Sunday, September 28, 2025

अष्टमी: अंतर्मनाचा आरसा

अष्टमी: अंतर्मनाचा आरसा

कुठलाही धर्म असो…, कुठलाही पंथ असो… प्रत्येकाने शेवटी सत्, सुंदर आणि अहिंसेचीच शिकवण दिली आहे. कुणी कुर्निसात करतो, कुणी जपजाप्य… पण त्या सर्वांच्या पलीकडे जगतजेत्या परमेश्वराचं एकच स्वरूप आहे. जीवन आणि मृत्यू याविषयी विचार वेगवेगळे असले, तरी प्रवास मात्र साऱ्यांचा सारखाच. टिळक, नेहरू, टाटा, बिर्ला…, अमिताभ, दीपिका, बर्नार्ड शॉ… कोणीही काही घेऊन आलेलं नव्हतं आणि कोणीही काही घेऊन जाणार नाही.

कान्हा कान्हा दरसन दे भगवान... मोरमुकुट तोहे मैं पेहेना दु ... दही-दूध माखन मैं दिलवा दु... का से कहू मैं पिडा म्हारी... तुज बीन दुजा न कोयी कन्हाई...

संगीतकार अभिजीत नाईक यांच्यासाठी शब्दांची वीण गुंफताना, माझ्या लेखणीच्या टोकावर एक नाजूक स्पंदन थरारून गेलं आणि त्या क्षणी मनाच्या खोल कप्प्यातून एक हळवा विचार उमटला, ‘श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीच्या रात्री, अंधाराच्या कुशीत, एका कोठडीत झाला होता. तोच श्रीकृष्ण ज्याने पारिजातकाचं झाड सत्यभामेच्या अंगणात लावलं, पण त्याच्या फुलांचा सडा मात्र रुक्मिणीच्या ओसरीवरच दररोज पडत राहिला. का बरं असं घडतं?’ प्रेमाच्या या अदृश्य धाग्यांना कधी स्पर्श करून पाहिलंय का आपण? कधी ऐकू आलंय त्या नात्यांच्या निसटत्या सादांचं सूरमय गूज?

सत्यभामा… ती नेहमीच क्षणांमध्ये अडकून राहिली. प्रत्येक आठवण, प्रत्येक भावना, तिच्या मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रुतून बसली होती, जणू आयुष्याच्या प्रत्येक पानावर तिचं नाव कोरलं गेलं होतं, पण त्या अक्षरांना मुक्ती मिळालीच नाही आणि रुक्मिणी… ती मात्र प्रत्येक क्षण कान्ह्याला अर्पण करत, स्वतःला विसरत, समर्पणाच्या वाटेवर निःशब्दपणे चालत राहिली. जगलेला क्षण मागे टाकून, नव्याला हसतमुखाने सामोरी जाण्याची तिची तयारी… हेच तिचं सौंदर्य होतं. ती क्षणांना अडवत नाही, तर त्यांना खुलवत, फुलवत पुढे सरकत राहते. जणू तिचं मनच एक पारिजातक झालं होतं, जे फुलतं, पण स्वतःसाठी नव्हे तर कान्ह्यासाठी. म्हणूनच कान्ह्याच्या मनात रुक्मिणीचं स्थान अधिक गहिरं, अधिक प्रिय ठरतं. कारण प्रेमात गुंतणं जितकं सहज, तितकंच समर्पण… दुर्मीळ.

खरंच… जमेल का आपल्याला हे? या अष्ट ‘मी’मधला पहिला ‘मी’ जो स्वतःला विसरतो, पण हरवून जात नाही… जो समर्पणात विरघळतो, पण अस्तित्व हरवून बसत नाही… तो ‘समर्पणातील मी’… जपता येईल का आपल्याला?

एका पुराणकथेनुसार ब्रह्मदेव स्वतःच्या पुत्रीच्या सौंदर्याने मोहित झाले होते. म्हणजे देवही मोहाच्या जाळ्यातून सुटले नाहीत आणि आजच्या काळात तर माध्यमांनी आपलं आयुष्यच कवेत घेतलं आहे. सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, जाहिरातींच्या, चित्रफलकांच्या, स्क्रीनच्या माध्यमातून… सौंदर्याचं प्रदर्शन सतत समोर येतं. कधी एखाद्या उत्पादनाशी स्त्रीचा काहीही संबंध नसतो, तरीही तिच्या शरीराचा वापर विक्रीसाठी केला जातो. मध्यंतरी एका वॉशिंग मशीनच्या जाहिरातीत स्त्रीच्या अांघोळीचा प्रसंग दाखवण्यात आला होता… आणि हे दृश्य, रस्त्यावर, टीव्हीवर, मोबाईलवर… सतत समोर येतं.

या सगळ्या दृश्यांमधून… आपल्या मनावर एक सूक्ष्म, पण सततचा प्रभाव पडतो. आपल्या चंचल मनात खोलवर दडलेला ‘अष्टमी’मधील दुसरा ‘मी’ म्हणजे ‘काम’… त्याला ओळखून, त्याच्याशी प्रामाणिक लढा देणं… हेच खरं आत्मभान.

