
आशिया चषक स्पर्धेत भारताने काल पाकिस्तानचा पाच विकेट्स राखून पराभव केला आणि ट्रॉफीवर नाव कोरले. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात तिलक वर्माचे अर्धशतक आणि फिरकीपटू कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांच्या जोरदार कामगिरीच्या जोरावर भारताने पाकिस्तानला रोमहर्षक सामन्यात पाच विकेट्सनी पराभूत केले.
टी-२० चषकाच्या स्पर्धेतील भारताचा हा दुसरा किताब आहे. भारताने पाकला माफक १४७ धावांवर बाद केल्यावर भारताने दोन चेंडू राखून पाकचे हे माफक आव्हान परतवून लावले. पण या स्पर्धेत भारताचा विजय हा ठरलेलाच होता आणि पाककडे ना खेळण्याची जिद्द होती, ना त्यांच्याकडे लढण्याची क्षमता. कारण 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत पाकमधील संबंध अत्यंत खराब झाले आहेत आणि त्यामुळे तसेही या सामन्यांना कुणी प्रेक्षक नव्हते. पूर्वी भारत-पाक सामने असले, की थाऊजंड मेगाव्होट्सची लढत असायची. पाकिस्तानचे प्रेक्षक आपले रेडिओ फोडून टाकायचे आणि टीव्ही सेट्स तोडून टाकायचे. पण आजकाल सामन्यात पाकच्या देशद्रोही कारवायांबद्दल इतका संताप निर्माण होत आहे, की काल सामना कधी होता आणि कधी संपला हेही कुणाला कळले नाही. कारण पाकच्या मांडीवर बसून सशस्त्र कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांनी भारतातील निरपराध नागरिकांना कंठस्नान घातले आहे आणि त्यामुळे त्या देशाविरोधात एक प्रकारे राग आणि संताप सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाला आहे. पण क्रिकेट हे क्रिकेट आहे हे लक्षात घेऊन भारताने सामने तर खेळले पण पाकविरोधात संताप खेळाडूंनी व्यक्त केला आणि तो पाकच्या पराभवातच दिसून आला. या सामन्यात मैदानावर जे नाट्य घडले त्यापेक्षा जास्त सामन्यानंतर घडले. त्यावरून भारताचा पाकवर राग आणि संताप दिसून येतो. तसेच पहेलगाम हल्ल्यात ठार झालेल्या निरपराध विधवांच्या कपाळावरचे कुंकू पुसले गेल्याचा प्रत्येक भारतीयाच्या मनात कसा राग धुमसत आहे हे यावरून लक्षात येते.
सामना पार पडला तो दुबईला आणि त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे प्रमुख मोहसीन नकवी हे तर चक्क आशिया चषक घेऊन पळाले असा आरोप केला जात आहे. आता भारताने अशी मागणी केली आहे, की पाकने हा चषक ताबडतोब परत द्यावा. त्यानुसार ते देतीलही. या सामन्यानंतरच्या काळात इतके नाट्य घडले की एखादी वेब सीरिज त्यावरून सहज तयार करता येऊ शकेल. भारतीय संघ आपल्या विजयोत्सवात मग्न असताना पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा आपल्या खेळाडूंना घेऊन ड्रेसिंग रूमममध्ये जाऊन बसला आणि त्याने स्वतःला बंद करून घेतले; परंतु सामन्यानंतरच्या कार्यक्रमात संपूर्ण गोंधळ दिसत होता. यावरून हे दिसत होते, की भारताने पाकला चारो खाने चित केल्यानंतर पाकमध्ये किती संताप व्यक्त होत आहे. अर्थात पाककडे काही साजरे करण्यासारखेेच नव्हते. यात आणखी एक वैशिष्ट्य असे होते, की पीसीबी क्रिकेट प्रमुखांकडून आशिया चषक स्वीकारण्यास भारताची तयारी नव्हती. त्यामुळे भारताचा संताप मैदानावर दिसला, तसाच तो मैदानाबाहेरही दिसला. कारण नकवी हे पाकचे अंतर्गत मंत्रीही आहेत आणि त्यांच्यामुळे पाकच्या दहशतवाद्यांना पाठिंबा मिळतो असाही प्रवाद आहे.
भारताने आशिया चषक जिंकूनही भारताने पाकिस्तानचा सहभाग असलेली ट्रॉफी स्वीकारली नाही याला आंतरराष्ट्रीय जगात अनेक अर्थ आहे. एक म्हणजे पाक अजूनही भारतासाठी दहशतवादी राष्ट्र आहे आणि त्याचा पुरता बीमोड केल्याशिवाय भारत स्वस्थ बसणार नाही. पंतप्रधान मोदी यांनी सामन्यावर एका शब्दात भाष्य केले आहे, ते म्हणजे 'क्रीडा क्षेत्रात ऑपरेशन सिंदूर', तर अमित शहा यांनी एक शानदार विजय असे म्हटले. नंतरच्या नाट्यावर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी नंतर ट्वीट करत सांगितले, की खेळाडूंनी अगोदरच ठरवले होते, की ट्रॉफी जिंकली तरी पाककडून स्वीकारायची नाही आणि हा निर्णय खेळाडूंनी पाळला. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने आपले सर्व मानधन पहेलगाम हल्ल्यातील विधवांना देण्याचे जाहीर केले. यापूर्वी कधीही असे वाद झाले नव्हते पण यंदाची परिस्थिती अशी होती, की वाद होणारच होता. तो झाला आणि त्यात भारतीयांनी आपण कुठेही देशभक्तीत कमी नाही हे दाखवून दिले. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने पाक खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता आणि त्यामुळे तो वादही गाजला होता. तसे तर भारत-पाक म्हटला, की कुठेही वाद होतातच. कारण पाकची पार्श्वभूमीच तशी आहे. त्यामुळे यंदा भारत-पाक सामने खेळवूच नये अशी एक चर्चा होती, पण तसे असते तर भारत-पाकिस्तानला घाबरतो असे नाव सर्वत्र गेले असते. तसे न होऊ देता भारताने सामने जिंकूनही पाककडून करंडक स्वीकारला नाही.
भारत आणि पाक यांच्यात गेली काही वर्षे सामने होत नाहीत. त्याला कारण आहे, ते म्हणजे दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतरही दोन्ही देशांमध्ये अनेक मुद्द्यांवर तणाव आहे. तो सीमेवरून जसा आहे तसाच तो काश्मीर प्रकरणावरूनही आहे. भारताने पाकला युद्धात जसे तीनदा हरवले, तसेच अलीकडच्या क्रिकेट सामन्यात पाकला मैदानावर हरवले आहे. त्यामुळे पाकला भारताचे वर्चस्व सहन होत नाही. त्यात भारत आता चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे तर पाक अजूनही चाचपडतो आहे. वास्तविक दोन्ही देश एकाच वेळी स्वतंत्र झाले. पण पाकने आपली सारी ऊर्जा भारतातील निरपराध नागरिकांना ठार मारण्यासाठीच खर्च केली. पाकचा भारताविषयीचा द्वेष हा सर्व स्तरांना स्पर्श करून जातो. याच वैराचे आणखी एक प्रात्यक्षिक काल दिसले.