Monday, September 29, 2025

अमेरिकेबाहेर तयार होणाऱ्या चित्रपटांवर १०० टक्के टॅरिफ लावणार - ट्रम्प

अमेरिकेबाहेर तयार होणाऱ्या चित्रपटांवर १०० टक्के टॅरिफ लावणार - ट्रम्प

न्यूयाॅर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर तयार होणाऱ्या चित्रपटांवर १०० टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या संदर्भात त्यांनी त्यांचे ट्रुथ या सोशल मिडिया प्लॅटफाॅर्मवरून माहिती दिली आहे. या माध्यमातून अमेरिकेला पुन्हा महान बनवायचा निर्धार ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. गेल्याच आठवड्यात ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर बनवल्या जाणाऱ्या औषधांच्या आयातीवर १०० टक्के टॅरिफ लादलं आहे.

ट्रम्प यांनी सोशल मिडिया प्लॅटफाॅर्मवर आपले मत व्यक्त करताना म्हटलं आहे की, आमचा चित्रपट निर्मिती व्यवसाय इतर देशांनी अमेरिकेतून चोरला आहे, जसे "बाळाकडून कँडी" चोरली जाते. कमकुवत आणि असक्षम गव्हर्नर असलेल्या कॅलिफोर्नियाला विशेषतः मोठा फटका बसला आहे. म्हणूनच, ही दीर्घकाळाची, कधीही न संपणारी समस्या सोडवण्यासाठी, मी युनायटेड स्टेट्सच्या बाहेर बनवल्या जाणाऱ्या कोणत्याही आणि सर्व चित्रपटांवर १०० टक्के कर लादणार आहे. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद. अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवा! अध्यक्ष डीजेटी...

ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात आधीपेक्षा अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानुसार त्यांनी भारतावर ५० टक्के, तर विविध देशांवर टॅरिफ आधीच लादले आहे. त्यापाठोपाठ अमेरिकेबाहेर बनलेल्या औषधांवर १०० टक्के टॅरिफ लागू केले आहे. आता त्याचाच पुढचा भाग म्हणून त्यांनी अमेरिकेबाहेर बनलेल्या सर्व चित्रपटांवर १०० टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका आता मनोरंजन क्षेत्राला बसणार आहे. यात भारतातील अनेक चित्रपटांचे चित्रीकरण कॅलिफोर्निया किंवा अमेरिकेतील विविध भागांत होते. त्यामुळे आता याचा फटका भारतीय चित्रपटसृष्टीला बसेल. याबाबत मनोरंजन क्षेत्रातील जाणकारांकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Comments
Add Comment