Saturday, September 27, 2025

मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलची हत्या, पत्नी आणि मुलाला अटक

मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलची हत्या, पत्नी आणि मुलाला अटक

मुंबई : शिवाजी नगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या प्रवीण सूर्यवंशी या ५२ वर्षांच्या पोलीस कॉन्स्टेबलचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद आधी पोलिसांनी केली होती. मात्र सखोल तपासाअंती पोलिसांनी प्रवीण सूर्यवंशीच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी म्हणून त्याच्या पत्नीला आणि मुलाला अटक केली आहे.

प्रवीणची पत्नी स्मिता सूर्यवंशी (३८) आणि मुलगा प्रतिक सूर्यवंशी (२०) या दोघांना पोलिसांनी संशयावरुन अटक केली आहे. अटकेतील आरोपींनी प्रवीण सूर्यवंशी याला घरात बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या प्रवीण सूर्यवंशीचा काही काळाने उपचारांअभावी घरातच मृत्यू झाला. यानंतर स्वतःवर संशय येऊ नये यासाठी प्रवीणची पत्नी आणि मुलगा या दोघांनी एक बनावट चिठ्ठी तयार केली. ही आत्महत्या करण्याआधी लिहिलेली चिठ्ठी असल्याचा बनाव करण्यात आला. चिठ्ठीत 'माझ्या आत्महत्येसाठी कोणाला जबाबदार धरू नये' असे वाक्य होते आणि त्याखाली प्रवीण सूर्यवंशीचे नाव होते. सुरुवातीला पोलिसांनी कामाच्या ताणातून टोकाचे पाऊल उचलताना धडपडला आणि शेवटी अपघाती मृत्यू झाला असा तर्क केला होता. पण प्रवीणच्या नातलगांनी त्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. अखेर पोलिसांनी प्रवीणच्या मृत्यू प्रकरणी नव्याने तपास केला. या तपासात पोलिसांना धक्कादायक माहिती समजली.

प्रवीण सूर्यवंशीच्या शरीरावर तब्बल ३८ बाह्य जखमा आढळल्या. प्रचंड रक्तस्त्राव आणि धक्क्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रवीण सूर्यवंशी आणि त्याच्या पत्नीमध्ये एटीएम कार्ड भावाला देण्यावरून वाद झाला होता. वाद वाढला आणि प्रवीण सूर्यवंशीला त्याच्या पत्नीने आणि मुलाने बेदम मारहाण केली. यानंतर आत्महत्येचा बनाव रचण्यात आला होता. पण पोलिसांच्या सखोल तपासातून सगळा प्रकार उघड झाला. यानंतर पोलिसांनी प्रवीण सूर्यवंशीच्या पत्नीला आणि मुलाला अटक केली आहे.

Comments
Add Comment