
मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे चक्रीवादळात अधिक तीव्र रूप धारण करण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सांगितले आहे. हे चक्रीवादळ पश्चिम-दक्षिण-पश्चिम दिशेने सरकणार आहे. या चक्रीवादळाला ‘शक्ती’ असे नाव देण्यात आले असून, हे नाव श्रीलंकेने सुचवले होते.
आयएमडीच्या माहितीनुसार, उत्तर-पूर्व अरबी समुद्रात तयार झालेले खोल दाबाचे क्षेत्र सध्या १२ किमी/तास या वेगाने पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने सरकत आहे. आज शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता हे कमी दाबाचे क्षेत्र गुजरातमधील द्वारका शहरापासून अंदाजे २४० किमी पश्चिम-दक्षिण-पश्चिम आणि पोरबंदरपासून सुमारे २७० किमी पश्चिमेकडे स्थित होते.
पुढील ३ तासांत या दाब क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते सुरुवातीला पश्चिमेकडे आणि नंतर पश्चिम-दक्षिण-पश्चिम दिशेने हालचाल करू शकते. पुढील २४ तासांत ते अधिक बळकट होऊन भीषण चक्रीवादळ बनू शकते.
इनसेट-३डी उपग्रहाच्या प्रतिमांमध्ये उत्तर-पूर्व अरबी समुद्रावर एक वावटळ उठताना दिसून येत आहे. उत्तर आणि मध्य अरबी समुद्रातील तसेच कच्छ व कच्छच्या आखातामधील भागांमध्ये मध्यम ते घन मेघ संचय आणि तीव्र वादळी प्रणाली पाहायला मिळत आहे.
आयएमडीने ट्विटरवर (एक्स) ‘शक्ती’ या संभाव्य चक्रीवादळाच्या मार्गाविषयी एक पोस्ट केली होती. त्यामध्ये म्हटले आहे की बहुतांश संख्यात्मक हवामान अंदाज मॉडेल्स सूचित करतात की हे दाब क्षेत्र उत्तर-पूर्व व त्याला लागून असलेल्या उत्तर-पश्चिम अरबी समुद्रात लूपमध्ये पुढे सरकत जाईल आणि नंतर गंभीर चक्रीवादळात परिवर्तित होऊ शकते.