पुराणकथांच्या गूढ अंधारात आणखी एक प्रसंग उजळतो, जमदग्नी ऋषी, क्षणभराच्या क्रोधात, आपल्या प्रिय पत्नीला मृत्यूदंड देतात. त्या एका क्षणाने नात्यांचा सूरच बदलतो आणि मनाच्या गाभाऱ्यात खोलवर जखम देऊन जातो. राग हा वाऱ्यासारखा… क्षणात उफाळतो, पण त्याचं प्रतिबिंब मनात दीर्घकाळ उमटत राहतं. रागात उच्चारलेला शब्द, जरी आपण विसरतो, तरी समोरच्याच्या अंतःकरणात तो खोलवर रुजतो आणि अशा शब्दांनी, अशा क्षणांनी… नात्यांमधील गंध विरून जातो, दरवळ हरवतो.

मी असं म्हणत नाही की रागाचा संपूर्ण त्याग करावा… कारण काही क्षणांत तो आवश्यकही असतो. पण त्याला दिशा देणं, त्याच्या परिणामांचा विचार करणं… हेच खऱ्या अर्थाने आत्मभान. प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देणं गरजेचं नसतं. कधी शांत राहून, योग्य क्षणी बोललं… की शब्दांचं पारडं जड होतं आणि मनाचंही. तेव्हा… जमेल का आपल्याला थोडं थांबून, थोडं शांत राहून… ‘अष्ट मी’मधील ‘क्रोध’ नावाचा तिसरा मी… हळूहळू विरघळवायला? कधी अंगात वकूब नसतानाही काहीजण वाडवडिलांच्या नावावर माज करताना दिसतात… आणि तो माज, दुसऱ्यांवर उतरवण्याचा प्रयत्नही सतत सुरू असतो. लायकी नसतानाही मोठ्या हुद्यावर विराजमान होणाऱ्या चेहऱ्यांत आणि कष्टाने वर आलेल्यांच्या व्यक्तिमत्त्वात हा मद भरलेला मी पाहिला आहे. पण मद आणि अभिमान यांच्यात एक धूसर सीमारेषा असते जशी अांघोळ आणि शुचिर्भूत स्नानात किंवा कँपफायर आणि होम हवनात असते. अभिमान असावा… तो आपल्या कष्टांचा, आपल्या पूर्वजांचा. पण माज… नसावा. हे ज्याला उमजतं, त्यालाच ‘अष्ट मी’मधील ‘मद’ नावाचा चौथा मी… नाहीसा करता येतो. सकाळी उमललेली फुलं… सुगंधाने भारलेली, कोमलतेने नटलेली… भक्तिभावाने देवाच्या चरणी वाहिली जातात. काही केसांत माळली जातात, काही शर्टावर सजतात. पण संध्याकाळीच त्याचं निर्माल्य होतं. सौंदर्य, सुगंध, स्पर्श सगळं क्षणभंगुर. आजचा दिवस… उद्याच्या आठवणी ठरतो मग त्या क्षणाचा मोह कशासाठी? जे आहे, ते मनभरून जपा. जे आहे, ते मनमोकळं जगून घ्या. कारण मोह… तो नेहमीच एका रिकाम्या मुठीत संपतो. संपत्ती, सत्ता, सौंदर्य… या चक्रात अडकताना आपण हरवतो. म्हणूनच ‘अष्टमी’मधील ‘मोह’ नावाचा पाचवा ‘मी’ …हळूहळू विरघळवणं गरजेचं आहे. मोहात हरवण्याऐवजी… त्या क्षणात स्वतःला सापडणं… हेच खऱ्या अर्थाने मुक्ती हे लक्ष्यात असू दे.

‘मी का तू…, तू का मी…’ करत करत, आयुष्याचे कितीतरी सोनेरी क्षण नकळत नासवले जातात आणि हेच मत्सराचं स्वरूप तो स्वतः काही करत नाही, पण दुसऱ्याचं चांगलं पाहून मनात एक सल निर्माण करतो. माणसाने फुलपाखराकडून शिकावं… क्षणभंगुर आयुष्य असूनही, ते जे काही मधुर, सुंदर, उदात्त आहे तेच टिपत राहतं आणि मधमाश्या… त्या तर आपल्या पोळ्यात महत्कष्टाने मध साठवतात. पण मध मिळवण्यासाठी आग लावली जाते… आणि त्या गोडव्यासाठी अनेक मधमाश्यांचा मृत्यू होतो. पण आपल्याला मात्र दिसतं ते मधाचं पोळं… पण त्यामागे असते त्यांचे तप, त्यांचा त्याग. आपणही जर त्या कष्टांना, त्या प्रवासाला स्वीकारलं… तर यश हे आपलं असतं, कायमचं. मग मत्सर कशासाठी? दुसऱ्याच्या यशाने जळण्याऐवजी, त्याच्या कष्टांची प्रेरणा घ्यावी. मग ‘अष्टमी’मधील ‘मत्सर’ नावाचा सहावा मी… हळूहळू गळून पडतो, जणू मनातला एक धुसर काळोख विरतो.

