Saturday, September 27, 2025

तुम्ही मुलांना घाबरताय का?

तुम्ही मुलांना घाबरताय का?

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू

नएजर्सच्यां मॅन्युप्युलेटिव्ह वागण्याने तुम्ही घाबरून गेला आहात का? मुलांवर तुमचं नियंत्रण राहायला हवं त्याऐवजी मुलं तुम्हाला कंट्रोल करताहेत का? मुलांच्या अशा वागण्याला ‘चलाखीने वागणं’ म्हटलं जातं. त्यांच्या अशा वागण्याने तुम्ही गोंधळून जाता, हताश होता. मुलांना अशावेळी कसा प्रतिसाद द्यावा हे तुम्हाला कळत नाही. मुलांच्या अशा वागण्यामागे काय हेतू असतो, तर पालकांना कंट्रोलमध्ये ठेवण्याची गरज या मुलांना वाटते, असं मानसशास्त्र सांगतं. या मुलांना त्यांच्या भोवतालच्या वातावरणावर प्रभाव पाडायचा असतो. पॉवरफूल व्हायचं असतं.

भावनिकदृष्ट्या जी मुलं पुरेशी प्रगल्भ नसतात. ज्यांच्यात जीवनाशी जुळवून घेण्याची कौशल्ये पुरेशा प्रमाणात नसतात. ती मुलं पालकांशी असं वागतात. या मुलांना आपल्या भावना व्यक्त करण्यात अडचणी येतात. अशावेळी ती हुशारीने तुमचं भावनिक शोषण करायला लागतात. जर अशी परिस्थिती तुमच्या मुलांबाबत निर्माण होत असेल तर ती परिस्थिती तपासून पाहा. तसेच मुलांच्या अशा विखारी वागण्यामागची कारणं जाणून घ्या.

अशी वागणारी मुलं कशी ओळखाल? १. ही मुलं तुम्हाला अपराधीपणाची भावना देण्यासाठी, भावनिकदृष्ट्या तुमचं शोषण करण्यासाठी, तुमच्या वागण्याने त्याला स्वतःला मी कसा ‘ विक्टिम’ बनतोय हे दाखवण्यासाठी, मी कसा असहाय्य आहे, याची जाणीव देण्यासाठी अशा युक्त्या वापरत असतात. २. ज्या मुलांना आपल्या भावना व्यक्त करण्यात अडचणी येतात तेही हुशारीने पालकांना व इतरांना इमोशनल ब्लॅकमेल करू शकतात. ३. ही मुलं पालकांनी आखून दिलेल्या नियमांकडे दुर्लक्ष करतात. पालकांशी बोलणं बंद करतात. अपमानास्पद, स्वार्थीपणानं आणि मन दुखावलं जाईल असं वागतात. ४. ही मुलं पालकांशी ज्या पद्धतीनं वागतात त्याला ‘गॅसलायटिंग’ म्हणतात. ते खोटं बोलतात. कधीकधी अतिउत्साहीपणा दाखवतात. प्रामाणिकपणे वागतोय असं दाखवतात. ५. कधी कधी ही मुलं नाटकं करतात. त्यांचं वागणं स्फोटकही असू शकतं. आत्महत्येची भीती दाखवतात.

आता थोडं या मॅन्युप्युलेटिव्ह वर्तनाचे बारकावे समजून घेऊ या. १. भावनिक शोषण यालाच ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ असेही म्हणतात. हा टीनएजर्सच्या मॅन्युप्युलेटिव्ह वागण्याचा एक प्रकार आहे. यात टीनएजर्स अपराध, भीती, धमक्या यांचा वापर करतात आणि त्यांच्या मनासारखं करवून घेतात. तुम्ही मला हवे ते देत नाही अशा पद्धतीने तुमच्या मनात अपराधीपणाची भावना, भीतीची भावना निर्माण करतात. तुम्हाला दिलेली आश्वासनं ते पाळत नाहीत. त्यातून मग वादविवाद, राग, स्फोटक वर्तन असे प्रकार पालक आणि मुलं दोघांच्याही बाबतीत होतात. २. गॅसलाइटिंग गॅसलाइटिंग करताना मुलं वारंवार असं सांगून तुम्हाला खात्री देत असतात की, मी अशी गोष्ट परत कधीच करणार नाही. असं परत कधीच वागणार नाही. हेतू काय तर आता जे चुकीचं घडलंय ते पालकांनी पूर्णपणे विसरून जावं.

