
प्रासंगिक : डॉ. विजया वाड
उदयाचल हायस्कूल, गोदरेज, विक्रोळी-पूर्व ही अशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाची शाळा ! इथे अनेकानेक वर्षे नोकरी करण्याचे भाग्य मला लाभले, हा माझ्या आयुष्यातला सुवर्णयोग. उदयाचलमध्ये परीक्षा (अगदी चाचणी टेस्ट सुद्धा) अतिशय शिस्तीने पार पडत. शिक्षक, विद्यार्थी सारेच या परीक्षांना बोर्डाच्या परीक्षेसारखे महत्त्व देत. मुख्याध्यापक डॉ. पंड्या हे बहुभाषिक विद्वान गृहस्थ उदयाचलचं नेतृत्व करीत. शिक्षण हा ‘माणूस’ म्हणून जगण्यासाठी तय्यार करणारा सुसंस्कृत घटक आहे, हा दृढ समज उदयाचलच्या हृदयात होता, नि मला त्याचा सार्थ अभिमान होता.
अशीच एक चाचणी परीक्षा होती. सहसा विद्यार्थी ही परीक्षा खूप सीरियसली घेत. बोर्डाची परीक्षा असल्यागत ! पण एक विद्यार्थी उशीर करून आला. उशीर २० मिनिटांपर्यंत चालत होता पण तेवीस मिनिटे उशीर? बाप रे बाप ! “मॅडम, मी एका विद्यार्थिनीचा जीव वाचवला आहे.” “बरं, आता पेपरला बस.” “तो सारा प्रकार राऊंडवर असलेल्या पर्यवेक्षकांनी समक्ष बघितला होता नि रीतसर हेडसरांकडे, अर्थात डॉ. पंड्या यांचेकडे पोचविला होता. ‘सुपरविजन झाल्यावर. ‘त्या’ उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांसह मला भेटावे.” हेडसरांची चिठ्ठी मजसाठी आली. ‘बातमी वर्गातून डॉ. पंड्यांपर्यंत पोहोचली तर.’ मी थोडी घाबरले. क्षणभराने स्वस्थचित झाले. मी काही गैर वागले नव्हते. डरनेका नही! मी मनात बजावले. वेळ संपली. मी उत्तरपत्रिका गोळा केल्या नि परीक्षा कक्षात दिल्या. ‘तो’ विद्यार्थी घेऊन डॉ. पंड्या यांच्याकडे गेले. “सर, येऊ का?” “ ये वीज, त्या स्टूडंटला आणलेस का?” “होय सर त्याच्यासंगेच आले आहे.” “हेडसरांनी पर्यवेक्षक बाईंना बोलावणे धाडले. त्या तत्काळ आल्या. वाटच बघत होत्या ना ! स्थानापन्न झाल्या, “हाच तो मुलगा. नियमभंग केलेला.” त्या म्हणाल्या. “का रे उशीर केला तू ? आपली शाळा त्रिखंडात प्रसिद्ध आहे. नियम, शिस्त, माणूसपण जपण्याबाबत.” “तेच सारे मी केले मोठे सर.” “काय केलेस?” “एक मुलगी रस्ता क्रॉस करीत होती मोठे सर.” “बरं, मग?” “तेवढ्यात भरधाव वेगाने येणाऱ्या स्कूटरने तिला उडवली.” “अरे बापरे!” “मोठे सर, स्कूटरवाला पळून गेला पण तिचे डोके फुटले होते हो सर.” “मग तू होतास ना?” “मी होतोच ना मोठे सर ! मला त्या मुलीस तसेच टाकून पुढे परीक्षेस येणे, ही गोष्ट जमलीच नाही.” “मग तू काय केलेस?” “प्यारा हमारा उदयाचल हे गीत नुसते कंठात नाही, मनात रुतले आहे. जितना प्यारा, उतना प्यारा, माताका आचल प्यारा हमारा उद्याचल... सर” त्या मुलाचा कंठ दाटला. “मग तू काय केलेस?” “मी तिला रिक्षात घातले नि कन्नमवार नगर येथील सरकारी इस्पितळात नेले. डोक्याला डॉक्टरांनी बँडेज बांधले, मग त्यांच्यामधूनच तिच्या वडिलांना फोन केला.” “बरं मग?” “ते आले धावतच आले.” “छान.” “त्यांच्याचकडून पैसे घेऊन रिक्षा केली. शाळेपाशी हायवेवर आल्यावर रिक्षा सोडली.” “नि बाईंनी तुला उशीर होऊनही, पेपर लिहायला दिला.” “होय सर. मी बाईंचा ऋणी आहे.” “बाईंनी योग्य तेच केले.” “होय ना सार?” तो विद्यार्थी आनंदला. “परीक्षेपेक्षा जीवनदान महत्त्वाचे आहे.” “तुम्हाला पटते ना सारे सर?” “१०० टक्के पटले. आपल्या पर्यवेक्षक बाईंनाही ते सारे ऐकून... मग पटले असेल.” “काय रे, बोर्डाची परीक्षा असती तर? तू काय केले असतेस?” “मी जीव वाचवणेच महत्त्वाचे समजलो असतो. बोर्डाची फेरपरीक्षा असतेच की ! चार महिन्यांनी ती दिली असती सर.” “शाबाश रे मेरे पठ्ठे ! अरे जीवनाची परीक्षा तू डिस्टिंक्शनने पास केलीस !” पंड्या सरांनी त्याच्या उत्तरपत्रिकेवर +५ गुण दिले ! याहून मोठे बक्षीस ते कोणते?