
संघ विचाराच्या प्रसारासाठी स्वयंसेवक घरोघरी जाणार
मोहन भागवत परदेशातही जाणार
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंदही उपस्थित राहणार
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यावर्षी दसऱ्याने आपल्या शताब्दी वर्षाच्या उत्सवाची सुरुवात करत आहे. २ ऑक्टोबर २०२५ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत देशभरात सात प्रमुख कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. संघाचा १०० वर्षांचा प्रवास, सध्याची आव्हाने आणि समाजासमोरील उपाय सादर करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. परिसरापासून प्रांतीय पातळीपर्यंत कार्यक्रम आयोजित केले जातील. पश्चिम बंगालमध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच हा उपक्रम सुरू झाला आहे.
या काळात संघप्रमुख मोहन भागवत परदेश दौऱ्यावर जाणार असून ते अमेरिका आणि युरोपसारख्या देशांमध्ये कार्यक्रमांना संबोधित करू शकतात. संघप्रमुख कोणत्या देशांना भेट देणार आहेत याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये जबलपूर येथे होणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत घेतला जाईल. २८ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नागपूरमध्ये मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत उपस्थित होते.
दसऱ्याच्या भाषणात ऑपरेशन सिंदूर व जात जनगणना यासारखे मुद्दे असतील. संघाच्या स्थापना दिनी, दसऱ्याला, संघप्रमुख मोहन भागवत यांच्या भाषणात लष्कराच्या शौर्याचा आणि ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख असेल. ते जातीय जनगणना, लोकसंख्या नियंत्रण, दहशतवाद व पाकिस्तान यांसारख्या वर्तमान मुद्द्यांवर भाष्य करतील.
कमलताई गवई उपस्थित राहणार
२ ऑक्टोबर रोजी दसऱ्यानिमित्त नागपूरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावर्षी आरएसएस त्याच्या स्थापनेची १०० वर्षे साजरी करत आहे. आरएसएसच्या शताब्दी वर्षांत ही एक ऐतिहासिक घटना असेल. रामनाथ कोविंद हे आरएसएसच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे दुसरे माजी राष्ट्रपती आहेत. यापूर्वी २०१८ मध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे आरएसएसच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे होते. भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ५ ऑक्टोबर रोजी अमरावती येथे होणाऱ्या आरएसएस कार्यक्रमात कमलताईंना प्रमुख पाहुण्या म्हणून निवडण्यात आले आहे.