Saturday, September 27, 2025

प्रश्न आणि उत्तर!

प्रश्न आणि उत्तर!

प्रल्हाद जाधव

दुपारची निवांत वेळ होती. घरात बसूनच होतो. एक छानसा लेख लिहावा असे मनात आले. पण कोणत्या विषयावर लिहावा? आणि लिहिला तरी तो कोण छापणार? कोणताही विषय घेतला तरी त्याची सगळी माहिती लोकांकडे आधीच असण्याचे हे दिवस! त्यांना नुसता विषय समजला तरी लगेच त्यावरून ते शोधमोहीम सुरू करतात आणि पाहिजे तो तपशील मिळवतात. समजा ‘गुलाबाचे फूल’ असा विषय घेतला तरी त्याची आज इतक्या परिने माहिती उपलब्ध आहे की त्याहून वेगळे असे सांगण्यासारखे आपल्याकडे काय उरते असा प्रश्न!

आणि छान लेख म्हणजे नक्की कसा? छान या शब्दाची व्याख्या काय? तीसुद्धा व्यक्तिसापेक्ष झाली आहे असे म्हटले तरी चालेल. कारण प्रत्येक माणूस हा आज मानसिकदृष्ट्या वेगवेगळ्या ध्रुवावर वावरताना दिसत आहे. आपल्याला जो मुद्दा सांगायचा आहे त्या एकाच बिंदूवर साऱ्या वाचकांना आणणे ही कमालीची अवघड गोष्ट झाली आहे. एकाला जे आवडेल ते दुसऱ्याला आवडणार नाही, एकाला जे पटेल ते दुसऱ्याला पटणार नाही. एखादा भाबडा वाचक कदाचित त्या लेखाच्या प्रेमात पडेल, तर एखादा कडू समीक्षक त्याला लगेच मोडीत काढायच्या तयारीला लागेल.

खूप कष्ट करून एखादा लेख लिहिलाच तर लेखकाने घेतलेल्या कष्टाच्या पातळीवर जाऊन तो वाचला जाईलच याची खात्री राहिलेली नाही. किंबहुना लेखाची ती सुंदर फुलबाग आडवी तिडवी तुडवतच वाचक पुढे जाणार, अशी आजची परिस्थिती! लेखामध्ये विरामचिन्हे असतात. अर्धविराम, स्वल्पविराम, पूर्णविराम, उद्गारवाचक चिन्हे, प्रश्नचिन्हे असा ऐवज असतो. या प्रत्येक चिन्हाला स्वतःचा एक अर्थ असतो. तो समजून घेत दोन शब्दांच्या मधली, दोन वाक्यांच्या मधली मोकळी जागा समजून घेत त्या मूळ सुप्त अर्थाच्या पातळीवर जाऊन वाचण्याइतका वेळ आणि धीर कुणाकडे आहे?

आणि तरीही एखादा लेख लिहिलाच तर तो प्रसिद्ध कुठे होणार; हा प्रश्न उरतोच! आणि प्रसिद्ध झाला तर त्यातून पुढे निष्पन्न काय होणार ही नवी चिंता भेडसावायला तयार! सोशल मीडियावर टाकला तर पुढच्या क्षणी लुप्त होणार. वृत्तपत्रात दिला, तर मोबाइलच्या आक्रमणामुळे कुठेतरी कोपऱ्यात पडून राहणार. शिवाय तो छापून येण्याआधी त्याची जी मोडतोड आणि जी हेळसांड झालेली असणार ती वेगळीच! तात्पर्य तो लेख समाजाच्या विद्यमान कोलाहलात समुद्रातील मिठाच्या बाहुलीसारखा विरघळून जाणार हे ठरलेले! अशा परिस्थितीत लेखकाने काय करावे? त्याने कसे जगावे?

