
मुंबई : लिंक रोडचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. या कामाच्या अंतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात येणाऱ्या भूमिगत जुळ्या बोगद्याच्या कामासाठी अत्याधुनिक टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) दाखल झाले आहे. त्यामुळे लवकरच रस्त्याच्या भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. या कामाचे कंत्राट जे. कुमार-एनसीसी कन्सोर्टियम यांना देण्यात आले आहे.
भुयार खोदणाऱ्या मशीनचे सर्व ७७ कंटेनर जपानहून आयात करण्यात आले असून दुसऱ्या टीबीएमचे भाग डिसेंबर २०२५ पर्यंत दाखल होणार आहेत. या रस्ते कामामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरातील वाहनधारकांचा , प्रवाशांचा प्रवास जलद आणि सुलभ होणार असून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरे येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या अंतर्गत खोदण्यात येणाऱ्या जुळ्या भुयारी बोगद्यासाठी वन खात्याची १९.४३ हेक्टर जागा मुंबई महापालिकेच्या ताब्यात देण्यात आली आहे. केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांनी अंतिम मान्यताही दिली आहे.
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्या जुळ्या बोगद्यासाठी आवश्यक असलेली १९.४३ हेक्टर वनजमीन मुंबई महापालिकेकडे वळती करण्यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्यता मिळाली आहे. त्यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची कार्यवाही मुंबई महापालिकेमार्फत सुरू करण्यात आली आहे. टीबीएमद्वारे भुयारीकरण सुरू करण्यापूर्वी महापालिकेकडून लॉचिंग शाफ्ट खोदण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. आतापर्यंत साडेतीन मीटर खोल शाफ्ट खोदण्यात आला आहे. या बोगद्याच्या बांधकामासाठी तब्बल ३ लाख क्युबिक मीटर भुयारीकरण करावे लागणार आहे. जीएमएलआर प्रकल्पाअंतर्गत गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीपासून मुलुंडच्या खिंडीपाडापर्यंत जुळे भूमिगत बोगदे बांधण्यात येणार आहेत. जीएमएलआर पूर्ण झाल्यानंतर गोरेगाव ते मुलुंड दरम्यानचा प्रवास १५-२० मिनिटात पार होण्याची शक्यता आहे.