Sunday, October 5, 2025

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली. भीषण पावसामुळे झालेल्या भूस्खलनात किमान १८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर इतर काही घटनांतही काही जणांना जीव गमवावा लागला.

कोशी प्रांतीय पोलिस कार्यालयाचे प्रवक्ते एसएसपी दीपक पोखरेल यांनी सांगितले की, रविवारी सकाळपर्यंत, सूर्योदय नगरपालिकामध्ये भूस्खलनामुळे किमान ५ लोकांचा, मंगसेबुंग नगरपालिकामध्ये ३ लोकांचा आणि इलाम नगरपालिकामध्ये ६ लोकांचा मृत्यू झाला. देउमई नगरपालिकामध्ये ३ आणि फक्फोकथुम ग्राम परिषदेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. पोखरेल म्हणाले की, मृतांची संख्या अजून वाढू शकते, कारण नुकसानाचे मूल्यांकन सुरू आहे. सध्या आपल्याकडे ही प्राथमिक माहिती आहे.

पोलीस अधिकारी बिनोद घिरमिरे यांनी सांगितले की, दक्षिण नेपाळमध्ये वीज कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण पुरात वाहून गेल्याने मरण पावला. इलम जिल्ह्यात झालेल्या वेगवेगळ्या भूस्खलनाच्या घटनांमध्ये १४ लोक मरण पावले आहेत. नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण आणि व्यवस्थापनचे प्रवक्ते शांती महत यांनी सांगितले की, शनिवारी (४ ऑक्टोबर) ११ लोक पुरात वाहून गेले. ते अजूनही बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. नेपाळ सेना, सशस्त्र पोलिस दल आणि नेपाळ पोलिस यांना घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. नेपाळ सेनेने बचावकार्यांसाठी एक हेलिकॉप्टरही पाठवले आहे. मात्र, खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. शनिवारी सकाळपासूनच मुख्य नद्यांच्या किनाऱ्यावर वसलेल्या भागांमध्ये शोध व बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.

Comments
Add Comment