Saturday, October 4, 2025

नाईलाजाच्या प्रदेशातील तीन डिसेबल्स

नाईलाजाच्या प्रदेशातील तीन डिसेबल्स

भालचंद्र कुबल

यंदाच्या आय. एन. टी. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेला पन्नास वर्षे पूर्ण झाली. मी या स्पर्धेत १९७८ पासून प्रेक्षक, स्पर्धक आणि परीक्षक या तीन भूमिका पार पाडल्या आहेत. एका वर्षी आयोजकांचं झबलं चढवून साहित्य संघात स्वयंसेवकही होतो पण त्या जादूई दिवसांमध्ये भाजलेल्या लष्कराच्या भाकऱ्यांमुळेच आजवरचा अनुभव गाठता आला आणि यात रिग्रेट्स कुठेही नाहीत. आम्हां तिघा भावंडाना आयएनटीची सवय आमच्या आई-वडिलांनी लावली कारण स्पर्धा बघणं ही आता माझी सवय बनली आहे, जी तुम्हाला आंतरबाह्य घडवते, त्या माध्यमाकडे बघण्याचे बळ देते. गेल्या ४७ वर्षांत ज्या हजारों एकांकिका मला बघायला मिळाल्या त्यांचे डॉक्युमेंटेशन केले असते तर एका चिरतरुण इतिहासाचा मी बखरकार ठरलो असतो; परंतु सातत्य नसणं हेच तर खऱ्या रंगकर्मीचे लक्षण आहे, हे आज ‘साठी’ उलटल्यावर कळतंय. मधल्या वर्षांचे गॅप्स फिलअप करता करता आयएनटी चक्क कार्पोरेट झाल्याचं पाहिलं आणि ती स्पर्धा आता आयएनटी आदित्य बिर्ला सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (INTABCPA) झालीय. मला यंदा दुसऱ्यांदा परीक्षणाची संधी मिळाली. आता परीक्षणाचा फॉरमॅट थोडा बदललाय.

पूर्वी तालीम स्वरुपातील जवळपास ६० एकांकिकांच्या सादरीकरणातून वीस एकांकिका निवडल्या जात आणि त्यानंतर वीसातून पाच निवडून त्यांची अंतिम फेरी होत असे. आता महाविद्यालयांच्या युनिव्हर्सिटी झाल्या, नॅक नावाचं मानांकन महाविद्यालयांच्या मागे चिकटलं, सेमिस्टर सिस्टीमने तर वैद्यकीय आणि इंजिनीअरिंग महाविद्यालयीन एकांकिकांच्या एन्ट्रीच बंद केल्या. कॉलेजची संस्कृती असेल, तर या स्पर्धांना निधी मिळतो. अन्यथा मुंबई विद्यापीठाच्या ‘युवक महोत्सवात’ सहभागी होण्याचा अग्रक्रम प्रत्येक महाविद्यालयाला देण्यावाचून गत्यंतर नसतं. शेवटी इव्हेंट म्हटला की ग्लॅमर नको का? युथ फेस्टीवल आणि ग्लॅमरचा छत्तीसचा आकडा. नियमांची भरमसाठ यादी, नको तिथे शिस्तीचा बडगा, अतीउत्साही प्राध्यापकांची लुडबुड आणि कधीही न मिळणाऱ्या शैक्षणिक सवलतींचा परिणाम आयएनटीच्या एकांकिका स्पर्धेवर झाला नसता, तर नवलच होतं…! बारा-तेरा वर्षांपूर्वी मी परीक्षक असतानाचा सहभागी होणाऱ्या महाविद्यालयांचा आकडा आणि यंदाच्या ५० व्या वर्षाच्या सहभागाच्या आकड्यात निम्म्याने घट झाली होती. जेमतेम २५ महाविद्यालये या स्पर्धेत भाग घेत होती. मुंबईच्या व्यावसायिक रंगभूमीला सातत्याने रंगकर्मी पुरवणाऱ्या या स्पर्धेला हे विचित्र ग्रहण लागलंय. त्यामुळे शेवटी या क्षेत्रात करीअर करण्यासाठी झक मारुन गाठाव्या लागणाऱ्या मुंबईला सुद्धा पुणे, नाशिक, संभाजीनगरचे ऑप्शन्स निवडावे लागलेच. तेंव्हा आयएनटीचे महत्त्व कमी झाले असले तरी ग्लॅमर मात्र अद्यापही तसेच आहे.