माणूस नेहमीच स्वतःला अपेक्षांच्या ओझ्याखाली दाबून टाकतो. “उत्तम शिक्षण घेतलं की उत्तम नोकरी मिळेल…. मग बंगला, गाडी, उज्ज्वल भविष्य” या साखळीत तो स्वतःला हरवतो… आणि ऊर फुटेपर्यंत कष्ट करत राहतो. अपेक्षा कराव्यातच… पण त्या रास्त असाव्यात. कुवतीच्या पलीकडच्या आकांक्षा… त्या स्वप्न वाटतात, पण वास्तवात दुःख देतात. सगळेच काही सचिन तेंडुलकर किंवा लता मंगेशकर होत नाहीत… पण म्हणून स्वप्न बघूच नका असंही नाही. फक्त… जिथे जे सुयोग्य आहे, जिथे जे शक्य आहे… तिथेच आपली पावलं, आपलं वर्तन आणि आपली अपेक्षा असावी. मी तर म्हणेन... ‘लम्हा लम्हा फिसलता राहा... रेत की तरह... और गीले मेहंदी की खुशबू... वक्त की शाख पर... रंजीशों की तरह... रहगुजर हो गयी...’ क्षणभंगुर अशा या जीवनात एकमेकांचा राग, मत्सर आणि निंदा करत राहण्यापेक्षा समोरच्याचे चांगले गुण घ्या. कारण त्यांच्यातल्या कमीपणाकडे बोट दाखवताना चार बोटं आपल्याकडे असतात याची जाण ठेवा आणि ‘अष्टमी’मधील हे अनपेक्षित असं सातवा ‘मी’ ‘अपेक्षाचं ओझं‘ आपला आजचा वर्तमानकाळ पोखरण्यापूर्वीच मनावरून फेकून द्या.

कुठलाही धर्म असो,… कुठलाही पंथ असो… प्रत्येकाने शेवटी सत्, सुंदर आणि अहिंसेचीच शिकवण दिली आहे. कुणी कुर्निसात करतो, कुणी जपजाप्य… पण त्या सर्वांच्या पलीकडे जगतजेत्या परमेश्वराचं एकच स्वरूप आहे. जीवन आणि मृत्यू याविषयी विचार वेगवेगळे असले, तरी प्रवास मात्र साऱ्यांचा सारखाच. टिळक, नेहरू, टाटा, बिर्ला…, अमिताभ, दीपिका, बर्नार्ड शॉ… कोणीही काही घेऊन आलेलं नव्हतं आणि कोणीही काही घेऊन जाणार नाही. मग या धर्मांध दंगली कशासाठी? हे जातीभेद, वर्णभेद कोणत्या आधारावर? ‘इस्रायल’ या शब्दाची व्युत्पत्ती ‘ईश्वरायल’ म्हणजेच ईश्वराचा निवास अशी आहे, हे कित्येकांना ठाऊकही नाही. आपल्याला अनेकदा नाण्याची दुसरी बाजू माहितीच नसते. कुणीतरी सांगितलं म्हणून हातात दगड घेऊन गर्दीचा हिस्सा होऊ नका. प्रत्येकाच्या आयुष्याची एक बाजू असते ‘ती’ समजून घ्या. मगच ‘अष्टमी’मधील आठवा ‘मी’ ‘धर्मनिरपेक्षता’ तो केवळ विचारात नाही, तर आचरणात उतरवतो. जिथे माणुसपणाला धर्मापेक्षा अधिक स्थान दिलं जातं… जिथे श्रद्धा ही विभाजन नाही, तर समर्पण ठरते… तिथेच खऱ्या अर्थाने ‘मी’… ‘आपण’ होतो.

वाचक हो, आयुष्य किती आहे हे कुणीही सांगू शकत नाही, तुमच्या आयुष्याचा प्रवास सुरू झालेला असो अथवा आपण परतीच्या प्रवासाला लागलेलो असू, कसं मरावं हे जरी आपल्या हातात नसलं तरी कसं जगावं हे मात्र आपणच ठरवू शकतो. मृत्यू विरालाही येतो आणि भ्याडालाही येतो, फक्त कसं जगायचं ते आपल्या हातात आहे. त्यामुळे ‘अष्टमी’मध्ये आपलं प्रेम, माया, ममता ही या जगात पेरत राहा. इतकं पेरा की तुमची आठवण आली की माझ्या शब्दात लोकांनी म्हटलं पाहिजे ‘पृथ्वीच्या प्रेमगीतातील लयबद्धता... उद्यानपर्व रुजवता रुजवता... रंगपुष्करणीच्या तरलतेने... आठवणींचे गोंदणगीत गात... तुझ्या सावलीचे अत्तर थेंब... रंध्रा रंध्रात भरून गेले ...’ मग येणारी ‘नवमी’ ही... न म्हणजे... निरामय... निरातीश... निरागस... व म्हणजे... विशाल... आणि मी... म्हणजे... मीच्या स्वत्वाचा .... उगम तुमच्या व्यक्तिमत्त्वात भरून ठेवेल.

Comments
Add Comment