Wednesday, October 1, 2025

अमेरिकेत शटडाऊन लागू; सरकारी कामकाज बंद

अमेरिकेत शटडाऊन लागू; सरकारी कामकाज बंद

वॉशिंग्टन : अमेरिकेत पुन्हा एकदा सरकार ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. ट्रम्प सरकार अधिकृतपणे शटडाऊन झालं आहे. ट्रम्प सरकारच्या निधीवर तात्पुरता ताळा बसला आहे. कारण त्याला संसदेकडून आवश्यक मान्यता मिळाली नाही. ट्रम्प सरकारला खर्च विधेयक संसदेमध्ये मंजूर करण्यात अपयश आलं आणि त्यानंतर मध्यरात्रीपासून सरकारी निधी बंद झाला आहे. गेल्या ६ वर्षांतील हा पहिला सरकारी शटडाऊन आहे.

शटडाऊनमुळे संपूर्ण अमेरिकेतील सरकारी संस्था तात्पुरत्या बंद होतील. सरकारी बंद अंतर्गत, अनावश्यक मानल्या जाणाऱ्या संघीय कर्मचाऱ्यांना पगाराशिवाय रजेवर पाठवले जाईल, तर सैन्य कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील पगाराशिवाय काम करावं लागेल.

अमेरिकेत दरवर्षी १ ऑक्टोबरपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं. पण यावेळी ट्रम्प सरकार खर्च विधेयक मंजूर करून घेण्यात अयशस्वी ठरलं. त्यामुळे रात्री १२:०१ वाजता शटडाऊन लागू झाला आहे. यामुळे आता ४०% सरकारी कर्मचारी, म्हणजेच सुमारे ८ लाख कर्मचारी, पगाराशिवाय तात्पुरत्या रजेवर जाऊ शकतात. कायदा-सुव्यवस्था, सीमा सुरक्षा, वैद्यकीय आणि हवाई सेवा यांसारख्या आवश्यक सेवा सुरू राहतील. पण अन्न सहाय्य कार्यक्रम, अन्न व पेय तपासणी, केंद्र सरकार चालवत असलेल्या शाळा, विद्यार्थ्यांचे कर्ज यांसारख्या सुविधा मर्यादित किंवा पूर्णपणे बंद केल्या जाऊ शकतात. वाहतूक सेवांवरही प्रभाव पडणार आहे, अनेक एअरलाईन्सच्या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली असून उड्डाणांमध्ये विलंब होऊ शकतो.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,शटडाऊन जितका लांबेल तितका त्याचा परिणाम गंभीर असेल. या शटडाऊनचा बाजारावर व संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ट्रम्प सरकारने शटडाऊन टाळण्यासाठी त्यांच्या फंडिंगमध्ये ७ आठवड्यांची वाढ करण्यासाठी मंगळवारी सीनेटमध्ये विधेयक सादर केलं. या विधेयकाला ५५ मते मिळाली, तर ४५ मते विरोधात पडली.पण मंजुरीसाठी किमान ६० मतांची गरज होती, जी मिळाली नाही.

विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने आरोप केला आहे की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षाने आरोग्य सेवांबाबतच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, आणि त्यामुळे खर्च विधेयक बिल मंजूर न करून सरकारच्या निधीवरच ताळा घातला आहे. शेवटी, सीनेटने निधी वाढवलेला नसतानाच संपूर्ण दिवसासाठी अधिवेशन तहकूब केलं. याचा अर्थ असा की बुधवारी रात्री १२:०१ वाजता (स्थानिक वेळेनुसार) शटडाऊन सुरू झाला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा