Sunday, October 5, 2025

अल्बेनियातला रोबो मंत्री

अल्बेनियातला रोबो मंत्री

डॉ. दीपक शिकारपूर

अलीकडेच अल्बेनियाने जगातील पहिले एआय मंत्री डिएला यांची नियुक्ती केली. याबाबत जगभर चर्चा सुरू आहे. सार्वजनिक निविदांमध्ये भ्रष्टाचार कमी करणे आणि पारदर्शकता वाढवणे हा या नियुक्तीमागील उद्देश आहे. ती डेटा आणि पूर्वनिर्धारित नियमांनुसार कार्य करणारी मानवी व्यक्ती नव्हे, तर व्हर्च्युअल रोबो आहे. अल्बेनियाने भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापनाच्या समस्यांवर मात करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला.

आजचं युग पूर्णपणे डिजिटल झालंय. माहिती (डेटा), कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) आणि कनेक्टिव्हिटी या तीन घटकांचा समावेश असलेली चौथी औद्योगिक क्रांती आता जगात घडू लागली आहे. ऑटोमेशन‌’ आणि ‌‘कृत्रिम बुद्धिमत्ता ही आज सगळ्यात वेगाने वाढणारी क्षेत्र होत चालली आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, बिग डेटा ॲनॅलिसिस, रोबोटिक्स या आणि यांसारख्या घटकांमुळे संबंधित संगणकीय प्रणाली आणि यंत्रणा अधिकाधिक ऑटोनॉमस म्हणजे स्वतंत्रपणे निर्णय घेणाऱ्या आणि स्वयंभू बनत आहेत. यामध्ये चॅटबॉट वापरून मानवसदृश संभाषण हे आता जुने तंत्र झाले. या पार्श्वभूमीवर अलीकडेच एक लक्षवेधी बातमी आली.

‌‘नेटड्रॅगन‌’ या हाँगकाँगस्थित इंटरनेट कम्युनिटी कंपनीने टँग यू यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. फक्त या बातमीमध्ये एक मेख दडली आहे. श्रीयुत टँग यू हे हाडामासाचे मानव नसून हुमनॉइड यंत्रमानव आहेत. कॉर्पोरेट व्यवस्थापन आणि व्यवस्थापकीय कार्यक्षमतेला नवीन स्तरावर रूपांतरित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी ही नियुक्ती आहे. हा यंत्रमानव प्रक्रियेचा प्रवाह सुव्यवस्थित करेल, कामाची गुणवत्ता वाढवेल आणि अंमलबजावणीचा वेग सुधारेल. दैनंदिन कामकाजात तर्कशुद्ध निर्णय घेण्यास समर्थन देण्यासाठी तसेच अधिक प्रभावी जोखीम व्यवस्थापन प्रणाली सक्षम करण्यासाठी टँग यू एक रिअल-टाइम डेटा हब आणि विश्लेषणात्मक साधन म्हणूनदेखील काम करेल. या व्यतिरिक्त त्यांनी प्रतिभांचा विकास आणि सर्व कर्मचाऱ्यांसाठी योग्य आणि कार्यक्षम कार्यस्थळ सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणे अपेक्षित आहे.

आता-आतापर्यंत यंत्रमानव केवळ हॉलिवूडपटांमध्ये दिसत असत. त्यात यंत्रमानवांना कधी मानवाचा मित्र, कधी साह्यकर्ता, संकटकाळी मदत करणारा तर कधी नियंत्रण सुटल्यानंतर मानवावरच हल्ला करणारा, स्वतःच्या बुद्धीचा विकास होऊन स्वतःचेच जग निर्माण करणारा अशा स्वरूपात दाखवले गेले. पण सोफियाच्या रूपाने हे चित्रपटाच्या आभासी जगातील यंत्रमानव प्रत्यक्ष मानवी जगात अवतरले. सोफिया ही मानवसदृश स्त्री यंत्रमानव आहे. सिंगापूरच्या हॅन्सन रोबोटिक्सने बनवलेल्या या सांगकाम्याला १५ एप्रिल, २०१५ रोजी कार्यान्वित केले गेले. सौदी अरेबियाने सोफियाला नागरिकत्व दिले आहे. एका देशाचे पूर्ण नागरिकत्व मिळविणारी ‌‘सोफिया‌’ ही जगातील पहिली मानवीय रोबो आहे. भारतातही असे प्रयोग होत आहेत. तिरुवनंतपुरम येथील केटीसीटी हायर सेकेंडरी स्कूलमध्ये, आयरीस नावाच्या रोबोटिक शिक्षिकेची नियुक्ती करण्यात आली आहे. हा प्रयोग भारतातील शिक्षणक्षेत्रात एक क्रांतिकारी पाऊल मानला जातो. आयरीस ही एका मानवी शिक्षकाप्रमाणे दिसते. तिने पारंपरिक साडी परिधान केलेली आहे आणि ती चालण्यासाठी चाकांचा वापर करते. ती आवाज टेक्स्टमध्ये आणि टेक्स्ट आवाजात रूपांतरित करू शकते. यामुळे विद्यार्थ्यांना तिच्यासोबत संवाद साधणे सोपे होते. आता याच्या पुढचे पाऊल अल्बेनियामध्ये टाकले गेले आहे. अलीकडेच अल्बेनियाने जगातील पहिले एआय मंत्री डिएला यांची नियुक्ती केली. तिची जगभरात चर्चा सुरू आहे. या नियुक्तीचा मुख्य उद्देश सार्वजनिक निविदांमध्ये भ्रष्टाचार कमी करणे आणि पारदर्शकता वाढवणे हा आहे. पारंपरिक मानवी मंत्र्यांप्रमाणे ती डेटा आणि पूर्वनिर्धारित नियमांनुसार कार्य करणारी प्रत्यक्ष नव्हे, तर व्हर्च्युअल रोबो आहे.

अल्बेनियाने भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापनाच्या दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्यांवर मात करण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेतला. पंतप्रधान एडी रामा यांनी जाहीर केले की डिएला, ज्याचे अल्बेनियन भाषेत सूर्य असा अर्थ होतो, सरकारी कंत्राटे आणि सार्वजनिक खर्चाचे व्यवस्थापन करेल. यामुळे सरकारी प्रणालीमध्ये पूर्ण पारदर्शकता येईल असा त्यांचा दावा आहे. अल्बेनियाला युरोपियन युनियनमध्ये सामील व्हायचे आहे, ज्यासाठी भ्रष्टाचार कमी करणे ही एक महत्त्वाची अट आहे. त्यामुळे हा निर्णय एका महत्त्वपूर्ण उद्दिष्टाकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. अशा प्रकारे एआय मंत्र्यांच्या नियुक्तीचे काही फायदे आवर्जून सांगता येतात. पहिला महत्त्वाचा फायदा म्हणजे भ्रष्टाचारमुक्त कामकाज. एआय मंत्र्यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते मानवी पक्षपातापासून आणि भ्रष्टाचारापासून पूर्णपणे मुक्त असतात. त्यांना लाच, धमकी किंवा कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराचा धोका नसतो. यामुळे  ते सरकारी कंत्राटे आणि निविदा प्रक्रिया निष्पक्षपणे पार पाडू शकतील. अचूकता आणि कार्यक्षमता ही आणखी दोन ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. एआय मोठ्या प्रमाणात डेटाचे विश्लेषण करून जलद आणि अचूक निर्णय घेऊ शकते. यामुळे सरकारी कामकाजाची गती वाढेल, चुका कमी होतील आणि संसाधनांचा योग्य वापर होईल. अल्बेनियामध्ये डिएलाने यापूर्वीच नागरिक सेवांमध्ये मोठी मदत केली आहे.

