
लेह : लडाख या केंद्रशासित प्रदेशाला भारतीय संविधानातील कलम सहा (आर्टिकल सिक्स) अंतर्गत स्वायत्त राज्याचा दर्जा द्यावा अशी मागणी करत सोनम वांगचुकने केंद्र सरकार विरोधात हिंसक आंदोलनासाठी चिथावणी दिली. यामुळे लडाखमध्ये हिंसा भडकली. या हिंसेत चार जणांचा मृत्यू झाला आणि ९० जण जखमी झाले. सार्वजनिक आणि खासगी संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कायदा सुव्यवस्था बिघडली या गंभीर आरोपांतर्गत लेह पोलिसांनी कारवाई केली. हिंसक आंदोलनासाठी चिथावणी दिल्याप्रकरणी लेह पोलिसांनी सोनम वांगचुकला अटक केली. सोनम विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
डीजीपी एस. डी. सिंह जामवाल यांच्या नेतृत्वात पोलिसांनी सोनम वांगचुकला अटक केली. या कारवाईनंतर खबरदारीचा उपाय म्हणून लडाखमधील इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे. लडाखमधील हिंसेप्रकरणी सोनम वांगचुक व्यतिरिक्त किमान ५० जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी काही जणांच्या अटकेची शक्यता आहे. लेह जिल्हा प्रशासनाने सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालयं आणि अंगणवाडी केंद्रं २ दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी लेह आणि कारगिलसह अन्य शहरांमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नायब राज्यपाल कविंद्र गुप्ता यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. हिंसाचाराच्या घटना कट कारस्थानाचा भाग असल्याचे दिसत आहे. यामुळे पोलीस तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत. संपूर्ण लडाखमध्ये सतर्कता राखण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सोनम वांगचुकच्या स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुव्हमेंट ऑफ लडाख (एसईसीएमओएल) या संस्थेचे एफसीआरए लायसन्स (परकीय योगदान नियमन कायद्यांतर्गत दिलेला परवाना) केंद्रीय गृह मंत्रालयाने रद्द केले आहे. सरकारी यंत्रणा सोनम वांगचुकच्या आणि त्याच्या संस्थेच्या आर्थिक व्यवहारांचा कसून तपास करत आहे.