Thursday, October 2, 2025

'असे हलके वागणारे माझे नाहीत!' गोंधळ घालणाऱ्या समर्थकांवर पंकजा मुंडे कडाडल्या

'असे हलके वागणारे माझे नाहीत!' गोंधळ घालणाऱ्या समर्थकांवर पंकजा मुंडे कडाडल्या

भगवान गडाचा वारसा हिरावून घेणाऱ्यांवर पंकजा मुंडेंचा हल्लाबोल

बीड: सावरगाव येथील दसरा मेळाव्याच्या मंचावर पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे प्रथमच एकत्र आले असताना, उपस्थित समर्थकांनी घातलेल्या गोंधळामुळे पंकजा मुंडे प्रचंड संतापल्याचे पाहायला मिळाले.

भाषणाची सुरुवात करतानाच पंकजा मुंडे यांनी गोंधळ घालणाऱ्यांना थेट इशारा दिला. "माझ्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून लोक येतात. झाडावर, टॉवर बसलेले लोक स्वत: आले आहेत. मी तुम्हाला आणलं का? असा धिंगाणा करणारे लोक माझे असू शकत नाहीत. तुमची भगवान बाबांवर श्रद्धा असेल, तर असा गोंधळ करू नका. तुम्ही स्वत: आला असाल, तर तोंडं बंद करा."

गोंधळ घालणाऱ्यांवर थेट प्रहार

पंकजा मुंडे यांनी गोंधळ घालणाऱ्यांवर आपला राग व्यक्त केला. "दरवर्षी माझ्या दसऱ्या मेळाव्यात लोक येतात, पण मागच्या वर्षीपासून असे हलके वागणारे लोक का येत आहेत?" असा संतप्त सवाल त्यांनी केला.

त्यांनी स्पष्ट केले, "तुम्ही शुद्धीवर नाही. तुम्हाला शरम वाटली पाहिजे. तुम्ही माझी माणसं नाहीत. तुम्ही कितीही माझ्या नावाच्या घोषणा दिल्या तरी तुम्ही पवित्र होणार नाही, कारण अशी बेशिस्त मी यापूर्वी मेळाव्यात पाहिली नव्हती."

'विरासत में संघर्ष मिला है'

गोंधळामुळे व्यत्यय येत असतानाही पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना शायरीतून व्यक्त केल्या.

"विरासत में संघर्ष मिला है, तो जिद भी मिली है लडने की,

चाहे जो भी हो, दटकर आगे बढने की,

बदलू मै क्यों मै विचारोंकी अटल चोटी हूँ,

मै गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ..."

भगवानगडाचा वारसा हिरावून घेण्याचा प्रयत्न

पंकजा मुंडे यांनी यावेळी भावनिक होत जुन्या संघर्षाला उजाळा दिला. "माझा भगवान गडावरील मेळावा काढून घेतला गेला (त्या जागेवरचा अधिकार हिरावला गेला)." आता हा (सावरगाव येथील) मेळावाही तुम्ही हिरावून घेताय असं वाटतं," असे त्या गोंधळ घालणाऱ्यांना उद्देशून म्हणाल्या.

याचदरम्यान, पंकजा मुंडे यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांचे दुःख पाहून वेदना झाल्याचे व्यक्त केले. "मी शब्दात मांडू शकत नाही. मोदी आणि फडणवीस यांच्यावतीने मी शब्द देते की, आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि पूर्ण मदत करणार आहोत," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याआधी धनंजय मुंडे बोलतानाही उपस्थितांनी गोंधळ घातला होता. तेव्हा धनंजय मुंडे यांनीही संतापून "तुम्ही बोलू देण्यासाठी आलात की बंद करण्यासाठी?" असा सवाल करत, "मला चांगलं आणि वाईटही समजावता येतं," असा इशारा दिला होता. गोंधळातही दोन्ही मुंडे बंधू-भगिनींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा