Saturday, October 4, 2025

कैलास गुंफा मंदिर शिल्पकलेचा अद्वितीय नमुना

कैलास गुंफा मंदिर शिल्पकलेचा अद्वितीय नमुना

विशेष : लता गुठे

महाराष्ट्रामध्ये पुरातन काळापासून देव, धर्म, संस्कृती आणि परंपरेला विशेष स्थान आहे हे आपल्या काही पुरातन मंदिरावरील शिल्पकलेच्या नमुन्यांमुळे लक्षात येते‌. महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांतात अशी पुरातन गुफा मंदिरे आढळतात. अशी मंदिरे वेरूळ, अजंठा या ठिकाणी तर आहेच त्याबरोबर नाशिक येथील पांडवलेणी मुंबईच्या आजूबाजूलाही अशा लेण्या आहेत. आज अशाच पुरातन कैलास गुंफा मंदिराची माहिती या लेखामध्ये देत आहे. या मंदिराला धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा आहे‌. या मंदिरांतून केवळ धर्मभावना नव्हे तर त्या काळातील कलात्मक दृष्टिकोन, वास्तुकलेचा विकास, समाजजीवनाची झलक आणि इतिहासही स्पष्टपणे दिसून येतो.

प्राचीन गुंफा-मंदिरे हे बौद्ध, जैन आणि हिंदू या सनातन धर्मांची साक्ष देतात. गुंफा मंदिरे ही कडेकपारींमध्ये किंवा डोंगरांच्या खडकात खोदलेली मंदिरं आहेत. महाराष्ट्र हे भारतातील गुंफा संस्कृतीचे केंद्रस्थान मानले जाते. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकापासून इ.स. दहाव्या शतकापर्यंत अनेक गुंफा तयार झाल्या. यातील बहुतांश बौद्ध आहेत; परंतु कालांतराने हिंदू व जैन धर्मीयांनीही आपल्या पंथाच्या गुंफा निर्माण केल्या. या गुंफांमध्ये स्तूप, चैत्यगृहे, विहारे तसेच अप्रतिम शिल्पकला आढळते. गुंफा मंदिरे शतकानुशतके तशीच टिकून आहेत. आपल्या पुरातन संस्कृतीची ते साक्ष देतात. दगडात कोरली असल्यामुळे त्याची पडझड सहजासहजी होत नाही‌‌.

अखंड दगड अनेक ठिकाणी वापरलेला दिसतो. नुकतीच वेरुळ अजंठा येथे जाऊन आले त्या वेळेला वेरूळ येथील कैलास मंदिर पाहिले आणि डोळ्यांचे पारणे फिटले‌. या आधीही ते पाहिले होते; परंतु या वेळेला निवांत वेळ होता त्यामुळे त्यातील कलाकुसर, परिसर आणि मंदिराची भव्य दिव्यता व कैलाश दर्शन यामुळे यावर लेख लिहिण्याची प्रेरणा झाली.

औरंगाबादच्या जवळच असलेली वेरूळ येथील एलोरा लेणी इ.स. ५वे-१०वे शतक या कालावधीत निर्माण झाली आहे. लेण्यांची संख्या ३४ असून १२ बौद्ध, १७ हिंदू, ५ जैन आहेत. यावरून आपल्या पुरातन विविध धर्मांची एकत्र नांदणारी परंपरा दिसून येते. बौद्ध लेण्यात चैत्यगृहे व विहारे, हिंदू लेण्यात रामायण–महाभारताच्या प्रसंगांचे शिल्पांकन आणि यामध्ये सर्वात वैशिष्ट्यपूर्ण असलेले कैलास मंदिर लेणी क्रमांक १६ हे संपूर्ण डोंगरातून कोरलेले जगातील एकमेव भव्य दगडी मंदिर आहे. त्यामुळे स्थापत्यशास्त्राचा अद्वितीय नमुना म्हणून त्याकडे पाहिले जाते. कैलास मंदिर हे शिल्पकलेचे अद्भुत उदाहरण आहे. संपूर्ण पर्वत कापून निर्माण केलेले हे दगडी मंदिर स्थापत्यकलेच्या दृष्टिकोनातून जगात अद्वितीय मानले जाते.

वेरूळ येथील कैलास मंदिर-एक अद्वितीय शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्यामुळे हे मंदिर धार्मिक स्थळ नसून भारतीय शिल्पकलेची अमूल्य ठेव आहे, असे मला वाटते. मंदिर पाहताना प्राचीन शिल्पकारांच्या कौशल्याचा अभिमान वाटतो आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा ठसा त्यातून उमटतो. त्यामुळेच अभ्यासकांना कैलास मंदिर हे मानवनिर्मित चमत्कार आहे असे वाटते. दगडात कोरलेल्या या मंदिराकडे पाहताना आजही संशोधक, वास्तुविशारद आणि कला-प्रेमी आश्चर्याने थबकून जातात. कारण हे मंदिर एका अखंड खडकात कोरले गेले असून त्याची भव्यता, समृद्ध शिल्पकला आणि कलात्मकतेचा विस्तार ही या मंदिराची वैशिष्ट्ये आहेत. आपल्याकडे द्रविड स्थापत्यशैलीत बांधलेल्या अनेक वास्तू आहेत. त्यापैकी कैलास मंदिर हे एक आहे.

इ. स. ७५६ च्या सुमारास राष्ट्रकूट वंशातील राजा कृष्णराज (कृष्णा १) त्यांच्या काळामध्ये हे मंदिर बांधण्यास सुरुवात केली असे मानले जाते. पुढील दोन शतकांमध्ये या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. हे मंदिर १०० फूट उंच, १६४ फूट लांब आणि १०९ फूट रुंद एवढ्या प्रचंड परिसरात आहे. दगडातून खाली कोरत नेण्याची पद्धत वापरली गेल्यामुळे पूर्ण मंदिर कोरण्यास सुमारे १ लाख टन खडक काढून टाकावा लागला, हे भव्य कार्य तेथील शिल्पकारांच्या कौशल्याची साक्ष देणारे आहे. या मंदिरात गर्भगृह, सभामंडप, नंदी मंडप, सभोवतालची प्रदक्षिणा आणि प्रचंड आकाराचे गोपुरासदृश प्रवेशद्वार आहे. हे मंदिर भगवान शिवाला अर्पण केलेले आहे आणि हिमालयातील कैलास पर्वताचे प्रतीक म्हणून बांधलेले आहे. यामध्ये शिवलिंग असलेले गर्भगृह आहे. मुख्य देवालयाभोवती नंदी मंडप आणि खालच्या बाजूने हत्तींची रांग कोरलेले गजपृष्ठ आहे. त्यामुळे हे मंदिर एका प्रचंड हत्तींच्या समूहाने उचलले आहे, अशी कलात्मक कल्पना येथे मूर्त झाली आहे. मंदिराभोवती रामायण, महाभारत व पुराणातील प्रसंगांची शिल्परूप मांडणी केलेली आहे. तसेच विष्णूच्या दशावतारांची शिल्पे, तसेच रावणाने कैलास पर्वत उचलण्याचा प्रसंग, समुद्रमंथन इत्यादी दृष्ये सुंदरपणे कोरली गेली आहेत. मंदिरात शिवाच्या विविध रूपांचे शिल्पांकन केलेले असून, पार्वती-शिव विवाह, नटराज रूपातील शिव यांचे अप्रतिम दर्शन घडते. बाहेरच्या भिंतींवर असंख्य देवदेवतांची, अप्सरांची, गंधर्वांची शिल्पे कोरली आहेत. सभामंडपातील स्तंभ अत्यंत कोरीव व नाजूक आहेत. ते पाहताना संगमरवरी मूर्तीसारखा भास होतो.

गर्भगृहातील शिवलिंग गुढतेने भरलेले असून, मंद प्रकाशात त्याची दिव्यता अधिक मनाला भावते. कैलास मंदिर कोरण्यासाठी दीडशे वर्षे इतका कालावधी लागला. मंदिरात कुठेही चुका, विसंगती किंवा अपूर्णता आढळत नाही, हे त्या काळातील शिल्पविद्येच्या अचूकतेचे प्रतीक आहे. कैलास मंदिराची भव्य दिव्यता पाहण्यासाठी भारतभरातूनच नव्हे, तर विदेशातूनही संशोधक वास्तुशास्त्र जाणकार मंडळी येतात.

Comments
Add Comment