Monday, September 29, 2025

वरळी दुग्धशाळेच्या जागेवर मोठी व्यावसायिक संकुले उभारली जाणार

वरळी दुग्धशाळेच्या जागेवर मोठी व्यावसायिक संकुले उभारली जाणार

मुंबई : वरळी दुग्धशाळेच्या जागेवर मोठी व्यावसायिक संकुले उभारली जाणार आहेत. जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांद्रे- कुर्ला संकुलच्या (बीकेसी) धर्तीवर आता लवकरच वरळीतही मिनी बीकेसी वसवण्यात येणार आहे. वरळी दुग्धशाळेच्या ६.४० हेक्टर जागेचा विकास मिनी बीकेसी म्हणून करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय नुकताच नगर विकास विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

२०२३ मध्ये एमएमआरडीएने वरळी आणि कुर्ला दुग्धशाळेच्या जागेसह मुंबईतील अन्य काही पडून असलेल्या मोक्याच्या जागा शोधून त्या जागांचा विकास बीकेसीच्या धर्तीवर मिनी बीकेसी म्हणून करण्याचा प्रस्ताव प्राधिकरण बैठकीत मंजूर करून घेतला. त्यानंतर या प्रस्तावास राज्य सरकारची मान्यताही घेतली, मात्र वरळीसह अन्य ठिकाणच्या जागेचा विकास करण्यासाठी एमएमआरडीएची त्या त्या क्षेत्राकरता विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती होणे आवश्यक होते. त्यानुसार यासंबंधीचे प्रस्ताव एमएमआरडीएकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आले होते.

या प्रस्तावांच्या मान्यतेची प्रतीक्षा एमएमआरडीएला होती. आता वरळी दुग्धशाळेच्या क्षेत्रासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केला आहे. या शासन निर्णयानुसार वरळी दुग्धशाळेच्या ६.४० हेक्टर क्षेत्रासाठी एमएमआरडीएची नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Comments
Add Comment