मुलं त्या सत्याची अशी काही तोडमोड करतात की जणू ते बरोबर आणि तुमची बाजू चुकीची आहे असं वाटावं. ‘मी जस्ट जोक केला’. ‘तू फारच संवेदनशील आहेस’ असं म्हणून तुम्हाला ते कमीतकमी दुखावत आहेत असंही दाखवतात.

या प्रकारची मुलं राग राग करतात. बहुतेकदा लहानपणीचं वागणं टीनएजमध्येही कंटिन्यू राहतं. लहान वयातील ‘टॅन्ट्रम्स’ हे जास्त तीव्र असतात. जास्त व्यत्यय आणणारे असतात. कधीकधी तर ते किंचाळतात, वस्तू फेकतात, रडतात. असं करण्यामागे तुम्हाला अपराधीपणाची भावना देणे, हताश व्हायला लावणं हा प्रयत्न असतो. मग पालक नाईलाजाने मुलांना हवं ते देतात. त्यांच्या मनासारखं वागतात आणि एक दुष्टचक्र सुरू होतं. ही मुलं मग तुम्हाला त्रास देण्याचं कौशल्य वाढवत नेतात. त्यांच्या हातात कंट्रोल येऊन त्यांच्या मनाप्रमाणे व्हावं यासाठी ते असं करतात. पुढे यातूनच चिंता, निराशा असे मानसिक आरोग्याचे प्रश्न मुलांमध्ये तयार व्हायला लागतात.

अशा प्रकारे वागणाऱ्या मुलांशी कसं डील करायचं ते आता समजावून घेऊ या. पालकांकरिता हे अत्यंत कठीण काम आहे. १. अति राग किंवा अति शांत राहणं टाळायला हवं. मॅन्युप्युलेटिव्ह वागणारी मुलं आईवडिलांच्या संयमाची अक्षरशः सत्त्वपरीक्षा पाहत असतात. सुरुवातीला अर्थातच तुम्ही मुलांवर ओरडता, त्यांच्या मागण्यांबाबत, अगदी शिक्षा देण्याबाबतही हात आखडता घेता किंवा त्यांच्या मागण्या पूर्ण करुन टाकाव्या असा मोहही तुम्हाला होतो. कारण मुलं दुःखी असली, डिप्रेस्ड दिसली की त्यांना ‘नाही’ म्हणणं सोपं नसतं. आपण मुलाला आनंदी ठेवण्यासाठी आपला अधिकार वापरतो पण हळूहळू परिस्थिती आणखी वाईट होते. म्हणून वेळीच मुलांचं हे वागणं ओळखा आणि ठाम राहा. २. मॅन्युप्युलेटिव्ह मुलांबरोबर तडजोडीचे धोरण कामाला येत नाही. मुलं त्यांना हवं त्या पद्धतीने तुमचे शब्द फिरवतात. कारण यात नेहमीच मुलांची बाजू वरची राहते आणि तेच परिस्थितीला कंट्रोल करतात म्हणून तुमच्या शब्दांना चिकटून राहा. ३. मुलांच्या वागण्याला रिॲक्ट होण्यापेक्षा रिस्पॉन्ड करा. जे मागितलं आहे त्याची खरंच गरज आहे का हे तपासून पाहा. त्यांच्या खोटं बोलण्यात, गोड बोलण्याच्या जाळ्यात अडकू नका. पडती बाजू नका घेऊ. ४. घरात वागण्याचे नियम ठरवा. ते न पाळल्यास त्याचे परिणाम काय होतील याची जाणीवही द्या. हे परिणाम मुलांना देताना खंबीर राहा. ते तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करत असतील किंवा निगोशिएट करत असतील तर त्याला बळी पडू नका.

दोन्ही पालकांनी याबाबत एकसारखे धोरण ठेवा. ठाम, खंबीर राहा. गरज वाटल्यास व्यावसायिक मदत जरूर घ्या. कारण मॅन्युप्युलेटिव्ह बीहेवियर असणाऱ्या मुलांशी वागणं ही खरोखरच सत्त्वपरीक्षा असते. असं असलं तरीही जर तुम्ही आखून दिलेल्या बाउंड्रीज ठरवलेले नियम यानुसार पती-पत्नी दोघेही मुलाशी ठामपणे राहिलात, वागलात तर मुलं तुमचा अधिकार घेऊ शकत नाहीत आणि तुम्ही मुलांना घाबरून राहण्याची गरजही उरत नाही.

Comments
Add Comment