या साऱ्याचा विचार न करता किंवा त्यापलीकडे जाऊन साधना करणारी काही तपस्वी माणसेही समाजात असतात. असे चित्रकार, कवी, लेखक, नाटककार, कादंबरीकार आपापल्या जागी ध्रुवाच्या ताऱ्यासारखे अढळ राहून साधना करत असतात. त्यांना लाईक्स, फॉरवर्ड किंवा कोणाच्याही पसंती-पत्राची (व्हॅलिडेशन) गरज नसते. स्वतःशीच असा उलट सुलट विचार करत मी स्वतःची समजूत घालत होतो. पण मनात काहीतरी रसायन (लेखनाची उर्मी) उकळत होते आणि लेखक म्हणून तो माझ्या प्राक्तनाचा एक भाग होता! संवेदनशील लेखकाने कसे जगावे हा प्रश्न या पार्श्वभूमीवर शिल्लक राहतोच! आपले अस्तित्व टिकवायचे, तर गुगलमध्ये नाही किंवा चॅट-जीपीटी ज्याची मांडणी करू शकत नाही असे काहीतरी त्याला शोधून काढावे लागेल. या सर्व कोलाहालात जगासमोर आलेले नाही असे काय असू शकते? ‘मानवी संवेदना’ या मुद्द्याकडे माझ्या मनाचा काटा झुकत होता.

पत्नीने चहा आणून दिला. चहा घेता घेता हे आणि असे विचार मनात येत होते. एक घोट घेतला. चहा अगदी फर्मास झाला होता. सोबत स्वादिष्ट कुरकुरीत खारीही होती. मग मन त्यात गुंतले. चहासोबत खारी खाताना मला विधानसभेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांची नेहमी आठवण येते. दूध आणि खारी हा त्यांचा आवडता पदार्थ होता. त्यात ते वरून साखर टाकून घ्यायचे. सकाळ संध्याकाळी हा आनंद त्यांना हवाच असे! सांगलीला मी जिल्हा माहिती अधिकारी होतो तेव्हा ते सांगलीचे पालकमंत्री होते. शिराळाला जाण्यापूर्वी अनेकदा ते सांगलीच्या रेस्ट हाऊसवर उतरायचे. शासकीय निवासस्थान मिळेपर्यंत आधी मी तेथेच राहात होतो. मी एकटा आहे असे पाहून ते मला बोलवून घ्यायचे. गप्पा सुरू व्हायच्या. मग कधी कधी समोरासमोर बसून आमचा ‘दूध-खारी महोत्सव’ साजरा व्हायचा. ते क्षण सदैव माझ्या लक्षात राहिले.

शिवाजीराव विधानसभेचे अध्यक्ष झाले तेव्हा मी मंत्रालयात संचालक म्हणून काम करत होतो. ते अध्यक्ष असताना त्यांना कधी भेटायला त्यांच्या कार्यालयात गेलो तर तेथेही दूध आणि खारी हा प्रकार व्हायचा. एकदा मुंबईत ती आठवण मी त्यांना सांगितली तेव्हा ते ते मिश्कीलपणे हसले. त्यांच्याच कारकिर्दीतच म्हणजे १९८४ साली मला जिल्हा माहिती अधिकारी म्हणून नोकरी मिळाली. तेव्हा तेच माहिती विभागाचे राज्यमंत्री होते. त्या आठवणीने त्यांच्याविषयी माझ्या मनात एकदम कृतज्ञता दाटून आली. ‘एखाद्या माणसाच्या आठवणी जोवर निघतात तोवर तो अमर असतो’ ही अमरपणाची व्याख्या नुकतीच माझ्या वाचनात आली होती.

चहा पिता पिता हे सारे आठवले आणि लेख लिहिण्याचा विचार आपोआप मागे पडत गेला. उगाच एखादा जडजंबाल लेख लिहून सत्यशोधनं वगैरे सारख्या तत्त्वज्ञानात्मक गोष्टींच्या मागे न लागता या क्षणाचा आनंद घेणे हे अधिक शहाणपणाचे आहे असे लक्षात आले. चहा आणि खारी हेच या क्षणीचे सत्य होते आणि त्याबाबतची अधिक माहिती गुगलमध्ये मिळणे अशक्य होते! या जाणिवेने प्रारंभीच्या उदास मनस्थितीतून मी एकदम बाहेर आलो. प्रसन्न वाटले. जवळच्या बागेत एखादी चक्कर मारून यावी या इराद्याने तयारीला लागलो….

Comments
Add Comment