
युवराज अवसरमल
नावीन्याचा ध्यास घेऊन नवीन कलाकृती दिग्दर्शित करणारे अभिनेते व दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील सर्वांचे परिचयाचे आहेत. अल्याड पल्याड चित्रपटाच्या यशानंतर प्रीतम, ‘घबाडकुंड’ हा नवीन चित्रपट घेऊन येत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील छोट्या खेडेगावात त्यांचे शिक्षण झाले. छप्पर नसलेल्या शाळेत त्याचे शालेय शिक्षण झाले. नवरात्रीचा उत्सव तेथे मोठ्या प्रमाणात साजरा होत असे. त्याने सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग केले. वयाच्या २४ व्या वर्षी एम. पी. एस. सी. परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी त्याने पुणे गाठले. तेथे त्याने मित्राच्या सांगण्यावरून त्याचे फोटो दिले. तेथे शूटिंग पाहिले. त्याची आवड त्याला निर्माण झाली. तो प्रसंग त्याच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर त्याने अल्याड पल्याड या चित्रपटात काम केले व तो चित्रपट त्याने दिग्दर्शित देखील केला. तो हॉरर कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला.
अगदी कमी वयात तो चित्रपट टेक्निकली स्ट्राँग होता. त्या चित्रपटाचे शूटिंग संपल्यावर त्यांना हॉटेलला पोहोचायला सकाळ व्हायची. त्यावेळी त्यांना चकवा जाणवला होता. आता ‘घबाडकुंड’ नावाचा चित्रपट तो घेऊन येत आहे. जीवनात प्रत्येकाला वाटत की आपल्याला एखादं घबाड मिळावं व आपण श्रीमंत होऊ. अशाच प्रकारच्या घबाडाची आणि त्याचा शोध घेणाऱ्याची गोष्ट म्हणजे हा चित्रपट होय. घबाड म्हणजे अचानक धन प्राप्ती होणे, एखादी लॉटरी लागणे, नशीबच पालटणे असा त्याचा अर्थ होतो. कुंड म्हणजे विहीर किंवा पाणी जमा होणारी एखादी खोलगट जागा. या दोन्हीचे मिळून घबाडकुंड असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटासाठी भव्यदिव्य, अत्यंत खर्चिक, नेत्रदीपक सेट तयार करण्यात आला आहे.
या चित्रपटासाठी पुण्याजवळील खेड शिवापूर येथे मोठा, भव्य सेट उभारण्यात आलेला आहे. १० ते १२ हजार स्क्वेअर फुटाच्या जागेवर हा सेट उभारण्यात असलेला आहे. या सेटवर पाण्याची कुंड, खोलवर गेलेल्या विहिरी, पुरातन मंदिरे, गुहा, त्यातून जाण्या येण्याचे मार्ग गूढ निर्माण करणारी रहस्यमय दृश्ये चित्रित करण्यासाठी केला जाणार आहे. या चित्रपटात रहस्य, थरार, विनोदाच्या जोडीला नात्यांची गुंतागुंत पहायला मिळणार आहे. घबाडाचा शोध घेताना अनाहूतपणे एकमेकावर दाखवला जाणारा अविश्वास आणि त्यातून निर्माण होणारे संशयी वातावरण प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढविणारे आहे. हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना लार्जर देन लाईफ अनुभव घेता यावा यासाठी दिग्दर्शक प्रयत्न करीत आहे.