Saturday, October 4, 2025

मराठी रंगभूमीचा एकमेव ‘सूत्रधार’...

मराठी रंगभूमीचा एकमेव ‘सूत्रधार’...

रंगभूमीवर नाटकांचे सूत्रधार अनेक असतात, पण मराठी रंगभूमीला एखादा सूत्रधार असू शकतो का; या प्रश्नाचे उत्तर आता ‘हो’ असेच द्यावे लागेल. याचे कारण म्हणजे नाट्यसृष्टी आणि रसिकजनांच्या साक्षीनेच श्री शिवाजी मंदिरात आता तसे जाहीर झाले आहे. आता मराठी रंगभूमीचा सूत्रधार म्हणजे रंगभूमीच्या अवकाशात अनेक वर्षे उन्हाळे-पावसाळे अनुभवलेली व्यक्ती असायला हवी. त्याबरहुकूम, ज्येष्ठ नाट्यव्यवस्थापक व रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या नावावर ‘रंगभूमीचा सूत्रधार’ असे आता शिक्कामोर्तब झाले आहे.

सदैव सफेद वस्त्रप्रावरणांत नाट्यसृष्टीत संचार करणारे, स्पष्टवक्तेपणाचे मूर्तिमंत उदाहरण असलेले, नानाविध संकल्पना राबवत विविध उपक्रम करणारे, अनेक व्यक्तींचा गोतावळा सभोवती बाळगणारे आणि तरीही एकटे असलेले असे व्यक्तिमत्त्व म्हणजे अशोक मुळ्ये. ते त्यांच्या पद्धतीने जे जे उद्योग करत आले आहेत; त्यात ‘असेही एक नाट्यसंमेलन’ व ‘माझा पुरस्कार’ हे महत्त्वाचे उपक्रम आहेत. अलीकडेच त्यांनी भरवलेल्या त्यांच्या नाट्यसंमेलनात त्यांना ‘रंगभूमीचा सूत्रधार’ या विशेष नामाभिमानाने संबोधित करण्यात आले आणि अशोक मुळ्ये यांना एक पदवी बहाल झाली. ते स्वतःच सदैव बोलत राहतात असे नाही; तर त्यांच्याविषयी सुद्धा आपुलकीने बोलणारी मंडळी आहेत, हे या संमेलनाने दाखवून दिले. आता अशोक मुळ्ये यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्याविषयी इतरांच्या काय भावना आहेत; याकडे ‘राजरंग’ कॉलमच्या माध्यमातून टाकलेला हा खास दृष्टीक्षेप...

अशोक मुळ्ये म्हणतात, “हे नाट्यसंमेलन भरवताना मला विचारण्यात आले की या संमेलनाचा अध्यक्ष कोण असणार; तर मी म्हटले की एकच नाव आणि ते म्हणजे शरद पोंक्षे. खूप जिद्दीचा माणूस आहे हा. आजारपणानंतर त्याने नाटक केले ते ‘हिमालयाची सावली’. मी ते पाहायला गेलो होतो. त्याच्या हातापायाच्या काड्या झाल्या होत्या. पण नाटक पाहिल्यानंतर मी वेडा झालो. त्याचे काम पाहिले आणि तिथल्या तिथे मी परमेश्वराकडे प्रार्थना केली की माझ्या आयुष्यातले एक वर्ष त्याला देऊन टाक”. रंगकर्मी संतोष पवार याचा सन्मान करताना ते म्हणतात, “लेखक, दिग्दर्शक व अभिनेता म्हणून संतोष पवार याने आतापर्यंत ७५ नाटके केली. संतोष पवार हा मराठी रंगभूमीवरचा ‘फॅमिली डॉक्टर’ आहे आणि चंद्रकांत कुलकर्णी हे ‘स्पेशालिस्ट’ आहेत. लक्षात ठेवा; फॅमिली डॉक्टर हा नेहमी लागतो. संतोष पवारचे रंगभूमीवरचे सातत्य वाखाणण्याजोगे आहे”.

‘माझा पुरस्कार’ यंदा अशोक मुळ्ये यांनी ज्या नाटकाला दिला त्या ‘भूमिका’ या नाटकाविषयी बोलताना ते सांगतात, “क्षितिजने (पटवर्धन) हे नाटक लिहिले आहे हे खरेच वाटत नाही. या नाटकाचे लेखक म्हणून रांगणेकर, कानेटकर अशी नावे असती तर माझा विश्वास बसला असता. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शक असेल, त्या नाटकाला दुसऱ्या कशाचीही आवश्यकता लागत नाही. या नाटकात समिधा गुरुने उत्तम काम केले आहे. पुढच्या इतर पुरस्कारांमध्ये परीक्षकांनी काही चावटपणा केला नाही; तर हे संपूर्ण वर्ष तिचे आहे. मी सगळी नाटके बघून ‘माझा पुरस्कार’ देत नाही. एखादे नाटक मला आवडले; तर तिथल्या तिथे मी पुरस्कारासाठी त्या नाटकाची निवड करतो. ‘भूमिका’ या नाटकाला मी सात पुरस्कार दिले आहेत”.

आता एकूणच हे नाट्यसंमेलन व अशोक मुळ्ये यांच्याविषयी काही रंगकर्मी काय म्हणतात ते पाहा...

