Saturday, October 4, 2025

भायखळा-सायन स्थानकांदरम्यान पायाभूत कामांसाठी ब्लॉक

भायखळा-सायन स्थानकांदरम्यान पायाभूत कामांसाठी ब्लॉक

मुंबई (प्रतिनिधी) : सायन (शीव) आणि भायखळा अशा दोन रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलाच्या कामांसाठी मध्य रेल्वेकडून दोन विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. सायन आणि भायखळा या दोन रेल्वे स्थानकांवर पादचारी पुलाच्या तुळ्या बसवण्यासाठी दोन विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहेत. दोन वेगवेगळ्या भागांमध्ये मध्य रेल्वेकडून हा रात्रकालीन विशेष ब्लॉक घेतला आहे.

भायखळा स्थानकावर पादचारी पुलाचे ४ स्टील गर्डर्स बसवण्यासाठी ११० मेट्रिक टन रोड क्रेन वापरून लावण्यात येणार आहे, तर सायन (शीव) उड्डाणपुलाजवळ पादचारी पुलाचा ४० मीटर स्पॅन बसवण्यासाठी २५० मेट्रिक टन रोड क्रेन वापरून गर्डर्स लावण्यात येणार आहे. शनिवार आणि रविवारच्या रात्री मध्य रेल्वेकडून दोन विशेष वाहतूक ब्लॉक घेत हे गर्डर्स बसवले जाणार आहेत. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना शनिवारच्या रात्रकालीन ब्लॉकमुळे मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागणार आहे.

शनिवारच्या रात्रकालीन ब्लॉक मध्यरात्री १२:३० ते पहाटे ४:३० पर्यंत घेतला जाणार आहे. हा मेगाब्लॉक भायखळा ते परळ स्थानकादरम्यान अप आणि डाऊनसोबतच धिम्या आणि जलद मार्गावरही लावला जाणार आहे. याशिवाय, दादर ते कुर्ला स्थानकादरम्यान अप आणि डाऊनसोबतच धिम्या आणि जलद मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक रेल्वेकडून शनिवारी मध्यरात्री १:१० ते पहाटे ४:१० या काळामध्ये घेतला जाणार आहे.

दादर स्थानकावरून रात्री १०:१८ या वेळेत सुटणारी दादर- कुर्ला लोकल सुद्धा धावणार नाही, तर कल्याण स्थानकावरून रात्री ११:१५ वाजता सुटणारी कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १५ डब्ब्यांची लोकल सुद्धा धावणार नाही. सोबतच, कसारा स्थानकावरून रात्री १० वाजता सुटणारी कसारा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल ठाणे स्थानकापर्यंतच चालवली जाणार आहे. जी रात्री ठाणे स्थानकावर ११:४९ वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रात्री १२:२४ वाजता सुटणारी सीएसएमटी-ठाणे ही अखेरची लोकलही धावणार नाही. ती लोकल सुद्धा रद्द करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे ४ :१९ या वेळेत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कसारा लोकल ठाणे येथून पहाटे ५ वाजून १४ मिनिटांनी सुटणार आहे. ठाणे येथून पहाटे ४ वाजून ४ मिनिटांनी सुटणारी ठाणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकलही रद्द करण्यात आली.

Comments
Add Comment