Friday, September 26, 2025

धाराशिवला पुराचा फटका पण जिल्हाधिकाऱ्याला थिरकण्याचा मोह आवरेना

धाराशिवला पुराचा फटका पण जिल्हाधिकाऱ्याला थिरकण्याचा मोह आवरेना

धाराशिव : मराठवाड्यातील नांदेड, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला. धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावं पुराच्या पाण्यात सापडली. कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले. पिकं वाहून गेली. लाखो नागरिक पुरामुळे संकटात सापडले आहेत. या परिस्थितीत नागरिकांच्या मदतीला जाण्याऐवजी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार नाचगाण्यात मग्न दिसत आहेत.

पुरामुळे २४ सप्टेंबर रोजी अनेकांवर रस्त्यावर राहण्याची वेळ आली. त्याचवेळी धाराशिवचे जिल्हाधिकारी तुळजापूर येथे सांस्कृतिक कार्यक्रमात थिरकत होते. धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे पूर आला. संपूर्ण जिल्ह्यामधील शेतकरी आणि नागरिक संकटामध्ये आहेत. बुधवार 24 सप्टेंबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी लातूर आणि सोलापूर येथील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही भूम, वाशी आणि इतर पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. नुकसान भरपाईचा अंदाज घेतला. अजूनही या जिल्ह्यावर वरुणराजाची अवकृपा असल्याचे दिसून येत आहे. मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याऐवजी जिल्हाधिकारी सांस्कृति कार्यक्रमात मग्न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

तुळजापूर येथे देवस्थान समितीने शारदीय नवरात्र महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी सहकुटुंब सहभागी होणार हे आधीच ठरले. धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव या पण कार्यक्रमात सहभागी होणार हे ठरले होते. पण पावसाचा तडाखा बसल्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मंदिर समितीशी बोलून कार्यक्रम टाळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी या दोघांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. जिल्हाधिकारी तर संगीताच्या तालावर थिरकले. याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी जिल्हाधिकाऱ्यांना ट्रोल करायला सुरुवात केली. काहींनी मात्र जिल्हाधिकाऱ्यांची बाजू उचलून धरली. लोककलावंताना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याचा काहींचा दावा आहे.

Comments
Add Comment