यंदा केवळ ग्लॅमरसच नव्हेत तर दोन अत्यंत हुशार परीक्षक माझ्या सोबत होते. एक होते राजन ताम्हाणे आणि दुसऱ्या होत्या डॉ. श्वेता पेंडसे. आजवर मी केलेल्या परीक्षणात लाभलेले हे सर्वात ग्रेट परीक्षक होते. कारण स्पर्धा परीक्षणाचा माझा गेल्या २५ वर्षांतील अनुभव इतका दिव्य आहे की त्याबद्दल कमीतकमी २५०-३०० पानी पुस्तक लिहिता येईल. असो. तर परीक्षणा दरम्यान एकही एकांकिका आमच्या चर्चेतून सुटली नाही. प्रॉप्रर नोट्स, संभावित पारितोषिकांची यादी, टेक्निकल बाबींची चर्चा यातून यंदाच्या स्पर्धेचा दर्जा पाहता पाच ऐवजी सहा एकांकिका अंतिम फेरीसाठी असाव्यात हा प्रस्ताव आयएनटीच्या स्पर्धा प्रमुख अवनी मुळे यानी मान्य केल्यामुळे आमच्यावरील दडपण थोडे कमी झाले. यंदा सहा एकांकिकांपैकी, धीवर, अमिग्डाला, द गर्दभ गोंधळ, जब वी मेटा, थिम्मक्का आणि मढं निघालंय अनुदानाला या एकापेक्षा एक सरस असे परफॉर्मन्स तालीम स्वरूपात देऊन गेल्या.

आम्ही परीक्षकांनी निवडल्या होत्या नऊ एकांकिका पण सहावरच आम्हाला समाधान मानावे लागले. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या वेल्लीयार, एम. डी.च्या गुरुवार आणि वझे केळकर महाविद्यालयाच्या द गर्दभ गोंधळ या एकांकिकांमधे शेवटच्या म्हणजे सहावी एकांकिका कुठली असावी या बद्दल तगडी फाईट होती. पण केवळ सटायर (उपहासात्मक) जॉनर कुणीच वापरला नसल्याने या एकांकिकेला झुकते माप द्यावे लागले; परंतु भरवशाच्या म्हशीला टोणगा ही म्हण या एकांकिकेने सिद्ध करून दाखवली. प्राथमिक फेरी सादर झालेल्या एकांकिकेतील काही सीन्स वाढवलेले आढळले. अनावश्यक वाक्यांची नको तिथे पेरणी केल्यामुळे, खरा पश्चाताप आमच्या माथी आला. त्या ऐवजी गुरुवार आणि वेल्लीयार बद्दल आजही सिंपथी आहे.

संपूर्ण स्पर्धेचा वृत्तांत सादर करावा या हेतूनेच मी ही दोन लेखांची मालिका लिहिणार आहे. कारण काही वर्तमानपत्रे केवळ अंतिम स्पर्धेचीच दखल घेतात काहींनी हे कॉलेज ग्लॅमर स्वतः एकांकिकांचे आयोजन करुन मार्केट करायचे ठरवल्यापासून आयएनटीची जाहिरात तेवढी घेतात, बातमीला नाकं मुरडतात. सांगायचा मुद्दा असा की आजवर न केला गेलेला प्राथमिक फेरीचा उहापोह या लेखांतून मी करायचा ठरवलाय.

यंदाच्या पहिल्याच एकांकिकेने पहिल्याच बॉलवर सिक्सर मारल्याचा आनंद ‘जब वी मेटा’ या एकांकिकेने दिला. खरंतर प्रेक्षक आणि स्पर्धकानी आम्हा तिघांचे कौतुक करायला हवे की अंतिम फेरीतले टेक्निकल इफेक्ट्स आम्ही केवळ व्हिज्युअलाईज करून “मेटा”ला अंतिम फेरीसाठी पुढे घेतले होते. रूपारेल महाविद्यालयाची हॅशटॅग कपल गोल्स जवळपास अशाच आशयाची एकांकिका पात्र निवडीमध्ये आणि टोटल इम्पॅक्ट साधताना फसत गेली. मेटा फायनलला गडबडली तर? घेतलेली रिस्क, स्पर्धकांच्या शिव्याशापांमधे कन्व्हर्ट झाली असती. पण फायनलला एका क्षणी प्रेक्षकातून “वॉव” आला आणि आम्ही टेन्शनमुक्त झालो. त्या विरुद्ध द गर्दभ गोंधळने खाल्लेली माती आम्ही अपेक्षितच केली नव्हती. एकंदर नाईलाजाच्या जमिनीवर आम्ही तिघेही ठेचकाळत, धडपडत, दमलेलो आम्ही थोडे डिसेबल झालो होतो. का? त्याचे कारण पुढल्या भागात..!

Comments
Add Comment