शरद पोंक्षे (अभिनेते) :- ‘अखिल भारतीय अशोक मुळ्ये परिषदे’चे हे नाट्यसंमेलन आहे. त्यामुळे या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष, चिटणीस, तहयात विश्वस्त हे मुळ्येकाकाच आहेत. वयाची ८० वर्षे उलटल्यानंतरही हा माणूस उत्साहाने वेगवेगळे उपक्रम राबवतो. विविध कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये येतात. ते अनेकांकडून पैसे घेतात आणि खर्च करून झाला की उरलेले पैसे त्यांना परत करतात. हे सर्वकाही कौतुकास्पदच आहे. भूमिका ही प्रत्येकाने घ्यायलाच पाहिजे. मुळ्येकाका भूमिका घेतात, त्यांना हव्या त्या भूमिकेत ते शिरतात आणि इतर लोकांना हव्या त्या भूमिका ते करायला लावतात. त्याचप्रमाणे त्यांनी मला या संमेलनात अध्यक्षाची भूमिका करायला लावली आहे.

विजय केंकरे (दिग्दर्शक) :-  मुळ्येकाकांनी मलाही असेच स्वागताध्यक्ष म्हणून बोलावले आहे. अशोक मुळ्ये हे अगदी प्रेमाने असे सोहळे करत असतात. खरे तर ते माझे मित्र आहेत आणि या मैत्रीपोटी इतकी वर्षे ते सांगतात ते आम्ही इथे येऊन करत असतो. यावर्षी त्यांनी योग्य त्या नाटकाची पुरस्कारासाठी निवड केली आहे. दरवर्षी तशी ती असतेच असे नाही. एकदा का मुळ्येकाकांकडून एखाद्या नाटकाला पुरस्कार मिळणे सुरू झाले की ते कुठला दबाव आणतात माहीत नाही; पण त्या कलाकृतीला पुढेही अनेक पुरस्कार मिळत जातात, हे विशेष...!

संतोष पवार (लेखक, दिग्दर्शक, अभिनेता) :- अशोक मुळ्येकाकांचा फोन आला; तेव्हा सन्मान स्वीकारणार आहेस का वगैरे त्यांनी काही विचारले नाही. ‘थेट यायचे आणि सन्मान स्वीकारायचा’, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. नाट्यसृष्टीत कुणाचे काय चालू आहे; याकडे त्यांचे बारीक लक्ष असते. कुठले नाटक चालते, कुठले नाटक पडते; याची त्यांना अचूक खबर असते. त्यांनी जेव्हा त्यांचे पहिले नाट्यसंमेलन केले; तेव्हा मला अध्यक्ष केले होते. पण मी अध्यक्ष असताना मला त्यांनी एक ‘स्किट’ सुद्धा करायला लावले होते. पण या सगळ्यात, आई-वडील जसे प्रेम करतात तसे मुळ्येकाकांचे प्रेम असते.

क्षितिज पटवर्धन (नाट्यलेखक) :- आम्ही आता अशा काळात जगत आहोत की आमच्या कामाबद्दल चांगले किंवा वाईट, हे ठरवण्यातच आमच्या क्षेत्रातले लोक खूप वेळ लावतात. अशावेळी एक माणूस नाटकाला येतो आणि मध्यांतरात येऊन सांगतो की ‘तुमचे नाटक मला इतके आवडले आहे की माझे सगळे पुरस्कार मी तुम्हालाच देणार आहे’. इतका मनमोकळेपणा मला प्रत्येक पावलावर मुळ्येकाकांच्या रूपाने दिसत आला आहे. आपल्या तरुणपणी काम करताना अशी एक व्यक्ती लागते की जी सांगत असते की तुम्ही जे काम करता ते योग्य मार्गावर आहे. अशी व्यक्ती म्हणजे मुळ्येकाका आहेत. पुढच्या काळात, जेव्हा अशाप्रकारचे कार्यक्रम कमी कमी होताना दिसतील; तेव्हा आपले सर्वस्व देऊन असे कार्यक्रम करणाऱ्या व्यक्तीची किंमत कळून चुकेल. अशावेळी माझ्या मनात एकच विचार येतो की आज रंगभूमीवर नाटकांचे सूत्रधार अनेक आहेत; पण मराठी रंगभूमीचा एकच सूत्रधार आहे आणि तो म्हणजे अशोक मुळ्ये...!

चंद्रकांत कुलकर्णी (दिग्दर्शक) :- कितीही वर्षांनी आलो तरी मुळ्येकाकांच्या या कार्यक्रमाचे स्वरूप तेच असते. कारण त्याची संकल्पना असलेला या मागचा नाट्यवेडा माणूस अशोक मुळ्ये हाच असतो. त्यांच्या कार्यक्रमांसोबतच ते अनेक उपक्रम राबवतात. त्यांनी नर्सेससाठी, अपघातग्रस्तांसाठी, वृद्ध कलाकारांसाठी काम केले. ते कार्यक्रम करतात म्हणजे माणसे जमवतात. माणसांनी एकत्र यावे, एकमेकांची चौकशी करावी; अशी एकप्रकारची आस्था त्यांच्या मनात असते. आता त्यांच्या वयाची ८० वर्षे उलटल्याने आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही तुमची कल्पना राबवा आणि आम्ही काहीजण मिळून तो कार्यक्रम सादर करू. पण ते त्यांना पटत नाही. वास्तविक, मुळ्येकाकांकडे असलेले इतक्या वर्षांचे इतके सारे संचित किंवा वैभव त्यांनी लेखनातून मांडले पाहिजे. आता त्यांचे सहस्रचंद्रदर्शन आपण सर्वांनी मिळून करायला हवे. एखादी नाट्यविषयक संकल्पना राबवून आपण ते करू शकतो.

Comments
Add Comment