दिवसरात्र म्हणजेच वर्षाचे ३६५ दिवस चोवीस तास उपलब्धता हे अशा प्रकारच्या नियुक्तीचे आणखी एक ठळक वैशिष्ट्य सांगता येईल. यामुळे सरकारी सेवा कधीही थांबणार नाहीत आणि नागरिकांना आवश्यक मदत तत्काळ मिळेल. येथे पारदर्शकतेचा मुद्दाही महत्त्वाचा ठरतो. एआय प्रणालीद्वारे घेतले गेलेले सर्व निर्णय आणि प्रक्रिया रेकॉर्ड केल्या जात असल्यामुळे त्यात पूर्ण पारदर्शकता राहते. यामुळे नागरिकांना आणि इतर संस्थांना सरकारी खर्चावर आणि कामकाजावर लक्ष ठेवणे सोपे होईल. एआयकडे मोठ्या प्रमाणात डेटा असतो. त्यामुळे ते विविध धोरणात्मक निर्णयांसाठी उपयुक्त माहिती देऊ शकते. उदा. आरोग्यसेवा, शहरी नियोजन, वाहतूक व्यवस्था आणि आपत्कालीन व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांमध्ये अधिक चांगले निर्णय घेण्यासाठी ते मदत करू शकते.

असे असले तरी एआय मंत्र्यांच्या नियुक्तीचे काही तोटे आणि धोकेही संभवतात. पहिला आणि महत्त्वाचा तोटा म्हणजे मानवी देखरेखीचा अभाव. एआयने घेतलेल्या निर्णयांवर मानवी देखरेख कशी असेल, हा एक मोठा प्रश्न आहे. एआय प्रणालीत काही त्रुटी किंवा चुकीची माहिती असेल, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. यातून काही नैतिक आणि संवैधानिक प्रश्नही उपस्थित होऊ शकतात. संविधानानुसार एआयला मंत्रीपद देणे योग्य आहे का, या विषयावर वादविवाद सुरू आहे. अल्बेनियाच्या संविधानानुसार मंत्री होण्यासाठी व्यक्ती प्रौढ आणि सक्षम असावी लागते. याशिवाय एआयकडून काही चूक झाली तर त्यासाठी कोणाला जबाबदार धरायचे, हा एक जटिल प्रश्न आहे. या अानुषंगाने सायबर सुरक्षेचा धोकादेखील लक्षात घ्यायला हवा. हॅकर्सने एआय प्रणालीमध्ये प्रवेश मिळवल्यास सरकारी कामकाजाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. लाखो युरोंच्या कंत्राटांवर एआयचे नियंत्रण असल्याने गैरवापर होण्याचा मोठा धोका राहतो. या निमित्ताने प्रशासकीय यंत्रणेचे एकूणच तंत्रज्ञानावर जास्त अवलंबन राहते. सरकार पूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्यास मानवी कौशल्ये आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ शकते. वीज गेली किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास संपूर्ण कामकाज ठप्प होऊ शकते. याखेरीज एआय मानवी पक्षपातापासून मुक्त असल्याचा दावा केला जात असला तरी, ते ज्या डेटावर प्रशिक्षित केले जाते, त्यातच पक्षपात असू शकतो. डेटा पक्षपाती असेल, तर एआयचे निर्णयही पक्षपाती असू शकतात.

या पार्श्वभूमीवर अल्बेनियाच्या ताज्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. सत्ताधारी पक्षाचे समर्थक याला क्रांतिकारी पाऊल मानतात, तर विरोधी पक्ष याला केवळ एक प्रसिद्धी स्टंट आणि असंवैधानिक म्हणत आहेत. एआय मंत्र्याची ही नियुक्ती जगासाठी एक नवा पायंडा निर्माण करणारा प्रयोग आहे. यामुळे भविष्यात सरकार आणि राजकारण यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर कसा होईल, याबद्दल जगभर चर्चा सुरू झाली आहे. एआयचा उपयोग केवळ प्रशासकीय कामांमध्येच नव्हे, तर धोरणात्मक निर्णय प्रक्रियेतही होऊ शकतो, हे यातून सिद्ध झाले आहे. मात्र, याचे यश आणि अपयश दोन्ही जगासाठी एक महत्त्वाचा धडा देतील.

Comments
Add Comment