
"जागतिक स्मित हास्य दिवस" का साजरा केला जातो ? हे सविस्तर जाणून घ्या
धकाधकीमुळे अनेकजण प्रचंड त्रासले असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ताणतणाव सुरू असतात. अशा व्यस्त जीवनात एक स्मितहास्य आपला तणाव कमी करण्यासाठी मदत करते. प्रत्येकाने दिवसातून एकदा तरी मनमोकळेपणाने हसले पाहिजे. तसेच हसण्याचे महत्व समजून घेतले पाहिजे.
व्यावसायिक ग्राफिक आर्टिस्ट "हार्वे बॉल" याने "वर्ल्ड स्माईल डे" ची सुरुवात केली. या ग्राफिक आर्टिस्टने १९६३ मध्ये पहिला स्माईली फेस तयार केला. नंतर १९९९ मध्ये स्माईली फेसच्या व्यापारीकरणामुळे निर्माण झलेल्या चिंतेतून "वर्ल्ड स्माईल डे" साजरा करण्याची कल्पना "हार्वे बॉल" याने सर्वांसमोर मांडली. या दिवशी लोकांनी एकदा तरी हसावे व सर्वाशी चांगले वागावे यासाठी प्रोत्साहन दिले जाते. यामधून सर्वजण एकमेकांबरोबर गुण्यागोविंदाने वागतील व रोजच्या तणावग्रस्त आयुष्यातून एक दिवस मुक्त होतील हा त्यामागचा हेतू होता.

जगभर पहिल्यांदा १९९९ मध्ये 'स्माईली डे' साजरा करण्यात आला. इथूनच एक नवी सुरुवात झाली. दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी "जागतिक स्मित हास्य दिवस" साजरा करण्याचा निर्णय झाला. "हार्वे बॉल" यांचे २००१ मध्ये निधन झाले. नंतर त्यांच्या नावाने हार्वे बॉल वर्ल्ड स्माईल फाऊंडेशन स्थापन झाले. हे फाउंडेशन दरवर्षी वर्ल्ड स्माईल डे या उपक्रमाचे आयोजन करते.