्च न्यायालयात धाव घेतली होती; परंतु, दोन्ही न्यायालयांनी त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. तथापि, त्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले नव्हते.

याप्रकरणी त्यांची उच्च न्यायालय प्रशासनाच्या शिस्तपालन समितीकडून चौकशी होऊन अहवाल सादर केला होता. दुसरीकडे, शेख यांच्यावर अशाच स्वरूपाचे आरोप होते आणि त्यांचीही समितीकडून चौकशी केली होती. बॅलार्ड पिअर न्यायालयात दंडाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांच्याकडे अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्याची प्रकरणे सुनावणीसाठी होती. त्यावेळी, जप्त केलेल्या आणि मुद्देमाल म्हणून न्यायालयात सादर केलेल्या अमली पदार्थांची ते तस्करी करत होते, असा त्यांच्यावर आरोप होता.

Comments
Add Comment