
मुंबई : प्रसिद्ध वेशभूषाकार (कॉस्ट्यूम डिझायनर) आणि नावाजलेले अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता यांचे निधन झाले. त्यांचा मुलगा सत्या याने आज सोशल मीडियावर ही माहिती दिली. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोकाचे वातावरण आहे.
"त्या माझ्यासाठी आईपेक्षा जास्त होत्या. त्यांचे धैर्य आणि सामर्थ्य नेहमीच इतरांसाठी प्रेरणा राहिले आहे," अशा शब्दांत सत्याने दीपा मेहता यांना श्रद्धांजली वाहिली.
दीपा मेहता आणि महेश मांजरेकर यांची ओळख कॉलेजपासून होती आणि नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १९८७ मध्ये त्यांचे लग्न झाले आणि त्यांना सत्या आणि अश्वमी ही दोन मुले आहेत. काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. मांजरेकर यांनी नंतर मेधा यांच्याशी लग्न केले आणि त्यांना सई नावाची मुलगी आहे.
दीपा मेहता एक प्रसिद्ध वेशभूषाकार होत्या आणि त्यांचा "क्वीन ऑफ हार्ट" नावाचा साड्यांचा स्वतःचा ब्रँड होता, ज्यासाठी त्यांची मुलगी अश्वमीने मॉडेलिंग केले होते. त्या व्यवसाय, कुटुंब आणि मित्रांमध्ये योग्य संतुलन राखण्यासाठी ओळखल्या जात होत्या. त्यांच्या अकाली निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.