
वसई : पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये वसंत नागरी परिसरात शनिवारी चार ऑक्टोबर रोजी सकाळी धक्कादायक घटना घडली. रस्त्याला अचानक खड्डे पडू लागले. पक्का रस्ता उखडला. रस्त्याखाली असलेल्या गॅस पाईपलाईनमधून गळती सुरू झाली. गॅस पाईपलाईन सोबतच परिसरातील एक पाण्याची लाईन (जलवाहिनी) पण फुटली. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काळ्या रंगाचं घाणेरडे पाणी उसळून वर येऊ लागले. सर्वत्र चिखल झाला.
गॅस पाईपलाईन आणि पाण्याची लाईन एकाचवेळी फुटल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाण्याचे फवार उडू लागले. रस्ता फाटत असल्याचे स्थानिकांनी बघितले. हे दृश्य बघून नागरिक घाबरले. थोड्याच वेळात त्यांना परिस्थितीची जाणीव झाली. यानंतर अडथळे ठेवून रस्ता बंद करण्यात आला. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना आणि अग्निशमन दलाला फोन करुन माहिती दिली. रस्त्याच्या कडेला उभी केलेली वाहने तिथून हटवून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आली. महापालिका प्रशासनाने तातडीने संबंधित जलवाहिनीला होणारा पाणी पुरवठा थांबवण्यासाठी आवश्यक ते उपाय केले. तर अग्निशमन दलाने गॅस कंपनीच्या अभियंत्याच्या सहकार्याने वायू गळती थांबवण्यासाठी आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक ते उपाय केले. यामुळे अनर्थ टळला.