
माणगाव-इंदापूर बायपासचे काम सुरू
माणगाव (वार्ताहर): मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्ष रखडला आहे. या रखडलेल्या महामार्गामुळे माणगाव व इंदापूर शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना व नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागतो. माणगाव व इंदापूर बायपासचे काम सुरू करण्यात आले. बायपास झाल्यावर लवकरच माणगावकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल. बायपास पूर्ण झाल्यावर आजुबाजूला मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे प्रतिपादन खा. सुनील तटकरे यांनी माणगाव बायपासच्या भूमिपूजन प्रसंगी केले.
माणगाव व इंदापूर बायपास रस्त्याचे भूमिपूजन भारतीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू समिती चेअरमन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कोकण विभाग संघटक तथा मुख्य प्रवक्ते ॲड. राजीव साबळे, रा. कॉ. कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, युवक अध्यक्ष शादाब गैबी, नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे, तालुकाध्यक्ष बाळाराम काका नवगणे यांच्यासह आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी दौरा केला तेव्हा माणगावमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी महामार्गाच्या व इतर पर्यायी मार्गाबाबत चर्चा करण्यात आली होती. त्यातील २२ कोटींचा पर्यायी मार्गाची येत्या मंगळवार पर्यंत प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. तसेच माणगावकरांचे श्रद्धास्थान असलेल्या वाकडाई देवीला जाणाऱ्या रस्त्याच्या काम सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून लवकरच मार्गी लागेल. महामार्गावरील व इतर ब्रिजच्या कामांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
एक लेन सुरू झाल्यास सणासुदीच्या काळात त्यावर वाहतूक सुरू करून वाहतूूक कोंडी टाळता येईल. मुंबई ते गोवा हा राष्ट्रीय महामार्ग जोडीला ग्रीन फील्ड एक्स्प्रेस हा सरकारने मंजूर आहे. त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुद्धा नजिकच्या कालावधीमध्ये सुरू होईल. निसर्गाने प्रचंड वरदान दिलेल्या कोकणाच्या भूमीमध्ये पर्यटनावरती आधारित असलेल्या अनेक गोष्टी करण्याची संधी उद्याच्या कालावधीमध्ये येईल. हे त्याला अनुसरून पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.
आज आपल्या सगळ्या परिसरातील शेतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत चिंताजनक बनलेला आहे. मराठवाडा किंवा राज्यांची जवळपास २२ जिल्हे हे अतिवृष्टीचे इतक्या मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे. विविध योजनांना निधी देण्याबरोबर शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे तेवढेच महत्त्वाचे आहे. चांगला पॅकेज शेतकऱ्यांना देण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून उपमुख्यमंत्री अजित पवार व सरकारने त्याकामाच्या दृष्टिकोनातून पावला उचलावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट पक्षाची भूमिका आहे. शेतकऱ्यांना योग्य ती मदत सरकारतर्फे देण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.