
खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या सफाई खात्याच्यावतीने कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ पुरवण्याचे कंत्राट २१ विभागांसाठी काढण्यात येत असून उर्वरीत ३ विभागांमध्ये महापालिकेच्या वाहनांसह कामगारांच्या मदतीने केले जाणार आहे. यासाठीची निविदा आता अंतिम टप्प्यात असून निविदा खुल्या करण्यासाठीची मंजुरी प्राप्त करण्यासाठी महापालिका आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला आहे. परंतु, आयुक्तांकडून याला मंजुरीला विलंब केला जात आहे. त्यामुळे सध्याच्या कंत्राटदारांचा कालावधी संपुष्टात येत असतानाच वापरातील गाड्याही जुन्या झाल्याने याबाबतचा निर्णय तातडीने होण्याची गरज आहे,पण आता आयुक्तांकडून केल्या जाणाऱ्या विलंबामुळे यामध्ये काही गडबड आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे ही निविदा रद्द होणार की अशीच मंजुरी दिली जाणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागातील कचरा उचलण्याच्या कामांतील खासगी करणाविरोधात सर्व कामगार संघटना एकवटल्या होत्या. पण त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर यांचा विरोध मावळल्यानंतर २१ विभाग कार्यालयातील खासगीकरणाच्या कामांसाठी काढण्यात आलेल्या निविदाची प्रक्रिया पुढे जलदगतीने राबवण्यात आली . ही निविदा अंतिम करण्याच्यादृष्टीकोनातून लघुत्तम निविदाकरांची निवड करण्यासाठी आयुक्तांच्या मान्यतेसाठी दहा दिवसांपूर्वी प्रस्ताव पाठवण्यात आले. परंतु याला मंजुरी देण्यातच आयुक्त द्विधा मनस्थितीत असल्याचे दिसून येत आहे.
या निविदा संदर्भात यापूर्वी मनसेचे संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेवून यातील कंत्राटदारांचे संगनमत असल्याचा आरोप केला होता, तसेच यासाठीचा अंदाजित दर ही फुगवून दाखवण्यात आल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्याने आता आयुक्त या निविदा अंतिम करण्याबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. निविदा खुली करण्यास आयुक्तांच्या पातळीवरच निर्णय घेण्यास विलंब केला जात असल्याने प्रत्यक्षात याची निविदा कधी अंतिम होणार आणि त्यानंतर नवीन वाहने कधी येणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर ही निविदा रद्द करून फेरनिविदा मागायची असल्यास अजुन काही दिवसा जावू शकतात, त्यामुळे फेरनिविदेचा निर्णय प्रशासनाला तातडीने घ्यावा लागणार आहे. तसेच ही निविदा अंतिम करण्यास मंजुरी दिल्यास त्यानंतरच्या पुढील सहा ते सात महिन्यांचा कालावधी गृहीत धरता विद्यमान कंत्राटदारांना मुदतवाढ दयावी लागेल. त्यातच त्यांच्या वाहनांचा कालावधी संपुष्टात आल्याने या भंगार गाड्यांमधून कचरा वाहून नेताना मुंबईत भविष्यात मोठी कचरा समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.