
थेट देणगीद्वारे १८ लाख, तर लाडू विक्रीतून १७ लाख रुपये
कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीला नवरात्र काळात लाखोंच्या संख्येने भक्त दर्शनासाठी येतात. दर्शनासाठी येणार्या भाविकांकडून २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध भाविक-भक्तांकडून ५७ लाख १९ लाख ४४२ रुपयांचे दान प्राप्त झाले आहे.
यात धार्मिक विधीसाठी ८ लाख ९३ सहस्र ३७३ रुपये, देणगी रुपये म्हणून १८ लाख ४४ सहस्र ८५५ रुपये, अन्नदान देणगी म्हणून ५ लाख ८२ सहस्र ७४९ रुपये, लाडू विक्रीतून १७ लाख ७ सहस्र २४ रुपये, साडी देणगीतून २ लाख ५० सहस्र ७०१ रुपये, शाश्वत पूजेतून १ लाख ११ सहस्र १२ रुपये मिळाले आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने दिली आहे.
२० लाखापेक्षा अधिक भाविकांनी घेतले देवीचे दर्शन !
यंदाच्या वर्षी भाविकांची संख्या प्रचंड प्रमाणात होती. मराठवाड्यात यंदा पूरस्थिती असल्याने श्री तुळजाभवानी देवीला जाणारे अनेक भाविक तिकडे जाऊ न शकल्याने ते कोल्हापूर येथे येत होते. प्रत्येक दिवशी हा आकडा दीड लाखांपेक्षा अधिक होता. ११ दिवसांत साधारणत: २० लाख पेक्षा अधिक भाविकांनी श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. देवस्थान समितीने यंदा ‘ए.आय.’वापर केल्याने सी.सी.टि.व्ही.च्या माध्यमातून चोरांनाही पकडणे शक्य झाले.